Home संपादकीय अम्लान: जाणिवांचा उत्स्फूर्त आविष्कार - book review amlan and ashadi bhakti sangeetachi...

अम्लान: जाणिवांचा उत्स्फूर्त आविष्कार – book review amlan and ashadi bhakti sangeetachi wari


अंजली कुलकर्णी

योजना शिवानंद यांचा ‘अम्लान’ हे नितांतसुंदर शीर्षक असलेला कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. त्याच दरम्यान ‘ग्रंथाली’नेच प्रकाशित केलेलं, उच्च निर्मितीमूल्य लाभलेलं ‘आषाढी : भक्तिसंगीताची रौप्य महोत्सवी वारी’ हे देखणं पुस्तकही हाती आलं. या दोन्ही पुस्तकांच्या वाचनातून योजना शिवानंद यांचं हरहुन्नरी, कलासक्त आणि आत्यंतिक संवेदनशील व्यक्तिमत्त्व नजरेसमोर साकार झालं.

तसं पाहिलं तर ‘अम्लान’ या कवितासंग्रहातील कविता जाणून घेण्यासाठी ‘आषाढी’ वाचणं आवश्यक नाही. परंतु त्यामुळे या कवितांच्या आकलनाचे काही अधिकचे पदर सापडले हे ही खरं! ‘अम्लान’ कविता वाचत असताना सुखदुःखाच्या पिळ्यांनी घडवलेलं, प्रेमानुभवाच्या सरोवरात यथेच्छ रमलेलं आणि सहचराच्या चिरविरहानंतरही भंग न पावलेलं असं एक ‘अम्लान’ प्रीतिमग्न कविमन दृग्गोचर होत राहिलं.

योजना शिवानंद या मुळात एक शास्त्रीय गायिका. प्रतिभावंत, ज्येष्ठ गायक आणि योजना यांचे दिवंगत पती, गुरू, मित्र असलेले पं. शिवानंद पाटील यांच्या बरोबरच्या संगीतध्यासाने भारलेल्या सहजीवनात, त्यांच्या प्रीतिपुष्पाला टवटवीतपणाचं चिरंतन वरदान लाभलं. त्या सहजीवनात काय नव्हतं? त्यात सर्वंकष जीवनानुभवाने व्यापलेले, सुखदुःखानं भरलेले, सुंदर क्षण होते, आशा-निराशेचे भलेबुरे प्रहर होते, संगीतनिष्ठेला वाहिलेले, संत साहित्याने भारावलेले ‘आषाढी’ ऋतू होते, नवसर्जनाचे बहर होते, अकस्मात अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्यवान दिवस होते.

दुर्दैवानं शिवानंद यांचं आकस्मिक निधन झालं; परंतु त्यानंतरही योजनाताईंची सांगीतिक धडपड तितक्यात जिद्दीने सुरू राहिली. पतीच्या जीवनध्यासाशी एकरूप झालेल्या योजनाताईंच्या संवेदनशील हृदयातून जणू सहचराचं अस्तित्वच स्पंद पावत होतं. ‘अम्लान’मधील कविता, अशा परस्परांत एकरूप पावलेल्या स्पंदनांची साक्ष देतात.

‘माझा एक आलाप तुझ्यात गुंजत होता'(आलाप)

असे त्या एकरूपतेचे एक रुप आहे आणि दुसरे रूप-

‘कोसळले तुझ्या नसण्याचे आभाळ

तरीही सांडत राहिले उरलेसुरले

गाण्यातून

भैरवी होऊनही गाणे संपले नाही

सूर राहिले गात दिशात दाही'(सुरांची नक्षी )

असे दुःखार्त, तरीही आनंदाने ओतप्रोत भरलेले आहे. या कवितेतील अशी दुःखार्त आनंदमय अवस्था वाचकाला मात्र मुळापासून गलबलून टाकणारी आहे. हा मन कोंदटून टाकणारा सुखदुःखाचा एकत्रित अनुभव विलक्षण वेगळा आहे. सहचराच्या विरहाने कवितागत प्रेमिकेवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे हे तर खरेच, पण कवयित्रीची जीवनसन्मुखता, तिचा कलानंद तिला कोलमडू देत नाही. ती त्याच्या आठवणींचा, त्याच्या स्वरस्वप्नांचा, स्वतःत विरघळून गेलेल्या त्याच्या अस्तित्वाचाच, एक सुंदर सोहळा साजरा करीत राहते. कवयित्री म्हणते-

‘अचानक मग स्वप्नांचं होतं सुंदर संगीत

संगीताची अवीट बहारदार मैफल

रात्रभर रंगत जाते आणि पहाटे…

उंबऱ्यापाशी पहाटेचे उजेडफूल घेऊन

समोर उभा तू

साक्षात की स्वप्नात…’ (स्वप्न )

अशी प्रेमिकेच्या मनाची संभ्रम चित्त अवस्था होते, ती कवयित्री नेमक्या शब्दांत टिपते.

