या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून परिसरात गस्त वाढवण्याची देखील ग्वाही दिली आहे.
नाशिक, 18 मे : महाराष्ट्रात लॉकडाउन असल्यामुळे मागील दोन महिन्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, देवभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाउन असताना देखील मद्यपींचा हैदोस सुरूच आहे. शहराच्या तपोवन परिसरात काही मद्यपींनी मंदिराच्या एका महंताला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दारू विक्री सुरू झाल्यामुळे मद्यपींचा उद्रेक झाला आहे. नाशिकमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या घटना वाढल्या आहे. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवणे, रस्त्यावर धिंगाणा घालणे तसंच मारहाणीचे प्रकार देखिल वाढले आहेत.
हेही वाचा –पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा निर्घृण खून
नाशिकचा पवित्र समजला जाणारा आणि ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील साधू महंत वास्तव्य करतात तो तपोवन परिसर सध्या मद्यपींचा आणि गुंडांचा अड्डा बनला आहे. लॉकडाउन काळात देखील तपोवन परिसरात दारू पिउन धिंगाणा घालणे, परिसरातील रहिवाशांना शिवीगाळ करणे, धमकावणे हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
अशात आता तपोवनातील साक्षी गोपाल मंदिराच्या महंतांनाच काही मद्यपींनी मारहाण करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. महंत नंदरामदास यांना मद्यपी तरुणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी महंतांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी 4 मद्यपी तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा –Tiktokवरच्या प्रेमानं केला घात, लग्नाची स्वप्न दाखवून आयुष्यभराची दिली वेदना
दरम्यान, अनेकदा तक्रारी करुन देखील पोलिसांची गस्त वाढत नसल्याने मद्यपींचा परिसरातील धोका वाढत चालला आहे. यापूर्वीच पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर गुंडांची ताकद वाढली नसती, असं नागरिकांचं म्हणणं आहे
या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून परिसरात गस्त वाढवण्याची देखील ग्वाही दिली आहे. मात्र, शहरात एकीकडे लॉकडाउन असताना मद्यपींचा धिंगाणा मात्र कमी होताना दिसत नाही.
संपादन – सचिन साळवे
Tags:
First Published: May 18, 2020 12:28 PM IST