पुणे : ‘वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत प्रथमच पादुका एसटीने पंढरपूरला न्यायचे ठरले आणि त्या एसटीचे चालक म्हणून सारथ्य करायची संधी मला मिळाली. माझ्या एसटी खात्यातील अवघ्या पाच वर्षे सेवेचे सार्थक झाले,’ अशा भावना व्यक्त केल्या ‘त्या’ सेवेचे मानकरी ठरलेले तुषार काशिद यांनी.
दर वर्षी लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीसाठी नेणाऱ्या एसटी महामंडळाला यंदा संतांना विठ्ठलभेट घडविण्याच्या सेवेची संधी मिळाल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड येथील एसटी आगारातील बस सज्ज करण्याचे काम सुरू झाले. सोमवारी दुपारी वाहतूक नियंत्रकांनी आगारातील चालक तुषार काशिद यांना या बसची जबाबदारी दिली आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘अक्षरशः उर भरून आला,’ अशी भावना काशिद यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
काशिद हे मूळचे बारामती तालुक्यातील असून, दर वर्षी वारी सोहळा त्यांच्या तालुक्यातून जात असतो. त्यांचे चुलते स्वतः वारकरी आहेत. त्यामुळे वारकरी सेवा त्यांच्या घरात असतेच. यंदा थेट माउलींच्या सेवेची संधी मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे ते म्हणाले.
‘सोमवारी ही बातमी मी माझ्या वडिलांना सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आजपर्यंतच्या वारकरी सेवेचे फळ म्हणून ही संधी मिळाली,’ अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्याचे काशिद यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून एसटीमध्ये मी सेवा करीत आहे. इतक्या तरुण वयात अशी संधी मिळाल्याने जन्मभरासाठी या सेवेचे सार्थक झाल्याचे बोलताना तुषार यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले.
‘एसटीला मान मिळाल्याचा आनंद’
पालखी सेवेची संधी मिळाल्यानंतर एसटी मार्गस्थ होताना पिंपरी-चिंचवड आगारातील काशिद यांचे सहकारी आवर्जून या वेळी उपस्थित होते. या आधी आषाढी वारी आणि एकादशीच्या काळात लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीसाठी एसटी घेऊन जात असते. यंदा थेट संतांना विठ्ठलभेटीसाठी नेण्याचा मान एसटी महामंडळाला मिळाल्याचा मनस्वी आनंद झाल्याची भावना एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केली.