योजनाताई ‘मी रूढ अर्थाने कवयित्री नाही’ अशी कबुली देतात. परंतु खरं पाहिलं तर, कुणीही व्यक्ती ‘कवी’ असं लेबल घेऊन जन्माला येत नाही. सुखदुःखाच्या आवेगात माणूस जे बोलत असतो, ते बोलणं अनेक वेळा कवितेपेक्षा वेगळं नसतं. दुःखाच्या कडेलोटात जीवनाचं विपरीत दर्शन झालेला माणूस कित्येक वेळा एखाद्या तत्त्वज्ञासारखं, एखाद्या प्रतिभावंत साहित्यिकासारखं बोलून जातो, तेव्हा त्याच्या नेणिवेतून त्याच्या आतला कवीच अभिव्यक्त होत असतो. योजनाताईंच्या कविता अशा नेणिवेतल्या संवेदनांतून शब्दाकृती धारण करून समोर येतात. त्यांची ‘तुझ्या स्वरातून’ ही कविता त्याची साक्ष पटवते. या कवितेत त्या लिहून गेल्या आहेत-

‘अंधारात फर्रर्रकन ओढलेल्या

तीन काड्या –

पहिली – तुझा चेहरा पाहण्यासाठी

दुसरी – तुझे डोळे पाहण्यासाठी

तिसरी – तुझे ओठ पाहण्यासाठी

आणि त्या विझून अंधार झाला की…

मी पाहीन तुला

तुझ्या स्वरांतून…’

ही कविता एक विस्मयचकित करणारा, संवेदनांचे रोमांच खडे करणारा काव्यात्म अनुभव देते.

या सर्व कवितांमधील चित्रमयता मनोवेधक आहे. गायिका असल्यामुळे स्वरांतून चित्र साकारण्याचा त्यांचा रियाज आहे; परंतु शब्दशैलीतून आत्म्याचे चित्र रेखाटण्याचा त्यांचा विभ्रमही विलोभनीय आहे. ‘सूर’ या कवितेत त्यांच्या या अनोख्या शैलीचे प्रत्यंतर येते.

‘सापडलाय एक सूर

पारिजातकाच्या फुलासारखा

अलगद ओंजळीत घेतलं त्याला

अगदी न सांडता लवंडता

धावत गेले गुरुंकडे

त्यांना म्हटलं सच्चा सूर

आणलाय

शिवालयाच्या गाभाऱ्यातल्या ओंकारासारखा’

या कवितेतील उत्स्फूर्तता, तरलता, संवेदनशीलता मनाला स्पर्श करणारी आहे. प्रेमभावनेतील समर्पणशीलता, हळुवारपणा, नाजूकता, सूक्ष्मता यांचा आविष्कार कवयित्री तितक्याच भावोत्कट भाषाशैलीतून करते.

या संग्रहातील सर्व कविता कवितेच्या रूढ निकषांच्या परे जाणाऱ्या आहेत. अर्थात कविता नेहमीच आकृतिबंधाच्या अंगाने परिष्करणास अनुकूल असतात. या कविता स्वगतासारख्या स्वतःशीच बोलल्याप्रमाणे अभिव्यक्त होतात. प्रेममग्न पक्षीमिथुनातील एकजण जखमी अथवा मृत झाला, तर त्याचा जोडीदार आकाशाला टवके काढणारा विलाप करतो, असा कविसंकेत आहे. या कवितांमधून अशा विलापाचे मूक स्वर ऐकू येतात. कित्येक वेळा कवितागत प्रेमिका सहचराच्या अस्तित्वाची चाहूल घेताना दिसते. या कवितांच्या ओळीओळींतून दुराव्याचं दुःख टपटपत राहतं; ओळीओळीतून तिच्या काळजाला झालेली जखम जाणवत राहते. हे तिचं चाहूल घेत राहणं, दुःखाचं टपटपत राहणं, काळजाला जखम होणं, हे सारं आपल्या संवेदनांपर्यंत पोहोचवण्याचं काम कविता करत राहते. कवितेचं हेच संचित असतं.

अम्लान (कवितासंग्रह)

कवयित्री : योजना शिवानंद

मुखपृष्ठ : उदय पटवर्धन, ब्रह्मानंद

प्रकाश : ग्रंथाली

पृष्ठं : ४२ + ८ रंगीत

किंमत : १५० रु.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Sandeep Kulkarni Shares View On Technology And World – एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही, तोवर त्याची किंमत कळत नाही- संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीपहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता. त्या काळात जगातल्या काही देशांना या महायुद्धांची चांगलीच धग लागली. पण, करोनाच्या...

Recent Comments