कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
मुंबई, 30 जून : विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह आपल्या लाडक्या एसटीने अगदी दिमाखात पंढपूर नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती. त्यानुसार देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव , नेवासा येथून संत मुक्ताई , त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पंढरपुरातुन संत नामदेव यांच्या पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही ,लालपरी अशा विविध बसेसमधून निवडक वारकरी बंधूंसह आज सकाळी पंढरपूरकडे निघाल्या.
वाटेमध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या पालख्यांचे दर्शन घेत फुले वाहिली. आज संध्याकाळी या सर्व पालख्या पंढरी नगरीमध्ये येऊन दाखल झाल्या आहेत. “दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वरकरी बंधूंची सेवा करणाऱ्यांचे दायीत्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा बहुमान समजला पाहिजे,” असे गौरवोद्गार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी काढले आहेत.
दरम्यान, माऊलींचा पादुका ताफा वाखरीत दाखल झाल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं. वाखरीतील विसाव्यानंतर सर्व पालख्या आपआपल्या मठाकडे मुक्कामासाठी रवाना झाल्या. कोविड परिस्थितीमुळे एकादशीच्या नगर प्रदिक्षणानंतर पालख्या पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील असं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे, तर वारीच्या परंपरेनुसार गोपाळ काल्यापर्यंत पालख्या पंढरपुरात मुक्कामी राहू द्याव्यात, अशी विनंती माऊली पालखीचे प्रमुख विश्वस्थ विकास ढगे यांनी केली आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री सपत्नीक मानाच्या वारकऱ्यासमवेत आषाढीची महापूजा करतील.
संपादन – अक्षय शितोळे
First Published: Jun 30, 2020 09:02 PM IST