Home शहरं नागपूर ‘करोना’मुळे बदलतोय पीकपेरा!

‘करोना’मुळे बदलतोय पीकपेरा!


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मागील वर्षी अवकाळी संकटातून तरलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भावमंदिचा सामना करावा लागला. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने कापूस खरेदी सुरू केली. त्याची गती मंद असल्याने संपूर्ण माल खरेदीची शक्यता तुर्तास दिसून येत नाही. म्हणून कापूस उत्पादकांनी सोयाबीन पेरण्याचा निर्णय घेतला. नियोजन करीत जुळवाजुळव केली. पण, सोयाबीनची कापणी वेळेत न झाल्यास शेतातच शेंगा फुटतात. करोनाच्या संकटात वेळेवर मजूर उपलब्ध होणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची कास धरली. घरात आधीच कापूस पडून असतानाही तेच पिकविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. करोनामुळे पीक पेरा बदलण्याचे संकट विदर्भातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची लागवड होते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरुवात होणार असल्याचा अंदाज असल्याने मे महिन्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत सुरू केली. दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून आल्याने लगबग वाढली आहे. पण, मागील वर्षीचा २० टक्के कापूस भावमंदित अडकल्यामुळे घरात पडून आहे. पावसाळा तोंडावर असतानाही केंद्रावरील मंद प्रक्रियेत शेतकऱ्यांजवळील संपूर्ण कापूस विकला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंदा कापसाऐवजी सोयाबीन लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. तशी तयारीही सुरू करण्यात आली. करोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले. अडीच महिन्यांपासून गावगाडा ठप्प पडल्याने मजुरांनी मूळ गावाची वाट धरली. आठवड्याला निर्णय बदलू लागले आहेत. यंदाच्या हंगामात हे मजूर परतण्याची शक्यता कमी आहे. गावातील मजुरांच्या भरवशावर पेरणी, कापणी, सवंगणी ही कामे वेळेत करणे अशक्य आहे. प्रत्येक ठिकाणी हार्वेस्टरचा प्रयोग शक्य होत नाही. त्यामुळे पीक बदलण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. एकाच वेळी कापणीला येणाऱ्या सोयाबीनऐवजी टप्प्याटप्प्याने वेचणी करणे शक्य असलेल्या कपाशीचा पर्याय स्वीकारला आहे. आधीच घरात कापूस पडून असतानाही पर्याय नसल्याने कपाशीची लागवड करणार आहेत. सोयाबीनची वेळेत कापणी करून सवंगणी न झाल्यास शेतातच शेंगा फुटतात. त्यातून होणारे नुकसान मोठे असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

बारीकऐवजी ठोकळ धानावर भर

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धानाची लागवड होते. या भागात बारीक आणि ठोकळ, अशा दोन प्रकारच्या वाणांची लागवड केली जाते. ठोकळ कमी तर बारीक धान अधिक कालावधीचा असतो. सरकार दोन्ही प्रकारच्या धानाला सारखाच दर देत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी ठोकळ धानाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या धानावर कमी प्रमाणात किड येत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.

खत, बियाणे महागले

करोनाच्या संकटात शेतमालाचे दर कोसळलेले असताना कंपन्यांनी बियाण्यांचे दर वाढविले आहेत. सोयाबीनचे बियाणे सुमारे ६०० रुपयांनी तर धान ४० रुपयांनी महागले आहेत. कापसाचे बियाणे मागील वर्षी इतक्याच दरात विकले जात आहे. खताचा विचार करता डीएपीने दिलासा दिला असला तरी इतर सर्व प्रकारचे मिश्र खत महागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची खताची मागणी १ लाख ६७ हजार मेट्रिक टन आहे. मात्र मागणीच्या तुलनेत फक्त ३० टक्केच साठा उपलब्ध आहे. युरिया, डीएपी, मिश्र खतांसह इतर खतांचीही टंचाई जाणवत आहे. करोनाच्या संकटात कारखाने बंद राहिले. नंतर कामगार मिळेनासे झाले. तीन शिफ्टमधील कारखाने काही तास सुरू राहू लागल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाचे सचिव रमेश बूच यांनी सांगितले.

–कोट

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मजूर सोयाबीनच्या सवंगणीसाठी येत होते. करोनाच्या संकटामुळे यंदा हे मजूर येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सात एकरातील सोयाबीनऐवजी कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणे खरेदी करून पेरणीपूर्व मशागत आटोपली आहे.

मिथून मोंढे पाटील

पिंपरी इजारा, ता. नेर जि. यवतमाळ)

बियाण्यांचे दर

सोयाबीन

यंदा : २२००-२५०० रुपये

मागील वर्षी : १६००-१८०० रुपये

(प्रती ३० किलोग्रॅम)

कापूस

– यंदा : ७०० रुपये

– मागील वर्षीचे दर कायम

(प्रती ४५० ग्रॅम)

धान

– यंदा : ६९०-७५० रुपये

– मागील वर्षी : ६५०-६७५ रुपये

(प्रती १० किलोग्रॅम)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

KXIP vs DC Excellent Bowling From Ashwin To Get The Wicket Of Dangerous Universal Boss – आधी फलंदाजाच्या बुटाची लेस बांधून दिली, मग बोल्ड...

दुबई: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने विजयासाठी दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने १९व्या षटकात ५...

atul todankar in hungama 2: अभिनेता अतुल तोडणकर करणार ‘हंगामा’; दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत – marathi actor atul todankar share his experience working in hungama...

मुंबई : प्रियदर्शन सोमण नायर यांचा 'हंगामा' हा चित्रपट २००३ साली आला होता. त्यानंतर त्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हंगामा २'मध्ये...

Recent Comments