Home संपादकीय ऐक... टोले पडताहेत!

ऐक… टोले पडताहेत!


पासष्ट वर्षे सतत लिहित आलेला लेखक त्याच्या प्रत्येक भेटीत सध्या तो नवे काय लिहित आहे यावरच जास्त बोलतो. नव्या नाटकासंबंधी त्याच्या काय कल्पना आहेत यावर चर्चा करतो. चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे, पटकथाही तयार आहे; परंतु मनाजोगता निर्माता मिळत नाही, म्हणून खंतावतो. आपल्या गूढकथांमध्ये अनेक वेबसीरीज दडल्या आहेत, कुणाला करायच्या असतील, तर मी चर्चा करीन म्हणून सांगतो. ठाण्यातील झोपडपट्टीत मुलांना एकत्र करून, ‘वंचितांचा रंगमंच’मधून त्यांच्यावर नाटकाचे संस्कार करतो आणि त्या मुलांविषयी काही तरी छापून यावे म्हणून धडपडतो. साहित्य निर्मितीचा प्रपात साडेसहा दशके अखंड वाहत आलेला असूनही त्याचा वेग मंदावलेला नाही, नादही कमी झालेला नाही. व्यक्त होण्याच्या सर्व शक्यतांना, सर्व माध्यमांना हाताशी धरून भिडू पाहणाऱ्या अशा या उमद्या लेखकाला करोनाच्या अदृष्य हातांनी ओढून नेले. जणू त्यांचा अंतही त्यांच्याच एखाद्या गूढकथेच्या शेवटातून साकारला असावा. या आठ अक्षरांनी विपुल लेखनातही, वैविध्यातही प्रयोगशीलता कशी राखता येते, याचा मानदंडच साहित्य-नाट्य क्षेत्रात घालून दिला आहे. प्रायोगिक नाटक, बाल रंगभूमी, व्यावसायिक नाटक, गूढकथा, कादंबरी, चित्रपट, मालिका अशा प्रत्येक माध्यमातून मनसोक्त व्यक्त होऊनही, नव्या नव्या कल्पनांनी त्यांचा सतत ताबा घेतलेला असे. प्रत्येक वेळी ते नवनव्या कल्पनांनी झपाटलेले असत. नाव, पैसा, प्रसिद्धी, यश यांचे तुरे खोवून झाले, की अनेकदा प्रतिभेची नदी आटते. त्या नदीचे रिकामे पात्र भूतकाळाच्या पुरांमध्येच रमते. रत्नाकर मतकरींनी प्रसिद्धी, यश यांचा आनंद घेतला; परंतु त्यांच्यातले ‘असमाधान’ सतत उद्याकडे बोट दाखवत राहिले, ‘काल’चे समाधान काळाच्या कपाटात बंद करून ठेवण्यास भाग पाडत राहिले.

