दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई, 20 एप्रिल : पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘साधू आणि त्यांच्या चालकाची निघृण हत्या झाली. निर्जण आणि दुर्गम परिसरात हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहोचले. 16 तारखेला ही घटना घडल्यानंतर 17 तारखेला आरोपींना अटक केली. मुख्य 5 आरोपीही तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे. पण पालघर जिल्ह्याच्या टोकाला दादरा-नगर हवेलीच्या सीमेवर एक दुर्दैवी प्रकार घडला. या काळात सर्वांनी माणुसकी ठेवण्याची गरज आहे. केंद्र शासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. गडचिंचली हे गाव तिथे जायला नीट रस्ता नाही. या घटनेनंतर कारवाई सुरू असून दोन पोलिसांनीही निलंबित केलं आहे. आरोपींना शोधून काढणार शिक्षा करणार. हा धार्मिक हिंसाचार नाही, अफवेमुळे प्रकार घडला,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे :
हा लॉकडाऊन लवकर संपवण्याचं आपल्याच हातामध्ये आहे
सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर निर्बंध कडक करावे लागतील
महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्यानंतर आज सहा आठवडे पूर्ण होत आहेत
डॉक्टर आणि इतर कर्मचारी मेहनत करत आहेत
पालघर प्रकरण : अमित शहाच्या देशाचे गृहमंत्री…त्यांना सर्व माहिती मिळत असते…तेही म्हणाले उद्धवजी या प्रकरणात धर्माचा संबंध नाही…पण काळजी घ्या, असं शहा म्हणाले
पालघर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकांच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र पोलिसांसमक्ष साधूंची हत्या झाल्याने पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या साधूंवर गुरुवारी रात्री जेव्हा हल्ला झाला त्यावेळी तेथील फॉरेस्ट चौकीवरील वनरक्षकाने पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली आणि त्या जखमी साधूंना चौकीत बसवून ठेवले होते. पोलिसांना हल्ल्याची कल्पना असताना त्यांनी जमावाला तातडीने पांगविले का नाही असा प्रश्न उपस्थित होत असून जमावाच्या समक्ष त्या साधूंना फॉरेस्ट चौकीतून बाहेर काढल्यानंतर जमावाने वयोवृद्ध साधूवर लाठ्याकाठ्यांसह जबर हल्ला चढवला.
त्यावेळी पोलीसांनी कोणताही प्रतिकार न करता बघ्याची भूमिका घेतल्याने तीन जणांची हत्या झाल्याचेच पुढे येत असल्याने पोलीसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच आता आक्षेप घेतला जात आहे.
First Published: Apr 20, 2020 02:27 PM IST