’15 व्या वर्षी मुली प्रजननासाठी सक्षम होतात. असं असताना मुलीच्या लग्नाचं वय 21 वर्षे करण्याची काय गरज आहे’, असं वादग्रस्त विधान काँग्रेसच्या नेत्यानं केलं आहे.
भोपाळ, 13 जानेवारी: मुलीचं लग्नाचं वय किती असावं? या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या एका माजी मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या मंत्र्यांने म्हटलं की, ’15 व्या वर्षी मुली प्रजननासाठी सक्षम होतात. असं असताना मुलीच्या लग्नाचं वय 21 वर्षे करण्याची काय गरज आहे. यापूर्वी मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्ष निश्चित केलं होतं. त्यामुळे हेच वय कायम ठेवावं. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका बैठकीत म्हटलं होतं की, मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षांपर्यंत वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी समाजात या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. यावेळी सज्जन सिंह म्हणाले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ’15 व्या वर्षी मुली प्रजननासाठी सक्षम होतात. असं असताना मुलीच्या लग्नाचं वय 21 वर्षे करण्याची काय गरज आहे. यापूर्वी मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्ष निश्चित केलं होतं. त्यामुळे तेच वय कायम ठेवायला हवं.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी म्हटलं होतं की, देशात मुलींचं विवाह करण्याचं वय 18 वर्षावरून वाढवून ते वय 21 वर्ष करायला हवं. यासाठी समाजात या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. जेणेकरून यावर योग्य तो निर्णय घेता येईल. राज्य स्तरावर ‘सन्मान’ अभियानाची सुरूवात करताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
या अभियानाचा मुळ उद्देश महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात समाजाचा सक्रिय सहभाग वाढवणे. महिला आणि मुलींना समाजात सन्मानानं जगता यावं यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे. तसेच सामान्य लोकांना महिला सुरक्षेच्याप्रति जागरूक करावं, जेणेकरून ते महिलांना आदरपूर्वक वागणूक देतील. शिवाय त्यांना देशात कायद्याचं राज्य आहे, याची जाणीव होईल.