श्रीमद् भगवद् गीतेमध्ये ‘उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः’ असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. याचा अर्थ हा की, स्वत:चा उद्धार स्वत:च करायला हवा. स्वत:ही अवहेलना होऊ देऊ नका. तुम्हीच तुमचे मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू बनू शकता. कोण व्हायचे ते आपल्या सगळ्यांच्या वागणुकीवर अवलंबून आहे. याच्याच पुढच्या श्लोकात श्रीकृष्णांनी ‘मन हेच बंध किंवा मोक्ष यांचे कारण असते’ असेही म्हटले आहे. करोनाची लढाई आता आपल्या सगळ्यांना आपल्या मनाच्या रणभूमीवर जिंकायची आहे. रुग्णालये आहेत. लस आली आहे. व्यवहार सुरू झाले आहेत. रुळांवर येते आहे. पण नागरिकांनी जर बंधने पाळली नाहीत तर आपणच आपले सगळ्यांत मोठे शत्रू ठरू. अमेरिकेची आज जी दुर्दशा झाली आहे; तिचे प्रमुख कारण नागरिकांनी सारे नियम धुडकावून स्वैराचारी स्वातंत्र्य उपभोगले, हे आहे. गेल्या वर्षभराच्या करोना काळात भारतीयांनी नेटाने लढा दिला, असे कौतुक साऱ्या जगाला वाटते आहे. मात्र, आज महाराष्ट्र आणि केरळमधील नागरिक जे वर्तन करीत आहेत; त्यामुळे, उद्या सारा देश दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडू शकतो. मग ‘महाराष्ट्र मेला; तरी राष्ट्र मेले’ हे वेगळ्याच दुर्दैवी अर्थाने खरे ठरेल. मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी लागू करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी दिला आहे. दरम्यानच्या काळात अनेक निर्बंध लागू झाले आहेत. शाळा पुन्हा बंद होत आहेत. अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध वाढायचे नसतील तर मुखपट्टी, शारीर अंतर आणि व्यक्तिगत स्वच्छता ही त्रिसूत्री जिवाच्या कराराने पाळली गेली पाहिजे. रविवारी मुंबई किंवा पुण्यात सार्वजनिक ठिकाणी जी गर्दी दिसत होती; ती करोनाची भीती आता समाजमनातून पुरती पुसली गेली आहे, हेच दाखविणारी होती. करोनाची भीती बाळगायची नाही, याचा अर्थ बेबंद, बेछूट वागायचे असे नाही. मुखपट्टी न लावल्याने शहरांमध्ये जो लाखो रुपयांचा दंड वसूल होतो आहे, तो नागरिकांच्या बेशिस्त वर्तनावर प्रकाश टाकणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी आता ‘मी जबाबदार’ अशी घोषणा दिली आहे. ती प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधोरेखित करणारी आहे. मंत्री, अधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकाच्या मनात ‘मी जबाबदार’ हा संदेश आजही पुरेसा झिरपलेला नाही. आता टाळेबंदी नको असेल तर ‘काळाची पावले’ ओळखावी लागतील. ती ओळखली नाहीत तर करोना नावाच्या काळाची नवी झडप आपले सारे जीवन पुन्हा अस्ताव्यस्त करून टाकेल. तसे आपण साऱ्यांनी होऊ देता कामा नये. त्यासाठी, स्वयंशिस्त हा एकमेव मार्ग आहे.