नाडी शोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या आसनांच्या मदतीने तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. तसंच तणावातून देखील तुमची सुटका करून घेऊ शकता.
मुंबई, 24 नोव्हेंबर : योग हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर व्यायामप्रकार आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील योगासनांचा खूप फायदा होतो. नाडी शोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या आसनांच्या मदतीने तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. तसंच तणावातून देखील तुमची सुटका करून घेऊ शकता. कोरोनाच्या या संकटकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची खूप गरज आहे. त्यामुळे योगासनांचा फायदा होणार आहे. परंतु यासाठी दीर्घ श्वास, वेगाचे पालन आणि व्यायाम करणं या तीन गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
नाडी शोधन प्राणायाम –
प्राणायामाचा हा प्रकार करण्यासाठी पद्मासनमध्ये बसावं लागेल. यानंतर उजवा हात आपल्या तोंडासमोर घ्या आणि आपल्या हाताची तर्जनी आणि मधले बोट कपाळावर ठेवा. त्यानंतर उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा त्याचबरोबर डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन ती मधल्या बोटानी बंद करा. तो श्वास उजव्या नाकपुडीतून सोडा. त्यानंतर ही पद्धत पुन्हापुन्हा करून तुम्ही हा व्यायाम करू शकता. हा व्यायाम करत असताना कंबर ताठ असावी.
नाडी शोधन प्राणायाम करण्याचे फायदे –
– या व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते
– नियमित व्यायाम केल्याने रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया सतत होते
– श्वसन क्रियेमध्ये सुधार होऊन ताण कमी होतो आणि झोप लागते
(वाचा – ‘निगेटिव्ह सेल्फ टॉक’ मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; यातून कसं मुक्त व्हाल)
भ्रामरी प्राणायाम –
भ्रामरी प्राणायाम सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला केला जातो. प्राणायामाचा हा प्रकार करताना आसपासचं वातावरण शांत असायला हवं.
भ्रामरी प्राणायाम करण्याची पद्धत –
– भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी जमिनीवर बसा. यानंतर दोन्ही हातांना कोपऱ्यातून वाकवून कानापर्यंत घेऊन जाऊन, अंगठ्याच्या मदतीने कान बंद करा.
– कान बंद केल्यानंतर तर्जनी, मधलं बोट आणि करंगळी डोळ्यावर जाईल अशा पद्धतीने ठेवा. त्यानंतर तोंड बंद करून नाकाने श्वास बाहेर आतमध्ये करत राहा.
– 15 मिनिटे हा व्यायाम केल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या. हा प्राणायाम तुम्ही एकावेळी 10 ते 20 वेळा करू शकता. परंतु नवीनच असताना, 5 ते 10 वेळा करून सुरुवात करू शकता.
(वाचा – ‘अरे क्या कर रहे हो’, केस कापताना चिमुरड्याची न्हाव्यालाच धमकी,VIRAL VIDEO पाहाच)
कपालभाती –
कपालभाती प्राणायाम श्वासाशी निगडित प्राणायाम मानला जातो. कपाल म्हणजे मेंदू भाती म्हणजे स्वच्छता. कपालभातीमुळे मेंदूची स्वच्छता होते आणि शरीर निरोगी बनते. लिव्हर, किडनीचे आणि गॅससंबंधी आजार असल्यास या व्यायाम प्रकारामुळे नक्कीच आराम मिळू शकतो. कपालभाती करताना मणका सरळ ठेवा. कोणत्याही प्रकारच्या ध्यानात्मक आसन आणि सुखासनामध्ये बसू शकता. त्यानंतर दोन्ही नाकपुड्यांतून श्वास आत-बाहेर करावा.
श्वास बाहेर सोडताना आपल्या पोटावर अधिक जोर द्यायचा आहे. या क्रियेत श्वास घ्यायचा नसून तो जोरजोराने सोडायचा आहे. या क्रियेत श्वास हा आपोआप घेतला जात असतो. आवश्यकतेनुसार प्राणायामाचा हा प्रकार 50 वेळा करू शकता. हळूहळू याचं प्रमाण 500 पर्यंतही वाढवू शकता.
(वाचा – पेपर कपमध्ये चहा पिणं इकोफ्रेंडली असेलही, पण आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक)
कपालभाती करण्याचे फायदे –
– रक्तभिसरण उत्तम होते.
– श्वसनासंबंधी आजारांमध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर दम्याच्या आजारामध्ये खूप फायदा होतो.
– महिलांसाठी खूपच लाभदायक
– पोटातील चरबी कमी होते
– पोटासंबंधी आजार आणि पोट साफ होतं
– रात्रीची चांगली झोप येते
यांनी कपालभाती करू नये –
– गर्भवती महिलांनी हा व्यायाम करू नये
– ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी हा व्यायाम करू नये
– गॅस्ट्रिक आजार आणि असिडिटी असणाऱ्या रुग्णांनी हळूहळू हा व्यायाम करावा
– महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये हा व्यायाम अजिबात करू नये
– उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी हा व्यायाम करू नये