Home संपादकीय करोना व्हायरस: नकोच थुंकी, घाम हवा! - do not spit on ball...

करोना व्हायरस: नकोच थुंकी, घाम हवा! – do not spit on ball just sweat it


महेश विचारे

चेंडूला थुंकी लावण्याच्या वर्षानुवर्षांच्या परंपरेला आता करोनामुळे छेद जाणार आहे. करोनाचा थुंकीवाटे होणारा प्रसार लक्षात घेता यापुढे निदान काही काळ तरी चेंडूसाठी थुंकीचा वापर न करता घामाचाच वापर करावा, असा नियमच आयसीसीने घालून दिला आहे. या बदलाकडे विविध अंगांनी पाहिले जात आहे, त्याबद्दल-

सवयी, नियम बदलण्यासाठी काही काळ जावा लागतो. अनेकदा त्यात बदल होता होत नाही. पण गेल्या दोन अडीच महिन्यांत करोनाने खूप काही बदलले. क्रिकेटमध्येही अभूतपूर्व असे बदल करण्याची वेळ आली. अर्थात, हे कायमस्वरूपी बदल असतीलच असे नव्हे, तरी नजीकच्या काळात हे बदल स्वीकारून पावले उचलण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यातील एक बदल म्हणजे कसोटी किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूच्या लकाकीसाठी थुंकीच्या उपयोगाला मनाई आणि केवळ घामाच्या वापरालाच परवानगी! गेले दोन अडीच महिने सातत्याने याची चर्चा सुरू आहे. त्यामागील कारण अगदी स्वाभाविक आहे, ते म्हणजे थुंकीवाटे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता.

थुंकीचा वापर

नवा चेंडू हाताळताना त्याच्या एका बाजूची लकाकी कायम राखण्यासाठी गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक चेंडूवर थुंकी लावतात, ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. काहींच्या मते ती किळसवाणी असली, तरी आजतागायत थुंकी लावूनच चेंडूची चमक कायम राखण्याचा प्रयत्न झाला आहे. आता मात्र करोनामुळे त्या परंपरेला छेद जाणार आहे. थुंकीतून करोना पसरण्याचा मोठा धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) थुंकीच्या वापराला मनाई केली असून खेळाडूंनी नवी मार्गदर्शक तत्त्वे येईपर्यंत चेंडूची चमक कायम राहावी म्हणून केवळ घामाचा वापर करायचा आहे. आयसीसीच्या या भूमिकेमुळे क्रिकेटविश्वात चर्चेला ऊत आला आहे.

चेंडूला थुंकी लावण्यामागे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून काही शास्त्रीय कारणे आहेत. खरेतर, घाम किंवा थुंकी दोघांचाही वापर चेंडूच्या लकाकीसाठी करता येऊ शकतो. पण त्यात फरक आहे तो म्हणजे घामामुळे चेंडूला लकाकी तर येईल, मात्र चेंडू अधिक जड होण्याची, जास्त ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाज घामाचा वापर फारसा करत नाहीत. थुंकी लावणे हाच त्यांच्यासाठी उपयुक्त मार्ग असतो.

चेंडू नवा असताना त्याला नैसर्गिक स्विंग मिळतो. पण जसजसा चेंडू जुना होऊ लागतो, तसतसे खेळाडू त्यावर घाम किंवा थुंकीचा वापर करू लागतात. चेंडूच्या पृष्ठभागावर ग्रीसचा थर असतो. थुंकी किंवा घाम लावल्यानंतर तो चमकू लागतो. हे प्रत्येक खेळाडूलाच जमते असे नाही. काही खेळाडूंकडे चेंडूची ही एक बाजू चमकविण्याची कला असते. थुंकीमुळे चेंडू जड होण्याची शक्यता नाही, लकाकी मात्र येते. थुंकीत श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थही असतो. त्यामुळे थुंकी चेंडूवर लावल्यानंतर त्यावरील स्तर आणखी चमकदार होण्यास मदत मिळते.

त्यातच हा चेंडू थुंकी लावल्यानंतर खेळाडू आपल्या पँटवर घासतात. त्यामुळे त्या चेंडूच्या वरच्या स्तराचे घर्षण होते आणि तो आणखी चमकू लागतो. वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज या चेंडूची एक बाजू थुंकीचा सातत्याने वापर करून चमकदार बनवतात आणि दुसरी बाजू खडबडीत राहते. परिणामी, चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यास मदत मिळते. याचे कारण ज्या पृष्ठभागावर थुंकी किंवा घामाचा वापर होतो, तो भाग जड होतो आणि हवेत चेंडू असताना हा भाग स्वाभाविकच जड असल्यामुळे खाली राहतो.

