इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा शहीद असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे
नवी दिल्ली, 25 जून : जो कोणत्याही निष्पाप माणसाला मारतो, तो दहशवादीच आहे, असे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भाषा ओसामा बिन लादेन यांना मात्र शहीद ठरवण्यापर्यंत येते, हा इम्रान खान यांचा दुतोंडीपणा आहे. असा घरचा आहेर पाकिस्तानातील पत्रकार आणि स्तंभलेखक मोहम्मद ताकी यांनी केला आहे.
स्तंभलेखक ताकी यांनी ट्विटद्वारे इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी नेमके कुणाला म्हणायचे हे सांगणारा इम्रान पीटीआयच्या मुलाखतीतला व्हिडीओही ट्विटवर शेअर केला आहे. त्यात इम्रान खान जे निर्देषांचे, निष्पापांचे बळी घेतो तो दहशतवादी, असे स्पष्टपणे सांगत आहेत.
Anyone who kills innocent people is a terrorist said @ImranKhanPTI but Osama bin Laden is a martyr shaheed! The con man PM speaks out of both sides of his mouth pic.twitter.com/bjfmaX47F2
इम्रान खान यांनी अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा उल्लेख पाकिस्तानच्या संसदेत शहीद असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानी संसदेत भाषण करताना अमेरिकेने केलेल्या सैन्य कारवाईत ओसामा बिन लादेन हा शहीद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे, त्यावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. अशा स्थितीत पाकिस्तानातील स्तंभलेखक मोहम्मद ताकी यांनी जारी केलेला हा व्हिडीओ आणि केलेले वक्तव्य हे खूपच बोलके आहे.
पाकिस्तान सातत्याने त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना मुक्त संचाराची परवानगी देत असल्याचा आरोप यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिक आणि विचारवंतांनाही इम्रान खान यांची ही भूमिका पटलेली नाही, हेच दर्शवते आहे.