प्रा. चित्रे यांच्या व्यासंगाचा, संशोधनाचा परीघ फार विस्तृत होता. अनेक क्षेत्रांत त्यांना सखोल रस होता व गतीदेखील. तरीही सौर भौतिकशास्त्र व खगोल भौतिकी हे त्यांच्या जिज्ञासेच्या, संशोधनाच्या परिघातील ठळक बिंदू. पृथ्वीपासून १४.७१ कोटी किलोमीटर दूर असलेल्या सूर्याच्या प्रभामंडलात घडणारे बदल, त्यावरील बदलते डाग, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम हा प्रा. चित्रे यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय. त्या अभ्यासाला व जाणकारीला अनेकदा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दाद मिळाली. त्यासोबतच त्यांना दीर्घकाळ लाभलेली विद्यार्थिप्रिय प्राध्यापक ही दादही तितकीच महत्त्वाची. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेसमध्ये आत्ताआत्तापर्यंत शिकवण्याचे काम ते आनंदाने करीत. ‘जे जे आकळले, ते ते सांगितले’, अशी वृत्ती असल्याखेरीज हे शक्य नसते. ग्रहताऱ्यांच्या स्थितीगतीचा माणसाच्या जगण्यावर परिणाम होतो; अशी धारणा आजही मोठ्या प्रमाणात असलेल्या अखिल समाजात ग्रहताऱ्यांकडे वैज्ञानिक दृष्टीने, प्रश्नांकित नजरेने पाहण्यास शिकवणे सोपे नसते. ते सोपे नसणारे काम प्रा. चित्रे यांनी प्रदीर्घ काळ केले. पाय जमिनीवर ठेवून अंतराळात विज्ञानाच्या नजरेने रममाण होणारा असा हा अवकाशयात्री होता.