मोबाइलवर खेळल्या जाणाऱ्या या ऑनलाइन खेळाने ग्रामीण भागातही प्रवेश केला असून गुरुवारी या खेळामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या युवकाने गळफास लावून केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निखिल पुरुषोत्तम पिलेवान (वय २३, रा. पिंपरी, ता. नेर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
गुरुवारी सकाळी निखिलचे आई-वडील व भाऊ शेतातील कामावर गेले होते. निखिल हा एकटाच घरी होता. गेल्या काही दिवसांपासून तो दिवसरात्र आपल्या घरातच मोबाइलवर पब्जी हा ऑनलाइन खेळ खेळत असे. इतर कामांकडे त्याचे लक्ष नव्हते. सतत मोबाइलवर पब्जी ऑनलाइन खेळ खेळणारे शेवटी आपले मानसिक संतुलन गमावून बसतात व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात, अशी चर्चा आहे. निखिलच्या बाबतीतही हाच प्रकार घडला असावा व त्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला. याबाबत निखिलचा भाऊ मितेश पुरुषोत्तम पिलेवान याने नेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम पुढील तपास करीत आहेत.