Home संपादकीय ‘करोना’ने वाचवले प्राण?

‘करोना’ने वाचवले प्राण?


सारंग दर्शने

एकीकडे जगाला वेठीला धरत असताना दुसरीकडे लॉकडाउन वाढत चालल्यामुळे जगाला कोणते लाभ झाले, याचे अनेक शास्त्रीय अभ्यास होत आहेत. त्यांचे दावे पाहिले, तर जगात करोनाचे बळी जास्त, की प्रदूषण नसल्याने वाचलेले प्राण अधिक, असा प्रश्न पडू शकतो. अर्थात, करोना हे महासंकट आहे आणि ते न येताही माणसाला शहाणपण यायला हरकत नव्हती.

करोनाकहराच्या काळात जे प्रदूषण कमी झाले, त्यामुळे मानवेतर सृष्टीवर जे काही चांगले परिणाम झाले आहेत, त्यांनी ‘सोशल मीडिया’ आणि मुख्य मीडियातही चांगली जागा पटकावली आहे. या काळातील प्रदूषणमुक्तीचा मानवी जिवांना होणारा लाभ नेमका मोजण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांत जगात ठिकठिकाणी झाला आहे. करोनाने साऱ्या जगाचे अर्थकारण आणि लोकजीवन यांची पुरती वाट लावली असली, तरी अशा प्रकारची ‘स्वच्छ पृथ्वी’ गेल्या अनेक दशकांमध्ये कोणत्याही विज्ञानाच्या अभ्यासकांना मिळाली नव्हती. तिचा उपयोग ते करून घेत आहेत. जगाला या साथीची देणगी देणारा चीन हाच जगात सगळ्यांत प्रदूषित देश आहे. करोनाच्या लॉकडाउनमुळे चीनमध्ये आतापर्यंत निदान ७७ हजार प्राण वाचले असतील, असा एका पाहणीतील अभ्यास आहे. यात ७३ हजार स्त्री-पुरुष आणि निदान चार हजार अर्भके आहेत. ‘जी-फीड’ हा जगाची अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि अर्थनीती यांच्या परस्परनात्याचा वेध घेणारा वैज्ञानिकांचा समूह आहे. या समूहातल्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोव्हिड-१९सारख्या प्राणघातक साथी येऊ नयेतच. ‘जी-फीड’मधील वैज्ञानिकांचे अभ्यास म्हणजे या साथींचे समर्थन आहे, असे कोणी समजू नये; मात्र गेल्या ९० ते १२० दिवसांमध्ये जगातील विविध देशांमध्ये जी पर्यावरणीय स्थिती साकारली आहे, तिचा वेध मानवजातीच्या भविष्यासाठी घेणे आणि तिचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक व महत्त्वाचे आहे.

प्रदूषणाची मोजणी करणारे शक्तिशाली सेन्सर चीनमधील बीजिंग, शांघाय, चेंगडू आणि ग्वांग्झू या चार महानगरांत तसेच इतरही शहरांमध्ये आहेत. त्यांनी टिपलेल्या पर्यावरणीय बदलांचे विश्लेषण केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी ७७ हजार या वाचलेल्या प्राणांचा हिशेब लावला आहे. हे चिनी त्रैराशिक जगाला तसेच लावता आले नाही, तरी यावरून जगातील ‘वाचलेल्या जिवांचा’ अंदाज येऊ शकतो, असे वैज्ञानिकांना वाटते. तो आकडा अनेक लाखांतही जाऊ शकतो. फ्रान्ससारख्या प्रगत देशात दरसाल प्रदूषणाशी जोडल्या गेलेल्या श्वसन व फुफ्फुसविकारांचे बळी आहेत ४८ हजार. हाच आकडा अमेरिकेत एक लाखापेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही काळापूर्वी जगातील ‘ही माणसे आपल्याला वाचवता येतील,’ असे नमूद करून ‘प्रदूषणाचे सालिना बळी’ या वर्गवारीत तब्बल ७० लाख असा आकडा टाकला होता.

या तुलनेपेक्षाही काही वैज्ञानिकांनी अधिक मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, की एका विषाणूच्या भीतीने आपण सारे जग बंद करतो. आपले नित्याचे जगणे रोखून धरतो. इतका तो मानवजातीला असणारा भयंकर धोका आहे, असे आपल्याला वाटते. मग या करोनापेक्षा अधिक भयंकर असणारे, मानवजातीला प्रतिदिन घायाळ करणारे पर्यावरणीय बदल आणि कृतक प्रगतीचे चढते आलेख आपल्याला का बरे घाबरवत नसतील?

मार्शल बर्क या वैज्ञानिकाने संख्याशास्त्रीय ठोकताळे आणि इतर अभ्यासातून, करोनाकहर संपेल तेव्हाच्या जगातील थेट कोव्हिडने मरण पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षा लॉकडाउनच्या अप्रत्यक्ष लाभाने जीव वाचणाऱ्यांची संख्या वीसपट असेल, असे धाडसी प्रमेय मांडले आहे. ‘या आकड्यांपेक्षा मानवजात आपल्या आरोग्याची जी हेळसांड अहोरात्र करीत आहे, त्याकडे मला लक्ष वेधायचे आहे, हे लक्षात घ्या,’ असे बर्क सांगतात. बर्क यांच्या या प्रमेयाला पुष्टी देतील, अशा पाहण्या, छायाचित्रे, आकडेवारी आणि अहवाल यांचा पाऊस चहुबाजूंनी सध्या पडतो आहे. या साऱ्यांचे एकत्रिकरण करून, त्यांचे नीट विश्लेषण करण्याचे अवाढव्य काम जगभरातील वैज्ञानिकांना आता करावे लागणार आहे. इटली हा युरोपातील उद्योगसंपन्न देश. ‘युरोपिअन स्पेस एजन्सी’च्या उपग्रहांनी इटलीच्या उत्तर प्रांतात पो व्हॅलीमध्ये ‘नायट्रोजन ऑक्साइड’चा थर झपाट्याने विरळ झाल्याचे असंख्य फोटो पाठविले. जगभरात हा विषारी वायू दर वर्षी निदान ७० ते ८० हजार बळी थेट घेत असावा. शिवाय, लाखो फुफ्फुसे व श्वसनमार्ग दुबळे करून टाकतो. (मर्सिडीज बेंझवर आज जगभरात जे खटले चालू आहेत, ते त्यांची कारइंजिने प्रमाणापेक्षा नायट्रोजन ऑक्साइड जास्त सोडत असल्याचेच आहेत.)

एकीकडे रोज करोनाबळींचा वाढता आकडा आणि दुसरीकडे जग घेत असलेला मोकळा श्वास, हा महाभारत किंवा शेक्सपिअरन शोकात्मिकेत शोभावा असा महापेच कायमचा सुटायचा असेल, तर माणसाला आपली विकासाची संकल्पना नव्याने मांडावी, जोखावी आणि राबवावी लागेल. त्याला जग तयार आहे का?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments