Home शहरं कोल्हापूर आमचं ठरलंय...भाजीच खायची....

आमचं ठरलंय…भाजीच खायची….म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजी मंडयांत खरेदी करण्याऐवजी गल्लीत आलेल्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन वारंवार करूनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करत लक्ष्मीपुरी, शाहूपुरी मार्केटमध्ये रविवारी गर्दी केली. सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडवत लक्ष्मीपुरी धान्य मार्केट आणि शिवाजी मार्केटमध्ये मिरचीसह किराणा माल खरेदीसाठीही गर्दी झाली होती. त्यामुळे तुम्ही कितीही आवाहन करा, ‘आमचं ठरलंय…भाजी खायचीच’ असा अवसानघातकी हट्ट नागरिकांनी धरल्याचे दिसत आहे.

सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न होऊनही नागरिकांनी लक्ष्मीपुरी येथे भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. बॅरिकेडस् लावून प्रभागाच्या सीमा बंद केल्यानंतर गल्लीबोळातून मार्ग काढत लक्ष्मीपुरीत नागरिक खरेदीसाठी आले होते. भाजी विक्रेत्यांसमोर गराडा पडला होता. त्यामुळे करोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतानाही नागरिक तो पत्करत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने वाहने घेऊन आले होते. एकीकडे आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी पेट्रोलची विक्री होत आहे असे प्रशासन सांगत असले तरी नागरिकांच्या वाहनांच्या संख्येवर पेट्रोल मुबलक मिळत असल्याचा पुरावा दिसत होता. आठवड्याचा बाजार एकत्र खरेदी करण्याची कोल्हापूरकांची पद्धत घातक ठरत आहे. खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य कामगार, मजुरांबरोबर अनेकजण सहकुटुंब आले होते. भाजी खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे, असे प्रशासनाने आवाहन करूनही सहकुटुंब खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

प्रशासनाने हातगाडीवरून भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. गल्लोगल्ली भाजी विक्री सुरू असतानाही मंडई परिसरात नागरिक फेऱ्या मारताना दिसत होते. भाजी विक्रेतेही एक ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी भाजी विकत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. गंगावेश परिसरातील भाजी विक्री बंद झाल्यानंतर पंचगंगा नदी परिसरातही मंडई भरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाला दक्ष रहावे लागत आहे.

माशांची होम डिलव्हरी

फिश मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मासे विक्रेत्यांनी होम डिलिव्हरी द्वारे विक्री केली. पापलेट, सुरमाई, बोंबील यासह अन्य प्रकारांच्या माशांची विक्री करण्यात आली. शनिवारी ऑर्डर नोंद केलेल्या ग्राहकांना रविवारी सकाळी दहापर्वीच घरपोच मासे पोहोच केले, अशी माहिती सलगर फिश दुकानाचे मालक सुनील सलगर यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments