Home संपादकीय ‘अपू’च्या संसाराची समाप्ती!

‘अपू’च्या संसाराची समाप्ती!


संतोष पाठारे

त्याचं बालपण निश्चिंतपूर या खेड्यात खेळण्याबागडण्यात गेलं. घरात अखंडपणे वसलेल्या दारिद्र्याच्या झळा, त्याच्या आईने सर्वोजयाने त्याला बसू दिल्या नाहीत. त्याच्या बहिणीच्या अकाली मृत्यूने त्याला अचानक समंजस करून टाकलं. वडलांसारखं पुजारी बनण्यापेक्षा कलकत्याला जाऊन शिकावं, लेखक बनावं, हे ध्येय त्याने मनाशी बाळगलं! व्यावहारिक जगाचे टक्के टोणपे खाताखाता सुखी आयुष्याची स्वप्नं पाहणारा त्याच्या प्रिय पत्नीच्या, अपर्णाच्या मृत्यूने कोसळून गेला. आपल्या नवजात बालकाला पाहण्याचं देखील त्याने नाकारलं. मात्र आपण आपल्या लहानग्यावर अन्याय करतो आहोत, याची जाणीव त्याला झाली. काळाने हिरावून नेलेल्या प्रियजनांचं दुःख उरात दडवून, येणाऱ्या काळाला सामोरं जाण्याची मानसिकता त्याने अंगीकारली… ‘पाथेर पांचाली’पासून सुरू झालेला अपूचा प्रवास ”मध्ये संपूर्ण सुफळ झाला. आयुष्यात आलेल्या चढउतारांमुळे प्रगल्भ झालेला अपू पडद्यावर समर्थपणे साकारण्यासाठी सत्यजित राय यांच्यासमोर केवळ एकच पर्याय होता आणि तो म्हणजे- सौमित्र चटर्जी! खरंतर सौमित्रची वर्णी सत्यजित राय यांच्या ‘अपूत्रयी’मधील ‘अपराजितो’मध्येच लागणार होती; पण त्यावेळी तो पौगंडावस्थेतील अपूपेक्षा वयाने थोडा मोठा होता. मध्यम चणीच्या, गोबऱ्या गालाच्या, डोळ्यांत मिश्कील भाव असणाऱ्या यांची त्यावेळी हुकलेली संधी त्यांना ‘अपूर संसार’मध्ये मिळाली. ‘अपूर संसार’ या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीला दोन गुणवंत कलाकार दिले, शर्मिला टागोर आणि सौमित्र चटर्जी!

‘अपूर संसार’च्या निमित्ताने दिग्दर्शक आणि नायक म्हणून एकत्र आलेल्या सत्यजित राय आणि सौमित्र चटर्जी यांनी तब्बल चौदा चित्रपटांत एकत्र काम केलं. सत्यजित राय यांच्यासारख्या चोखंदळ दिग्दर्शकाने आपल्या कारकिर्दीतील अर्ध्याहून अधिक चित्रपटात सौमित्र चटर्जी यांना प्रमुख भूमिका देणं, हे त्यांच्या अभिनयक्षमतेची व्याप्ती किती विस्तृत होती, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसं आहे.

एका अभिनेत्याला चित्रपटातील अभिनयाच्या बरोबरीनेच साहित्य, चित्रकला, नाट्य याचं ज्ञान असेल तर, त्याचा अभिनय अधिक परिणामकारक होऊ शकतो, याचं सौमित्र चटर्जी हे अस्सल उदाहरण होते. अभिनय करतानाच त्यांनी आपल्यातील संवेदनशील कवी जागता ठेवला. काव्यवाचन हा त्यांचा छंद त्यांनी कायम जोपासला. बंगाली रंगभूमीच्या कठीण कालखंडात त्यांनी ‘नाम जीबन’, ‘राजकुमार’ यांसारखी नाटकं दिग्दर्शित करून व्यावसायिकरीत्या ती यशस्वी करून दाखवली. महेश एलकुंचवारांच्या ‘आत्मकथा’च्या बंगाली रूपांतरातील त्यांची भूमिका विशेष गाजली. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील आपल्या सहकाऱ्यांच्या कारकिर्दीला दाद देणारे लेख त्यांनी लिहिले. आपल्या समकालीन, उत्तम कुमार सारख्या अभिनेत्याची लोकप्रियता त्यांनी खुल्या मनाने स्वीकारली. एकमेकांचे पाय ओढून वरचं स्थान टिकवण्याची धडपड करणाऱ्या कलावंताच्या भाऊगर्दीत सौमित्र चटर्जींचं हे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसायचं.

आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करत असताना, ‘अपूर संसार’मधील अपूची भूमिका त्यांनी स्वीकारली. सत्यजित राय यांच्या बरोबर काम करताना, आपल्यातील कलावंताला समृद्ध करता आलं, याची कबुली त्यांनी वेळोवेळी दिली. सुलेखनासारखी कला शिकण्याचं आणि त्यात प्रावीण्य मिळवण्याचं श्रेय, त्यांनी राय यांना दिलं. राय यांनी आपल्या चित्रपटांतून गेल्या दीडशे वर्षांत भारतीय समाजाच्या राजकीय व सामजिक जीवनात जी स्थित्यंतरं झाली आणि त्यांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर जो परिणाम झाला, त्याचा धांडोळा घेतला आहे. या चित्रपटांत प्रमुख भूमिका करताना सौमित्र चटर्जी यांनी दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला व्यक्तिरेखेचा आलेख दाखवण्यासाठी भारतीय संस्कृती, साहित्यिक परंपरा, इतिहास आणि आधुनिकीकरणामुळे बदललेली जीवनशैली, यांचा अभ्यास केला.

‘कलाकाराने आपल्या अभिनय कक्षेच्या बाहेर जाऊन सर्वंकष विचार करायचा असतो’ या तत्त्वावर दृढ विश्वास असणाऱ्या सौमित्र चटर्जींच्या सगळ्याच भूमिका संस्मरणीय ठरल्या. अंधश्रद्धा जोपासणाऱ्या जमीनदार वडिलांच्या दबावामुळे, आपल्या सुविद्य पत्नीची होत असलेली होरपळ हतबलतेने पाहणारा उमाशंकर (देवी), पारंपरिक घरातील बंदिस्त वातावरणातून चारुलताला बाहेर काढून तिला अभिव्यक्त होण्यास उद्युक्त करणारा संवेदनशील अमल (चारुलता), आपल्याच मस्तीत जगणारा रांगडा ड्रायव्हर नरसिंह (अभिजन), कुशाग्र बुद्धीच्या अपर्णाकडे आकर्षित झालेला, शहरी सभ्यता बाळगणारा असीम (अरण्येर दिन रात्री), करुणाच्या प्रेमाचा अव्हेर करणारा कचखाऊ अमिताभ रॉय (कापुरुष) आणि सत्यजित राय यांच्याच लेखणीतून साकारलेला चतुर आणि चाणाक्ष फेलुदा (शोनार किल्ला, जय बाबा फेलूनाथ) या सत्यजित राय यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी, सौमित्र चटर्जी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणा अभिनेत्याचा विचार करणं सुद्धा अशक्य आहे.

सत्यजित राय यांच्या चित्रपटांनी सौमित्र चटर्जी यांना अव्वल दर्जाचा अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं. राय यांच्या वलयामुळे आपल्यातील अभिनेता डावलला जातोय याची जाणीव होऊनसुद्धा, चित्रपटाचा कर्ता-करविता दिग्दर्शक असतो, या नियमानुसार त्यांनी राय यांचं श्रेय नेहमीच मान्य केलं. स्वतःतील कलावंताला जोखण्यासाठी तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या बरोबरीनेच त्यांनी, मृणाल सेन (आकाश कुसुम), तपन सिन्हा (जिंदेर बंदी) या राय यांच्या समकालीन दिग्दर्शकांच्या महत्त्वाच्या चित्रपटांतूनही भूमिका केल्या. तरुण मुझुमदार यांच्या ‘संसार सीमान्ते’ या चित्रपटातील भूमिका त्यांच्या स्वतःच्या पसंतीची होती. कालानुरूप अभिनय शैलीत बदल करून नवीन पिढीतील दिग्दर्शकांबरोबर त्यांनी सहज जुळवून घेतलं. अतनू घोष यांच्या ‘मयुराक्षी’मध्ये त्यांची प्रसन्नजीत बरोबरची अभिनयाची जुगलबंदी रंगली. ऋतुपर्णो घोषच्या ‘असुख’ आणि सुजय घोष यांच्या ‘अहल्या’ या राधिका आपटेची भूमिका असलेल्या गूढ लघुपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षणीय होत्या. सत्यजित राय यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या चित्रपटांतून अभिनय करूनसुद्धा, त्यासाठी एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, याची खंत त्यांना होती. वयाची सत्तरी ओलांडल्या नंतर सुमन घोष यांच्या ‘पोडोखेप’ (२००६) मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला; पण तोवर अशा पुरस्कारांचं अप्रूप त्यांना राहिलं नव्हतं.

आपल्या कामाला आणि तत्त्वांना त्यांनी नेहमीच प्राध्यान्य दिलं. आपल्या राजकीय मतांशी ठाम राहून त्यांनी आणीबाणीच्या काळात पद्मश्री पुरस्कार नाकारला. पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, फ्रान्स सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोत्तम कलाकार पुरस्कार, असे सन्मान त्यांना लाभले. परंतु जातीच्या कलावंताला प्रेक्षकांची दाद अधिक प्रिय असते, सन्मानाचे उपचार सुरूच राहतात. कलावंत गेल्यानंतरही त्याने साकारलेल्या भूमिकांची आठवण दीर्घकाळ येत राहते. सौमित्र चटर्जी यांच्या निधनाने अपूच्या संसाराची समाप्ती झालेली असली तरीही, या अपूचा निरागसपणा प्रेक्षकांच्या मनात कायम रेंगाळत राहणार आहे!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments