गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर आणि पथक हर्सूल भागात २९ जून रोजी गस्त घालत असताना एक संशयित आरोपी चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी हरसिद्धी माता मंदिर येथे सापळा रचला असता संशयित आरोपी दुचाकीसह आढळला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरीची असून सहा दिवसांपूर्वी फाजलपुरा येथून चोरल्याची कबुली दिली.
याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या आरोपीचे नाव इम्रान अजीज मन्सुरी (वय २३, रा. श्रीरामपूर, अहमदनगर), असे आहे. तो काही दिवसापासून जहांगीर कॉलनी, हर्सूल येथे वास्तव्यास आहे. त्याने केलेले दुचाकी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर, जमादार श्रीराम राठोड, गोमटे, सेख बाबर, विकास माताडे, होनराव, भोसले, नितीन धुळे आणि नितीन देसमुख यांनी केली.
येथे केले गुन्हे
आरोपी इम्रान हा श्रीरामपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने सिग्मा हॉस्पिटल पार्किंग, जाधवमंडी आणि पाचोरा, जि. जळगाव येथून दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. सिटीचौक, क्रांतीचौक, सिडको, जवाहरनगर हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.