Home आपलं जग हेल्थ परिस्थिती-मनस्थितीचं गणित जुळवताना...

परिस्थिती-मनस्थितीचं गणित जुळवताना…गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज

‘घरात बसून खूप कंटाळा आलाय. काहीच सुचत नाहीय. पुढे काय होणार कळत नाही’, ही वाक्य आपण अनेक वेळा म्हणत असतो आणि वरच्यावर बऱ्याचदा ऐकतो. या लॉकडाउनच्या बदललेल्या परिस्थितीबरोबर आपल्या मनस्थितीला जुळवून घेणं थोडं जड जातंय. याचं पार्श्वभूमीवर रुईया कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करण्यासाठी वेबिनार्सचं आयोजन करण्यात आलं होतं. रुईया काऊन्सिलिंग सेल आणि मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता कामथ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आपण सर्वांनी वर्तमानातील परिस्थितीचा स्वीकार करून एकमेकांना साहाय्य करायला हवं. या कठीण काळात आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, आप्तेष्टांना आपण मानसिक प्रथमोपचार पुरवण्याची गरज आहे, असं सांगत रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सहज सोप्या टिप्स त्यांनी दिल्या.

वास्तववादी दृष्टिकोन महत्त्वाचा

भविष्याची अति चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस अर्थपूर्ण कसा करता येईल याचा विचार करा. दिवसभराचं वेळापत्रक ठरवून घ्या. काम, आराम, व्यायाम या प्रत्येक गोष्टीसाठी ठरावीक वेळ राखून ठेवा आणि वर्तमानात जगा.

आवर्जून संवाद साधा

मनातली खदखद दाबून टाकू नका. आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद साधा. जी अस्वस्थता आपल्याला जाणवत आहे, तसंच समोरच्यालाही वाटत आहे, हे जाणावल्यामुळे भावना स्वीकारण्यास मदत होईल.

शांतपणे ऐकून घ्या

‘मला खूप उदास वाटतंय, भीती वाटत आहे’, असं कोणी म्हणालं तर त्या व्यक्तीचं म्हणणं हसण्यावारी नेण्याची ही वेळ नाही. आधी समोरच्याला काय म्हणायचं ते शांतपणे ऐकून घ्या. त्याचं म्हणणं समजून घ्या. बऱ्याचदा ऐकणारा कान आधारासाठी उत्तम खांदा होऊ शकतो. प्रकरण खूपच गंभीर असेल तर मानसोपचारतज्ज्ञांची अवश्य मदत घ्या.

सत्य स्वीकारा

रम्य बालपण, सळसळतं तारुण्य, नोकरी, लग्न, वार्धक्य आणि मग शेवटी मृत्यू असा आराखडा मनात बांधून घेतला आहे. पण, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू डोकं वर काढू शकतो, हे सत्य आपण स्वीकारायला हवं.

सकारात्मकता म्हणजे…

‘मला काहीच होणार नाही’ असा अनाठायी आत्मविश्वास कोणीही बाळगता कामा नये. सद्यस्थितीत योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. विचारांची सकारात्मकता आपल्याला पुढे वाटचाल करायला प्रोत्साहन देते.

डिजिटल डिटॉक्स घ्यावा का?

सध्या सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होत आहेत. लोकांनी काय पोस्ट करायचं, हे तुम्ही ठरवू शकत नाही. पण समाज माध्यमांचा सकारात्मकतेनं वापर करणं नक्कीच तुमच्या हातात आहे. काय पाहायचं आणि कोणत्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचं, हे स्वतः पुरतं ठरवून घ्या.

वेबिनारच्या शेवटी कविता सादर करण्यात आली, ती पुढीलप्रमाणे…

आयुष्य पेन्सिलीसारखं आहे…

पेन्सिलीला कोणीतरी हातात धरल्यावरच

ती लिहू शकते

तसंच माणसालाही मार्ग दाखवणारा

वाटाड्या लागतो

रोज पेन्सिलीचं टोक काढावं लागतं.

आपल्या स्वतःत दररोज

सुधारणा करण्यासाठीही खूप वाव असतो.

लिहिलेलं चुकलं तर

ते खोडता येतं.

आयुष्यात चुका झाल्या तरीही

त्या सुधारून पुढे जाण्याची संधी मिळतेच

पेन्सिलीच्या आतील शिसं

चांगल्या दर्जाचं हवं

माणसाचं अंतर्मन कणखर, खंबीर,

स्वच्छ आणि निर्मळ असणं महत्त्वाचं आहे.

काहीही झालं तरी लिहीत राहणं

हे पेन्सिलीचं काम आहे.

आपणही जीवनाचा आस्वाद घेत

जगत राहायला हवंSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments