Home संपादकीय एका सर्जनाचा अंत

एका सर्जनाचा अंत


उंचच उंच इमारत अकस्मात अंगावर कोसळून पडावी तसं मला हे रत्नाकरचं जाणं. शरीराची आणि लेखनाची शिस्तबद्ध निगराणी करणाऱ्या रत्नाकर सारख्या व्यक्तीला हा करोना हात लावायलाच धजलाच कसा? काहीच कळेनासं होतं. सगळ्या दिशाच धुक्यात जातात. सगळं खोटं वाटतं.
किती सायंकाळ, किती रात्री… त्याच्या नाट्यवाचनात, चर्चेत घालवल्या याला गणती नाही. सगळ्या आक्षेपांना आणि प्रश्नांना त्याच्याकडे चोख उत्तरं असत. करोनाबाबत फोनवरून त्याच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा म्हणला होता- ‘आपण आपलं काम करीत राहायचं.’ त्याच्या बाबतीत अक्षरश: खरंच होतं ते. यशापयशाची पर्वा न करता आणि टीका मनावर न घेता, त्याचं लेखनकार्य सतत प्रवाहित होतच होतं. त्या लेखनाला आणि संबंधित कार्याला कधीच त्याने विराम दिला नाही. अलीकडेच त्याने म. गांधीच्या अखेरच्या दिवसांवर नाटक लिहिलं होतं आणि कलावंतांना घेऊन त्याच्या अभिवाचनाचे प्रयोग करण्यात तो दंग असायचा. अधिकाधिक लोकांपर्यंत हे नाटक पोचावं, त्यांचे गांधीजींबद्दलचे गैरसमज दूर व्हावे म्हणून तो कमालीचा प्रयत्नशील होता. श्रोत्यांचा या अभिवाचनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं पाहून तो खूप हर्षभरित झाला होता. तो सततच उत्साहाने आणि चैतन्याने मुसमुसलेला असायचा. लॉकडॉउनच्या सुरुवातीलाच त्याने संजय नार्वेकरला घरी बोलावलं होतं. ‘अदृश्य माणूस’ या नाटकाच्या तालमी घेऊन ते त्याला रंगमंचावर आणायचं होतं. दिग्दर्शनाच्या सूचनांसह त्याने रंगावृत्ती तयार केली होती.

शंभरहूनही अधिक पुस्तकं लिहून आणि अर्ध्याशतकाहून अधिक नाटकं लिहूनही तो तृप्त नव्हता. मला अजून खूप लिहायचं आहे. खूप काही करून दाखवायचं आहे, असा त्याचा ध्यास असायचा. इतकं विपुल, विविध आणि आशयघन लिहिणारा साहित्यिक-रंगकर्मी मी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिला नाही. माझ्यासाठीच काय, पण सर्वच मराठी रसिकांसाठी त्याचं लेखन म्हणजे, अचंबित करणारं सर्जन होतं. तो नुसताच लिहून मोकळं होणारा लेखक नव्हता. लिहिलेली अक्षर जिवंत करण्यातही तो तेवढाच उत्साही असायचा. कागदावरचं नाटक रंगमंचावर आल्यानंतरच त्याचं वर्तुळ पुरं व्हायचं.

साहित्यातलं असं एकही क्षेत्र नव्हतं की त्यात रत्नाकरचा ठसा नव्हता. कादंबरी, नाटक, बालनाट्य, गूढकथा, स्तंभलेखन, ललित निबंध, राजकीय-वैचारिक लेखन ही सर्व क्षेत्रं तर त्याने पादाक्रांत केलीच होती, पण दिग्दर्शन, चित्रपट, मालिका या क्षेत्रांतही त्याला भरघोस यश मिळालं होतं. विनोदी वा फार्सिकल नाटकांचा अपवाद वगळला, तर त्याच्या प्रत्येक नाटकातून तीव्र सामाजिक जाण खदखदत राहायची. वर्तमान सामाजिक वा राजकीय समस्यांवर यशस्वी नाटक लिहिणारा मामा वरेरकरांनंतरचा हा दुसरा नाटककार!

त्याने दलितांवरील अत्याचारावर नाटक लिहिलं, भ्रष्टाचारावर लिहिलं, घटस्फोटित स्त्री हादेखील त्याच्या नाटकाचा विषय होता. पौगंडावस्थेतील मुलाची मानसिकता, दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व, एड्स झालेल्याची आणि त्याच्या पत्नीची मनोवृत्ती, अशा अनेक ज्वलंत विषयांनी समृद्ध होणारं त्याचं नाटक सर्वस्वी वेगळं आणि भेदक होत असे. केवळ रंजनासाठी रंजन हा त्याचा नाटक लिहिण्यामागचा हेतू कधीच नव्हता. कुठल्याही प्रथितयश नाटककाराने हाताळले नाहीत, अशा विषयांवरचे नाटक उभे करण्याचे धाडस करणारा हा एकमेव नाटककार, विषयाप्रमाणे त्याच्या नाटकाची शैली वेगळं रूप घ्यायची. त्यामुळेच अन्य मान्यवर नाटकांमधला नाटककार पटकन दिसायचा, तसा रत्नाकर दिसायचा नाही. खरोखरीचा तो नाटकातला अदृश्य माणूस होता.

नाट्यलेखनाच्या तांत्रिकतेवर त्याची कमालीची पकड होती. वसंत कानेटकरांनंतर असा काटेकोरपणा अन्य कुठल्याच नाटककारात नव्हता. तो स्वत: उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे त्याच्या नाट्यविषयाची मांडणीच एवढी शिस्तबद्ध असायची की सादरीकरण करणाऱ्याला दुसरं काही करावचं लागत नसे. ‘लेखकाला आपण निर्माण केलेल्या प्रत्येक पात्राबद्दल आत्मीयता हवी’ असं तो म्हणायचा. त्याच्या नाटकात हे प्रकर्षाने जाणवायचं, त्याची ही वृत्ती त्याच्या नाट्यबाह्य वागणुकीतूनही दिसून यायची. दूरध्वनीवरून सगळ्यांची वास्तपुस्त तो हेळवेपणाने करीत राहायचा. नाटककार किंवा साहित्यिक म्हणून तो जेवढा मोठा होता, तेवढाच माणूस म्हणूनही मोठा होता. त्याच्या साहित्यकृतींचे योग्य मूल्यमापन होईल तेव्हा होईल, पण एक नक्की तो साहित्यातून वा साहित्याबाहेरूनही कधीही प्रतिगामी झाला नाही. पुराणवादी झाला नाही. प्रकाशित साहित्यएवढेच त्याचे अप्रकाशित लेखनही विपुल आहे. हे सर्व कसे आणि कोठून येते हा त्याच्याबाबतीतला मला पडलेला कायमचा प्रश्न आहे. त्याच्या लेखन शिस्तीत हे गूढ लपलेलं असावं.

करोनानं त्याला कोठच्या निसटत्या क्षणी गाठलं कळत नाही, हा माणूस आपल्यावर नाटक लिहून आपलं भयच कमी करून टाकेल या भीतीने तर करोनानं रत्नाकरला विळखा घातला नसावा ना?

एक अखंड सर्जनाचा स्रोतच ठप्प झाला, मी भिजून गेलो!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments