Home संपादकीय आस्थेने वाढावा परीघ...

आस्थेने वाढावा परीघ…अवघे मराठीजन मराठी भाषेचा अभिमान मिरवतात; पण हा अभिमान केवळ तेवढ्यापुरताच आहे की काय, असा प्रश्न शालेय शिक्षणात या भाषा विषयाची सक्ती नसलेल्यांना पडायचा. अखेर यंदाच्या सत्रापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक झाली आहे. यंदा पहिली ते सहावीपर्यंत आणि नंतर दर वर्षी एक, याप्रमाणे दहावीपर्यंत ही सक्ती लागू होईल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय तत्परतेने घेतला. आतापर्यंत मागणीचा पाठपुरावा आणि ‘हो करू’चा राजकीय रेटा, असे अनुभवास येत होते. या विषयीचा शासन निर्णय परवा जारी झाला. तो होण्यास महाराष्ट्र साठ वर्षांचा व्हावा लागला. हे सारे मागे सोडून आता पुढे जायला हवे. याउपरही मराठी भाषेविषयी नाक मुरडणाऱ्या शाळांना हा विषय अजूनही लादलेला वाटू शकतो. अशा शाळांचा कल पाट्या टाकून ‘अभ्यासक्रम’ पूर्ण करण्यापुरता मर्यादित राहू शकतो. तसे मात्र होऊ नये. हा भाषाविषय सक्तीचा म्हणून केवळ गुणांपुरता मर्यादित राहू नये. एक सुयोग्य निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाची सकारात्मक अंमलबजावणी अपेक्षित आहे. विशेषत: या विषयाच्या कधीही वाट्याला न गेलेल्या शाळांकडून ही अपेक्षा जास्त आहे. अशा काही शाळा याबाबत उत्तम कामगिरी बजावू शकतात. आधीपासून मराठी विषय शिकविणाऱ्या शाळा तुलनेत मागे राहू नयेत. अशा मराठी शाळांची खरे तर उमेद वाढायला हवी. मराठी भाषेत नाना परींचे सौंदर्य आहे. भाषेची गोडी लागली, की तिचे सौंदर्य उलगडत जाते. भाषेच्या शिक्षणात अशा अनेक शक्यता असतात. मराठी भाषा निराश करीत नाही. इतिहासातही या भाषेने निराश केले नाही आणि भविष्यातही करणार नाही, हा दुर्दम्य आशावाद मराठी मनांमध्ये आहे; पण इतरांसाठी मराठी, माझ्यासाठी माझ्या आवडीचे हेही चालणार नाही. शासकीय निर्णय झाला, याचा अर्थ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सर्व हक्क शासनच राखून ठेवते, असा समज नको. मराठी टिकावी म्हणून झटणाऱ्यांनी आता पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने सक्रिय राहायला हवे. आस्थेने मराठीचा परीघ वाढविण्याची ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे. तो वाढवत असताना अधलेमधले नकारात्मक कप्पे गळून पडावेत आणि मराठीचा जागर होत राहावा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments