‘महाराष्ट्राची माफी मागून मंत्रिपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा,’ अशी मागणी मनसेने केली आहे.
नवी मुंहई, 30 जून : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 1 लाख 20 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले आहेत, या विधानाला मनसेने आक्षेप घेतला आहे. तसंच राजेश टोपे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
‘मुळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांपेक्षा जास्त असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत,’ असा आरोप नवी मुंबईतील मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (155388/ 18002332200) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात 1 लाख 64 हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना 1 लाख 20 हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
‘राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत, अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रिपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा,’ अशी मागणी मनसेने केली आहे.
First Published: Jun 30, 2020 11:05 PM IST