रिव्हर्स स्विंगचे काय होणार?

थुंकी लावण्यास मनाई करण्यात आल्यामुळे रिव्हर्स स्विंगचे अस्त्र म्यान करावे लागेल, असा एक मतप्रवाह आहे. काही खेळाडूंनी या नियमामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमधील द्वंद्व असमान पातळीवर येईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. तर काहींच्या मते हे केवळ पेल्यातील वादळ आहे. त्यात एक मुद्दा असाही येतो की, उष्ण कटीबंधातील देशांमध्ये घामाचा वापर करता येऊ शकेल. पण इंग्लंडसारख्या ठिकाणी घामाचे प्रमाण कमी असल्यामुळे तिथे थुंकीच्या वापरावर भर द्यावा लागेल. मात्र थुंकी वापरण्यास मनाई असल्यामुळे गोलंदाजांवर तिथे मर्यादा येतील.

या नव्या बदलाच्या पार्श्वभूमीवर भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने थुंकीला मनाई करतानाच बाह्यपदार्थांच्या वापरावरही फुली मारली आहे. घामाचा वापर करण्यास पूर्ण परवानगी आहे. कारण त्याद्वारे करोना पसरण्याचा धोका अजिबात नाही. कारण घामाचा संबंध त्वचेतील ग्रंथींशी आहे. जिथून करोना पसरण्याची शक्यता नाही.

बाह्यपदार्थांचा विचार

काहींचे मत होते की, थुंकीवर जर मनाई असेल तर बाह्यपदार्थ वापरून चेंडूची लकाकी राखण्यास परवानगी द्यावी. पण बाह्यपदार्थांचा वापर हाच मुळी अनेक वर्षांपासून दंडनीय गुन्हा आहे. तसे अनेक प्रकार यापूर्वी झाले आहेत आणि खेळाडूंना त्याचा फटकाही बसला आहे. त्यामुळे जो गुन्हा आहे तो काही काळ क्षम्य करणे हे अयोग्यच आहे. कारण करोनानंतरच्या काळात पुन्हा हा नियम कठोर करून बाह्यपदार्थांना मनाई करणे हे हास्यास्पद ठरू शकते. शिवाय, बाह्यपदार्थांच्या वापराला परवानगी दिली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे नियंत्रण करणे एकवेळ शक्य तरी आहे. मात्र स्थानिक क्रिकेटसाठी असा नियम हा भस्मासूर ठरू शकतो. तिथे नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा स्थानिक क्रिकेटकडे नाही. त्यामुळे तूर्तास घामाचाच वापर गोलंदाज करू शकतात, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

मनाई अर्थपूर्ण?

एक मुद्दा असाही पुढे येत आहे की, जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हा खेळाडूंना करोनाची बाधा नाही, याची तपासणी करून, त्यांचे विलगीकरण करूनच त्यांना सामन्यात खेळता येईल. मग असे असताना तिथे थुंकीचा वापर करण्यास परवानगी का नसावी? भीती असेलच तर मग मैदानात चेंडूचा करोना विषाणूंशी संपर्क येऊ शकत नाही का? थुंकीचा वापर टाळण्याच्या नियमामुळे फलंदाजांना पुन्हा एकदा झुकते माप देण्यात आले आहे, असाही आरोप काही क्रिकेटपटू करताना दिसतात. आधीच फलंदाजांच्या सोयीसाठी अनेक नियम बनवले असताना थुंकी लावण्यास मनाई करून गोलंदाजांचे पंख आणखी कापण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप होतो.

यासंदर्भात चेंडू निर्मिती करणाऱ्या कंपन्याही वेगळा विचार करू लागल्या आहेत. एसजी, कुकाबुरा या कंपन्यांनी यानिमित्ताने वेगवेगळे पर्याय सुचविले आहेत. एसजीने आपल्या चेंडूनिर्मितीत चेंडूवरील पृष्ठभाग अधिक काळ चमकदार राहील, यादृष्टीने त्यात बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. ज्यामुळे थुंकीच्याच सहाय्याने चेंडू चमकविण्याची गरज राहणार नाही आणि अधिक षटके चेंडूचा पृष्ठभाग चमकेल.

कसोटी किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटपुरता असलेला हा नियम किती परिणामकारक ठरतो, किती लक्षवेधक ठरतो हे येणारा काळ ठरविणार आहे. केवळ घामाचा वापर करून वेगवान गोलंदाज कशी प्रभावी गोलंदाजी करू शकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी चेंडूला थुंकी लावता येणार नाही, गोलंदाजांसमोर पर्याय असेल तो घामाचा. गोलंदाजांना अर्थातच त्यामुळे खूप घाम गाळावा लागेल!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

Recent Comments