बालरंगभूमीवर केलेले प्रयोग, नाटके आजही तेवढीच यशस्वी होतात, याचा त्यांना होणारा आनंदही खंतावलेला असे. ‘मला हे प्रयोग करून किती तरी वर्षे झाली. आता कोणी तरी काही नवे करायला हवे. किती दिवस तेच ते,’ असा प्रश्न ते विचारत. त्यात मानभावीपणा नसे. ती प्रांजळ खंत असे. ‘लोककथा ७८’सारखा प्रयोग केलेला लेखक त्याच सहजतेने ‘कार्टी प्रेमात पडली’ लिहित असे. केवळ वैविध्य हे मतकरींचे वैशिष्ट्य नव्हते, तर प्रेक्षकांच्या रसिकतेच्या विविध पातळीशी ते सारखेच समरस होत. याचे कारण म्हणजे, त्यांचे प्रेम नाटकावर नसे, तर या माध्यमावर असे. त्या माध्यमाच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्याची तीव्र आस त्यांना असे. तशी आस प्रत्यक्षात आणण्याची कुवत असावी लागते, ती मतकरींमध्ये आश्चर्य वाटावे इतकी भरभरून होती. त्यांची लिखाणाची शिस्त तर हेवा वाटावी अशी होती. त्यांच्या लेखनसंसारात, विशेषतः बालनाट्याच्या संसारात त्यांच्या पत्नी प्रतिभाताई मतकरी यांनी दिलेल्या साथीचाही ती चळवळ उभी करण्यात मोठा वाटा होता. मतकरींचे लिखाण, मतकरींचे प्रकल्प, मतकरींचे संकल्प जणू आपले स्वतःचे आहेत, अशा पद्धतीने त्या संवाद साधत. जणू ते जोडप्रकल्प असावेत. आपल्या लिखाणाविषयी मतकरी जेवढे सजग असत, तेवढेच ते त्या लिखाणाविषयीची मते खुलेपणाने ऐकून घेत. ज्या लेखकाला आपल्या साहित्यातून, नाटकांतून गंभीर जीवनानुभव देणारा साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली आहे, असा साहित्यिक सहसा गूढकथांच्या प्रदेशात पाऊल टाकत नाही. त्याची दोन कारणे असतात. एक, ज्या प्रांतात यश मिळाले, मान्यता मिळाली तोच प्रांत सावधपणे धरून ठेवण्याची माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुसरे, साहित्य रसिकांच्या मानसिकतेत गूढकथा, रहस्यकथांना दुय्यम स्थान आहे. त्यामुळेही तिकडे न फिरकण्याची प्रवृत्ती बळावते. मतकरींनी असा विचार कधी केला नाही आणि एकदा ‘खेकडा’ने सुरुवात झाल्यावर त्यांनी लेखणीतून उतरण्यास उत्सुक असणाऱ्या इतर गूढकथांनाही मोकळेपणी जागा करून दिली. ज्या क्षणी ते जे काम करीत, त्यातच ते सर्वार्थाने स्वत:ला झोकून देत. त्यांच्या डोक्यात त्या काळात दुसरे काही येत नसे. इंदिरा गांधी यांच्यावर नाटक लिहिले, तेव्हा त्यांनी ते अनेकांना आधी वाचून दाखवले. त्यांची मते ऐकून घेतली आणि अखेर त्यांना दिसलेली, भावलेली इंदिराच रंगमंचावर आणली. अखेरच्या काळात ते महात्मा गांधीमय झाले होते. आजच्या उन्मादाच्या काळात महात्मा गांधींचे मोठेपण लोकांना सांगणे त्यांना आवश्यक वाटत होते.

त्यांच्या कथेवर, त्यांनी स्वतःच दिग्दर्शित केलेल्या ‘इन्व्हेंस्टमेंट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ते उत्साहात आले होते आणि नव्या चित्रपटांचा विचार करू लागले होते. हा चित्रपट पाहिल्यावरही मतकरी आजच्या समाजाचा, आजच्या जगण्याचा, नव्या मानसिकतेचा किती बारकाईने अभ्यास करत, ते लक्षात येते. अशा प्रकारे लेखनाचे, माध्यमांचे विविध प्रकार अंगाखांद्यावर सहज खेळवणारा हा लोकप्रिय आणि यशस्वी साहित्यिक गप्पांमध्ये तेवढाच रंग भरत असे. जागतिक साहित्यातले, चित्रपटातले संदर्भ सांगत गप्पाष्टकांच्या मैफली रंगवण्यात ते रमून जात. अशा मैफलीत ते समवयस्कांपेक्षाही तरुणांमध्ये अधिक मोकळे होत; कारण तरुणांमध्ये एखादा विचार पेरणे, त्यांची पिढी काय विचार करते हे जाणून घेणे यात त्यांना रस असे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याकाळ या तिन्हीशी त्यांचा सांधा जोडलेला असे. स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, प्रेमभावनेच्या विविध छटा, नातेसंबंधांमधील तिढे, तणाव आणि मानवी मनाचे अतर्क्य खेळ या सगळ्यांमध्ये त्यांना सारखाच रस असे. ‘ऐक… टोले पडताहेत!’ ही त्यांची एक उत्तम गूढकथा. ”च्या संसर्गानंतर रुग्णालयातील पलंगावर पडल्या पडल्या ते स्वतःलाच सांगत असतील का? ऐक… टोले पडताहेत!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Batla House encounter: बाटला हाऊस एन्काऊन्टर : १३ वर्षानंतर निर्णय, आरोपी आरिज खान दोषी सिद्ध – delhi court held guilty and convicted ariz khan...

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काऊन्टर प्रकरणात आज दिल्ली न्यायालयानं आरिज खान याला दोषी करार दिलंय. आरिज खान याची शिक्षा १५...

syria landmine blast: Syria attack सीरियात भीषण भूसुरुंग स्फोट; १८ ठार, तीनजण जखमी – landmine blast in syria 18 killed three people badly injured

दमिश्क: सीरियातील केंद्रीय हामा प्रातांत झालेल्या भूसुरुंग स्फोटातील दोन घटनांमध्ये कमीत कमी १८ जण ठार झाले असून तीनजण जखमी झाले आहेत. सलामियाह क्षेत्रात...

Recent Comments