Home शहरं अहमदनगर करोना व्हायरस: खायला भाकर नाही, मोबाईल कोठून आणू? - do not have...

करोना व्हायरस: खायला भाकर नाही, मोबाईल कोठून आणू? – do not have enough money to eat food can not afford mobile


म.टा. प्रतिनिधी, नगर

करोनाच्या संकटानंतर एका बाजूला शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू असताना आदिवासी भागातील बालके शिक्षणापासून आणखी दूर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता नसलेला हा वर्ग नव्याने येऊ घातलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या चर्चेमुळे पुरता गांगारून गेला आहे. खायला भाकरी नाही, तर मोबाईल कोठून आणयचा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

आदिवासी भागातील मुलांना शाळेत आणणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान असते. त्यामुळे करोनाचे संकट असले तरी अकोले तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक आदिवासी पाड्यांवर जाऊन मुले आणि पालकांचे शिक्षणासंबंधी प्रबोधन करीत आहेत. मोफत पुस्तक योजतील पुस्तके त्यांच्या हाती देत आहेत. त्याचवेळी ऑनलाइन शिक्षणाचाही मुद्दा चर्चेत येत आहे. आधीच शिक्षणाबद्दल नकारात्मक असलेले गरीब आदिवासी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पुस्तके दिली खरी पण शाळा केव्हा सुरू होणार, हे शिक्षकही सांगू शकत नाहीत.

‘शाळा भरणार असेल तर मुलांना घेऊन जा, तुम्हीच काय करायचे ते ठरवा, पण ऑनलाइन शिक्षण आम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा गुरे-ढोरे सांभाळून कामात मदत करतील,’ अशी उत्तरे पालकांकडून मिळत आहेत. करोनाबद्दलही त्यांच्या मनात भिती आहे. ‘रोग दूर झाला नाही, तर आम्ही मुलांना शाळेत पाठविणारच नाही. तुम्हीच वस्तीवर येऊन शिकवा,’ असेही काही पालक शिक्षकांना सांगत आहेत.

अशा प्रश्नांचा सामना करीत, दुर्गम भागात पायपीट करीत शिक्षक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटत आहेत. निळवंडे धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी ठाकर समाजाला आपल्या उर्वरित जागेत वस्ती करून राहावे लागत आहे. रोजच्या जगण्यासाठी धडपड करताना त्यांच्या डोक्यात तर मुलांच्या शिक्षणाचा विचारही नाही. ‘शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणाला लागलेली असताना आदिवासी भागातील मुले शेळ्या-मेंढ्या सांभाळण्याचे काम करीत आहेत. शाळा असती तर कसे का होईना त्यांना शाळेत आणता आले असते,’ असे शिक्षक सतीश काळे यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच श्रीनिवास मुळे, किरण भागवत यासह अनेक शिक्षक सध्या वाड्यावस्त्यांवर फिरून विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधत आहेत.

आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी आम्ही या भागात शाळा सुरू केली. आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. यावर्षी करोनामुळे चित्र बदलले आहे. लॉकडाउनच्या नियमामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. शिवाय यापुढे अनेक नवे नियम असणार आहेत. अशा परिस्थिती या आदिवासी मुलांना सांभाळणे हे आमच्यासाठी आव्हान असणार आहे. तसेच त्यांनाही जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मंजुषा काळे, मुख्याध्यापक, स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोलेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments