एका रुग्णानं उडवली रुग्णालयाची झोप, रिपोर्ट येण्याआधीच 55 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली, 04 मे : कोरोनाव्हायरस भारतात वेगानं पसरत आहे. कोव्हिड-19 वेगानं पसरत असल्याचे एक मुख्य कारण म्हणजे कोरोना रिपोर्ट येण्यासाठी लागणारा कालावधी. काही ठिकाणी रिपोर्ट येण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळं कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं वाढला आहे. यामुळं नवी दिल्लीतील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला.
दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात (Ambedkar Hospital) एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या 55 वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आता कोरोना झाल्याचे समोर आले आहे. याचे कारण ठरले ते कोरोना रिपोर्ट येण्यासाठी लागलेला कालावधी. 19 एप्रिल रोजी या कोरोना संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट मात्र 26 एप्रिलला आले. या 7 दिवसांमध्ये या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. याआधी 13 दिवसांनी एका कोरोना रुग्णाचे रिपोर्ट आले होते.
वाचा-ठाणे-कल्याणसह पुण्यातही मद्यपींची झुंबड, वाईन शॉपबाहेर मोठी गर्दी
एकामुळं 55 जणांना कोरोनाची लागण
मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना रिपोर्ट उशिरा आल्यामुळे बर्याच जणांमध्ये संसर्ग पसरण्याचे ताजे उदाहरण म्हणजे दिल्लीमधील आंबेडकर हॉस्पिटल. कोरोना रिपोर्ट उशिरा आल्यामुळं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येथे वाढली. सध्या येथे कोरोना पॉझिटिव्ह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 55 आहे. 18 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर रूग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्यांची 19 एप्रिल रोजी तपासणी केली गेली. त्यांना क्वारंटाइनही करण्यात आले होते. मात्र या कर्मचार्यांचा तपास अहवाल 23 एप्रिल रोजी आला, त्यातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. जेव्हा या 25 जणांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली, तेव्हा हा आकडा वाढतच गेला आणि 55 वर पोहोचला.
वाचा-चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा
19 लॅबमध्ये कोरोना टेस्ट
दिल्लीमध्ये एकूण 19 कोरोना टेस्ट लॅब आहेत. यातील 8 सरकारी तर 11 प्राइव्हेट आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर टेस्ट सॅम्पल येत असल्यामुळं रिपोर्ट येण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्याचे काही लॅब कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
संपादन, संकलन-प्रियांका गावडे
First Published: May 4, 2020 12:35 PM IST