डोंबिवलीत सुरुवातीस एका विवाहाचे प्रकरण बरेच गाजले. गर्दी जमवण्यावरचे निर्बंध धुडकावणे किती महागात पडू शकते, त्याचा प्रत्यय वऱ्हाडींना आला. लॉकडाउन असतानाही कित्येक बाजारपेठांमध्ये वारेमाप गर्दी व्हायची. ठाण्यात मुंब्रा, कळवा येथे दाटीवाटीच्या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होताच; परंतु लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर या अशाच दाट लोकवस्तीत सुरुवातीस सुरक्षित वावराचे गांभीर्य राखले गेले नव्हते, त्या भागात नंतर बाधितांची संख्या कित्येकपट वाढली.
नवी मुंबईचे कृषि उत्पन्न बाजार समितीचे घाऊक बाजार, कल्याणचा फुलबाजार, अंबरनाथ-बदलापूरचे कारखाने, उल्हासनगरचे उद्योग, ठाण्यातील लघुद्योग या सर्व गोष्टींना या बंदचा फटका बसेल. या परिसरातून लाखोंच्या संख्येने कर्मचारीवर्ग रोज मुंबई व परिसरात जातो. या सर्वांनी काय करायचे, कसे व्यवहार करायचे, याबाबत कायम संभ्रमावस्था राहिली. या शहरांच्या गरजा, त्यांचे व्यवहार यांना अनुकूल अशा योजना कराव्या लागतील. कित्येक दिवस गाफील राहिल्याचा हा फटका आहे आणि त्यातूनच गोंधळ झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात लक्ष घालण्याची वेळ झपाट्याने टळून चालली आहे.