Home मुंबई नवी मुंबई एनएमएमटीचे कर्मचारी वेतनाविना

एनएमएमटीचे कर्मचारी वेतनाविनाम. टा. वृत्तसेवा, ठाणे

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागात १० ते १२ वर्षांपासून चालक-वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिने वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार करण्यात आली असून कामगार आयुक्तांच्या वेतनाबाबतच्या निर्णयाचे नवी मुंबई महापालिकेने उल्लंघन केल्याचा आरोपही परिवहन चालक व वाहकांनी केला आहे.

नवी मुंबई परिवहन विभागात नवी मुंबई तसेच मुरबाड, शहापूर, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, ठाणे ग्रामीण भागातील अनेक तरुण मुले गेल्या १० ते १२ वर्षांपासून रोजंदारी पद्धतीवर चालक-वाहक म्हणून कार्यरत आहेत. नवी मुंबई परिवहन विभागात ६५० चालक आणि ७०० वाहक कर्मचारी आहेत. यामधील १५० कर्मचारी केवळ अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत आहेत. या लॉकडाउन काळात केवळ ५० बससेवा सुरू आहेत, त्यामुळे आवश्यक असेल तरच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. २० मार्च रोजी कामगार आयुक्तांनी लॉकडाउन काळात वेतन कपात न करण्याबाबत निर्णय घेतला असला तरी नवी मुंबई महापालिकेने या निर्णयाचे उल्लंघन केल्याची तक्रार लक्ष्मण सानप, रघुनाथ म्हात्रे, अमर भगत, विवेक घाटगे, केतन दळवी या कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच कामगार आयुक्तांना केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महापालिकेच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाच्या संकटात विनावेतन रहावे लागत आहे, असे म्हणणेही त्यांनी मांडले.

जे कर्मचारी कामावर रुजू होते, त्यांनाच वेतन देण्यात आले असून जे कामावर असतील त्यांना वेतन देण्याचा निर्णय हा ठाणे, मुंबई महापालिकेनुसार घेण्यात आला आहे. ज्यांना कामावर येऊनसुद्धा वेतन मिळाले नाही, त्यांचा प्रश्न मार्गी लावू.

– शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महापालिकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments