अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच पॅचिंगचे काम केलेल्या डीएसपी चौक ते पत्रकार चौक या रस्त्यावर तारकपूर बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध नोंदवत फिनिक्स सोशल फौंडेशनने खड्ड्यात वृक्षारोपण करीत त्याला हार घालत गांधीगिरी केली. नगर शहर खड्डेमुक्त करण्याची मागणीही करण्यात आली.
नगर शहराच्या लगत असलेले महामार्ग व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने न बुजविल्यास सात दिवसानंतर कोणतेही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिला आहे. पत्रकार चौक ते डीएसपी चौक या रस्त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसात हा रस्ता खड्डेमय झाला आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच वाहनचालकांना किमान खड्डे लक्षात येण्यासाठी खड्डयात झाडे लावून गांधीगिरी करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात जालिंदर बोरुडे, नासीर खान, संजय दिघे, नरेंद्र पवार, रिजवान पठाण, नितीन खंडागळे, शकील शेख, आमीर शेख आदी सहभागी झाले होते.