Home संपादकीय आषाढी एकादशी: रखमाय रुसली, अन् कायमची अंतरली! - vitthal rakhmai story on...

आषाढी एकादशी: रखमाय रुसली, अन् कायमची अंतरली! – vitthal rakhmai story on ashadhi ekadashi


मुकुंद कुळे

विदर्भराज भीमकाची कन्या रुक्मिणी कृष्णाची पट्टराणी झाली खरी, परंतु मराठी जना-मनाला ती खऱ्या अर्थाने भावली, ती आमच्या विठोबाची रखमाय म्हणूनच! कृष्णाची रुक्मिणी सालस, सात्त्विक निरहंकारी आणि उदार मनाची; तर आमची लोकपरंपरेतली रखमाय रागीट, कोपिष्ट, संशयी, भांडकुदळ, एकदम ताड की फाड… कोणी म्हणेल देवता म्हणून काही आब असावा की नाही माणसाला? पण अलौकिक देवत्व मिरवायचं असेल तर ते कृष्णाच्या रुक्मिणीनं जरुर मिरवावं, आमच्या विठोबाची रखमाय आहे तशीच बरी, लौकिक जनलोकातली. कारण ती आहे लोकप्रतिनिधी घराघरातल्या आयाबायांची.

कुटुंब टिकावं, संसार टिकावा म्हणून परिस्थितीशी किती झगडत असतात महिला! नवरा कसाही असो पण नावाला लागतोच, म्हणत सारं सहन करतात… पण जेव्हा अगदीच असह्य होतं, डोक्यावरून पाणी जातं; तेव्हा होते एखादी वेगळी. पडते घराबाहेर… आमच्या रखमायसारखी! शेवटी तिचा काही मान-सन्मान आहे की नाही?… मात्र एकदा का ती घराबाहर पडली की झाल्या यांच्या चर्चा सुरू- रखमाय रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला!पण कोणीही झालं तरी एकदम एवढं टोकाचं पाऊल उचलत नाही. कितीतरी पाणी पुलाखालून वाहून गेल्यावरच, एखादी असं पाऊल उचलते. रखमायने तेच केलं. तिला किती तो जाच विठोबारायाच्या भक्तांचा. रात्र नाही की दिवस नाही, भक्तांची वर्दळ चालूच.

कुणी प्रत्यक्ष भेटायला येणार, तर कुणी स्वप्नात येणार… पण कुणी कसंही येवो, हा आपला त्यांच्यामागे मदतीला धावायला तयार… कुणाचा मळा राख, कुणाची गुरं राख, कुणाची माती मळून दे, कुणाची वाकळ धुऊन दे… पण हे सारंही परवडायचं रखमायला. आहेत देवाचे भक्त, तर देवपण निभावण्यासाठी त्याला ते करायलाच हवं म्हणत बिचारी गप्प बसायची. पण हे सारं करून येऊन तो घडीभर कुठे टेकतो न् टेकतो, तोच त्या विठाई-गोणाई-राजाई कोण कोण त्याचा धावा करायला सुरुवात करायच्या… त्यांचा धावा म्हटला की स्वारी एका पायावर तयारच असायची. त्या तरी कशा… लग्नाचा नवरा घरी असला, तरी त्यांना सखा-मित्र-बाप-बंधू आणि क्वचित माता म्हणूनही विठुरायाच हवा असायचा.

त्यांच्या आत्मनिर्भरतेची समाप्ती विठोबापाशीच व्हायची.यातच एक होती ती जनाई! म्हणायला नामयाची दासी जनी, पण सदान् कदा ओठांवर नाव विठुरायाचं… कपडे धुवायला चंद्रभागेवर गेली, गेलं देवाला निमंत्रण, सारवायला बसली केला देवाला हाकारा, अगदी न्हायला बसली तरी तोंडी विठुरायाचेच नामस्मरण. देवही जणू तिच्या या आमंत्रणाची वाटच बघत बसायचा, आलं बोलावणं की असेल तसा निघायचा- तिचे कपडे धुवायला, तिला सारवायला मदत करायला आणि अगदी डोक्यावरून गरमगरम पाणी घालून तिला न्हाऊमाखू घालायलाही… अशा वेळी तुम्ही जनीला ढीग म्हणाल देवाचं मायेचं पाखरू.

रखमायच्या मनाला आग लागल्याशिवाय कशी राहील? एवढी वर्षँ देवाचा संसार केला, देवाने तिला कधी घरकामात मदत केली नाही की तिची कधी वेणीफेणी केली नाही. मग ती म्हणणारच ना-ती कोण मेली जनी का बनीतिची कशी केली येणीफणीदळणकांडण करून गेला, लुगडी धुवायला…… तर असं काही मनात साठत साठत गेलं असणार आणि म्हणूनच आमची रखमाय रुसली असणार. तिने काय कमी प्रयत्न केले असणार का घर सांधायचे, घर राखायचे? पण सगळीकडून कायकाय कानावर यायचं… कधी जनाबाई, कधी तुळस, कधी कान्होपात्रा, तर कधी आणखी कुणी… मग काय तिचे शालजोडीतले टोमणे ठरलेलेच असायचे.

म्हणायची कशी-रखमाय म्हणे देवा, तुम्हा जनीची लई गोडीएवढी हौस असेल, तर बांधून द्या जा माडी…एकदा देवाला भूक लागली असेल म्हणून रखमायनं एक भांड्यात केळं चांगलं कुस्करलं आणि त्यात साजूक तूप-दूध-साखर टाकून मस्त शिकरण केलं, तर देव घरचं सोडून जनीकडे शिळं ताक प्यायला गेला. मग रखमाय फणकारलीच-रुक्मिणीने केलं निरशा दुधामंदी केळंअन् देवाला आवडलं जनाबाईचं ताक शिळं…… आणि एकदा तर देव रातीला जनीच्या घरी गेला आणि सकाळी येताना आपला शेला तिच्या घरी ठेवला नि तिची कांबळ स्वतःच्या खांद्यावर टाकून आला. आता कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी या सगळ्या खुणा कळतातच बाईमाणसाला. मग रखमाय बोलणार नाही तर काय-जनी पांघरी भुईवर देवाची लाल शालदेव आणी घरी तिची फाटकी कांबळ…जनीबरोबर हे सारं सुरू असताना मध्येच तुळशीविषयी काहीबाही ऐकू यायचं.

लोकही बोलायला लागले की चार तोंडानं बोलतात. मग ते पोचायचंच रखमायपर्यंत. त्याच्याने पारा चढलेला असतानाच देव कधी आले, तर त्यांच्या शेल्याला नेमका काळा डाग पडलेला असायचा. मग काय-रखमाय बोलती, देवा तुमचा येतो रागतुळशीची काळी माती, शेल्याला पडला डाग…देव गेला असेल भक्तांना मदत करायला, मात्र रखमायने एवढं सगळं थेटच विचारल्यावर देव कावराबावरा झाल्याशिवाय कसा राहील… अर्थात तोही अशा वेळेला काही थातुरमातुर उत्तर देतच असणार… पण असं किती काळ चालणार? शेवटी रखमाय रुसली आणि घर सोडून निघाली……जनमानसातल्या संसारात असंच होत असणार ना? कधी ती स्वतःहून बाहेर पडत असेल, तर कधी तिला नेसत्या कपड्यांनानिशी घराबाहेर काढलं जात असेल.

मग या बायका कृष्णाच्या रुक्मिणीमध्ये नाही, पण रखमायमध्ये स्वतःला पाहतच असणार ना!आपण जनाबाई, तुळस, कान्होपात्रा, विठाई, गोणाई यांचं विठोबाशी असलेल्या नात्याकडे भक्तिभावाने पाहतो, त्याला आध्यात्मिक प्रेमाचा सुरेख मुलामाही देतो. पण वास्तव आयुष्यात जगताना नवऱ्याच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या स्त्रीकडे एवढं तिऱ्हाईतपणे, तटस्थपणे पाहता येत नाही. म्हणूनच तर लोकवाङ्मयात रखमाय रुसण्यामागचं एक कारण म्हणून विठुराया आणि जनीच्या-तुळशीच्या नात्याकडे बोट दाखवलं गेलं आहे. प्रत्यक्षात पुरुष संत काय किंवा स्त्री संत काय, साऱ्यांशीच विठुरायाचं असलेलं नातं हे आभासी होतं.

हे संत देवाशी एवढे तादात्म्य पावले होते की, त्यांना आपल्या प्रत्येक कृतीत देव आपल्याबरोबर आहे असंच वाटे. तेव्हा विठुरायाची रखमाय नेमकी कशावरून रुसली ते कुणास ठाऊक, पण तिच्यामध्ये सर्वकालीन महिलांनी आपली व्यथा पाहिली आणि तीच गाण्यात मांडली एवढं मात्र नक्की!…आणि रखमाय रुसण्याचं निमित्त काही का असे ना, पंढरपुरात विठोबा-रुक्मिणी एकत्र नाहीत, हे तर खरंच आहे ना! कुणी का प्रयत्न केले नाहीत, कधी त्यांना एकत्र आणण्याचे? मग तिथे समाजपुरुषाचा पुरुषार्थ आड आला की रखमायचं असं रुसून निघून जाणं, सोयीचं झालं?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chatting on whatsapp: ऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन – amazing trick of chatting on whatsapp while offline, no one...

नवी दिल्लीः Whatsapp वर खूप सारे फीचर्स मिळत आहेत. परंतु, एका फीचरची उत्सूकता संपत नाही. जर तुम्हाला उशीरा रात्री पर्यंत चॅटिंग करण्याची सवय...

chandrakant patil: Chandrakant Patil: ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी… विरोधकांना ‘हा’ डोस घ्यावाच लागतो!’ – chandrakant patil targets shiv sena and maha vikas aghadi

पंढरपूर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले...

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Recent Comments