Home संपादकीय आपल्या जीवनशैलीचे काय?

आपल्या जीवनशैलीचे काय?


प्रा. एच. एम. देसरडा

हवामान व पर्यावरणाच्या दृष्टीने सध्याची टाळेबंदी उपकारक, इष्टापत्ती जाणवते. वातावरण स्वच्छ, शांत व सुंदर होत असून ध्वनी, धूळ, धुराच्या प्रदूषणात घट होत आहे. कर्ब व अन्य विषारी वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होत आहे. पर्यावरणीय व्यवस्थेत केलेल्या अविवेकी व अवास्तव हस्तक्षेपामुळे पृथ्वीची धारण क्षमता क्षीण होत असून मानवतेर सजीव सृष्टी पशुपक्षी, वन्यजीव यांवर मानवाच्या अतिक्रमणामुळे प्राणिजन्य विषाणूंचे संक्रमण होत असल्यामुळे करोनाचे (पॅन्डेमिक) भीषण संकट ओढवत आहे.

तात्पर्य, महामारी व हवामान बदलाचा एकत्र मुकाबला केल्याखेरीज तरणोपाय नाही. टाळेबंदीतून बाहेर पडताना याचा गांभीर्याने विचार व प्रत्यक्ष कृती केली तरच प्रचलित विळख्यातून सहीसलामत सुटका होईल. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद व पर्यावरणीय विध्वंस या प्रमुख समस्या असून त्याच्या निराकरणासाठी औद्योगिकरण, आधुनिकीकरण, तंत्रज्ञान नि जागतिकीकरणाचा मार्ग शोधण्यात आला. मात्र, या समस्या सुटण्याऐवजी गुंतागंतीच्या होत आहेत.

मुख्य म्हणजे सर्व प्राणिमात्रांचे भरणपोषण, जीवसृष्टीचे चक्र आणि पृथ्वीच्या एकंदर सुरक्षितता व पर्यावरणीय संतुलनाला प्रचलित वाढवृद्धीप्रवण विकासप्रणाली, नि अतिरेकी भोग-उपभोगवादी धोकादायक आहे. हे वास्तव नाकारून करोनोत्तर काळात प्रचलित उत्पादन व उपभोग, पद्धती आहे तशी जारी ठेवणे आत्मघातकी आहे. सरकार, समाज व प्रत्येक व्यक्तीने टाळेबंदीच्या सकारात्मक बाबीचा आवर्जून विचार करून आगामी विकासाची दिशादृष्टी आमूलाग्र बदलायला हवी! गांधीजींनी अधोरेखित केलेल्या ‘गरजा व हावहव्यास (नीड व ग्रीड) याची सीमारेषा चव्हाट्यावर आली आहे.

करोनापूर्वीच मंदावलेल्या (स्लोडाऊन) अर्थगतीमुळे मागणी रोजगार व विकासदरावर प्रतिकूल परिणाम होत होता. करोनाकाळात स्थलांतरिताच्या समस्येने विकासाच्या बाता किती बाष्कळ आहे याचा पर्दाफास झाला. भारताच्या १३८ कोटी लोकसंख्येपैकी शंभर कोटी लोक प्रतिकूल अवस्थेत गुजराण करतात. दारिद्र्य कुपोषण, बालमृत्यू, घरांचा अभाव, आरोग्यसेवेची व शिक्षणाची दुर्दशा आहे. याचा अर्थ भारताच्या नैसर्गिक व मानवी संसाधनात वानवा, खोट व कमतरता आहे असे नाही.

उलटपक्षी, भारताची ३३ कोटी हेक्टर जमीन, विपुल पर्जन्यजल, हिमवृष्टी, जैवविविधता, संपन्न कृषी-हवामान क्षेत्रे, विस्तीर्ण पीकरचना, वस्त्रकला, अन्य हुन्नर व कौशल्ये सर्वांच्या भरणपोषणाच्या गरजा सहज भागवू शकते. वस्तुत: भारत म्हणजे कास्तकारी व दस्तकारी (सर्वप्रकारचे हुन्नर व वस्तू निर्मिती आयाम) याद्वारे श्रमजीवी लोकांना पूर्णवेळ सुखी समाधानी जीवन व चरितार्थ सहज उपलब्ध होईल. यापुढे या ५० कोटी लोकांना पूर्ण वेळ उत्पादकीय रोजगार पुरविण्याची गरज आहे.

आज यापैकी २५ कोटीची श्रमशक्ती शेती व शेतीपूरक व्यवसायात पुरेसे उत्पन्न नक्कीच मिळवू शकते. बांधकाम व कंत्राटी कामगार क्षेत्रात हजेरीवर काम करणाऱ्या ग्रामीण व निमशहरी भागातील काम करणारांना कायमस्वरूपी उत्पादक व सर्जनशील कामाची तसेच चांगल्या जीवनमानवाची हमी देता येईल. हे क्षेत्रवार नेमके कसे करावे? हेच पुढे सुचविले आहे.

पहिले तर, भूमी व जलसंवर्धन आणि वनीकरण : आज भारतातील ६० टक्के भौगोलिक क्षेत्र म्हणजे २० कोटी हेक्टर क्षेत्र हे अवनत (डिग्रेडेड), क्षरण झालेले आहे. त्यासाठी, मनरेगासोबत सांधा जोडून लघुपाणलोट क्षेत्र निहाय ‘माथा ते पायथा असे जलसंवर्धन केल्यास १० कोटी श्रमिकांना हे काम रोजगार देऊ शकते. याच्या जोडीला योग्य प्रकारे भूमी नियोजन (लॅन्ड युज प्लानिंग) करून पोषणाच्या दृष्टीने सकस अन्न, फळे, भाज्या, दूध इत्यादी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केल्यास रासायनिक खते व कीडनाशकांचा खर्च तर वाचेलच; खेरीज लोकांना विषमुक्त अन्न मिळेल.

आजची हरितक्रांतीची शेती मानवाच्या व निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक आहे. सोबतच कसणाराची जमीन (लॅन्ड टू द टिलर) हे स्वातंत्र्य चळवळीचे उद्दिष्ट पुरे करण्यासाठी जमीनविषयक, कायद्यात सुधारणा केल्यास स्थलांतरास आळा बसेल. आत्मनिर्भरतेच हा पाया आहे! दुसरे आहे, सर्वांसाठी निवारा : या योजने तहत २०२२ पर्यंत ६ कोटी घरे बांधण्याचा कार्यक्रम आहे. आज किमान नऊ कोटी आरोग्यदायी घरे बांधण्याची गरज आहे. सध्या बांधकाम क्षेत्रात साडेपाच कोटी मजूर काम करतात. ते स्थलांतरित असून दयनीय अवस्थेत राहतात.

त्यातील हुन्नरी, निमहुन्नरी लोकांची नोंदणी करून नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे रोजगार पुरवावा. तिसरे म्हणजे, मानव विकास सेवा सुविधा : शिक्षण व आरोग्यसंस्थासाठी योग्य बांधकामे. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी वर्गखोल्या, सभागृहे, क्रीडांगणे, सर्वसेवायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यासाठी योग्य त्यावस्तू व परिसर व्यवस्था उभी करणे.

यापुढचे आहे ते परिसर व समाज विकाससाधने : खेडेगाव, तांडे असो की शहरातील गरीब मोहल्ले, श्रमिक वस्त्या, झोपडपट्ट्या येथे व्यक्तिगत निवारा, घरे, घरकुल यांचे सोबतच सामाजिक वापराची दालने (कम्युनिटी फॅसिलिटी) उभारण्यासाठी स्थानिक साहित्य वापरून, श्रमसघन संसाधने वापरल्यास रोजगार उपलब्धता कैकपटीने वाढेल.

यानंतर, अक्षय ऊर्जा विकास : सौर, पवन व अन्य पुर्ननिर्माण (रिनेवेबल एनर्जी) क्षेत्रात रोजगाराला वाव आहे. नैसर्गिक व मानव संसाधने वापरून शेती, शेतीपूरक, आरोग्यविषयक, शैक्षणिक व सामाजिक पायाभूत सुविधा बळकट करणारे पाणलोट क्षेत्र विकास तसेच बांधकामाद्वारे वास्तुनिर्माण व नूतनीकृत ऊर्जानिर्मिती केल्यास २० कोटी लोकांना शाश्वत रोजगार पुरवला जाऊ शकतो.

त्यानंतर जी मत्ता निर्माण होईल त्यात रोजगार व स्वयंरोजगार वृद्धीचा मार्ग खुला होईल. हे सर्व रोजगार आर्थिकदृष्ट्या कमी खर्च व अल्प गुंतवणुकीचे असून पर्यावरणस्नेही आहेत. देशाचे उत्सर्जन, कर्ब पदचिन्ह (फूटप्रिन्ट) यामुळे लक्षणीय प्रमाणात कमी होऊन समतामूलक शाश्वत विकासास चालना मिळेल.

आता कोणते उत्पादन सुरू होऊ नये याचा धावता निर्देश करूया. मद्यार्क अर्थात विविध प्रकारची व नामाभिधानाची दारू तसेच तंबाखूजन्य उत्पादन तात्काळ बंद करण्यात यावे. यापुढे रस्त्याऐवजी रेल्वेवाहतुकीस प्राधान्य देऊन रस्त्यांवरच्या प्रवासी व मालवाहतुकीस बंधने घातली पाहिजेत. डिजीटल तंत्रज्ञानामुळे घरून काम शक्य आहे; तसेच सभा बैठकांसाठी प्रवास टाळलाच पाहिजे.

शिक्षणासह अनेक क्षेत्रात इंटरनेटचा वापर करून अनाठायी प्रवास लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. वाणसामानासह अनेक पुरवठा सेवा घरपोहच केल्या जाऊ शकतात. प्रत्यक्ष रचनात्मक काम सेवा-श्रुषासेवा सोडून सर्व काही इ-माध्यमाने संचलित केल्या जाऊ शकते. हे टाळेबंदीने सिद्ध केले! सारांश, सध्याच्या भांडवली, तथाकथित समाजवादी, सरकारी, तसेच व्यापारी बांडगुळी रोजगारांना सोडचिठ्ठी देऊन उत्पादकीय सर्जनशील रोजगार हेच खासगी व समाज व सार्वजनिक व्यवस्थेचे स्वरूप असावे. करोनाचा संदेश : अब यह करोना…

(लेखक पर्यावरणीय अर्थतज्ज्ञ, तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Mumbai local train: ‘सर्वांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी तरी लोकल ट्रेन सुरू करा’ – kalyan-kasara railway passengers welfare association demands to allowed students for travels...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के...

Recent Comments