Home संपादकीय पी. जयराज आणि बेनिक्स: हा उद्दापमणा येतो कुठून? - where does this...

पी. जयराज आणि बेनिक्स: हा उद्दापमणा येतो कुठून? – where does this excitement come from


लॉकडाउनदरम्यान निषिद्ध वेळेत दुकान सुरू ठेवले या खोट्या आरोपाखाली मोबाइल दुकानाचे मालक पी. जयराज यांना तमिळनाडूतील तुतिकोरिन येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांविरोधात शेरेबाजी केल्याने संतप्त होऊन त्यांना व त्यांचा पुत्र बेनिक्स याला अमानुष मारहाण झाली. तीन दिवसांनी दोघांचेही निधन झाले. सध्या तरी कोणत्याही कारवाईअभावी केवळ कोठडी मृत्यूचा आकडा दोनने वाढला आहे…पोलिसांमधील गुन्हेगारी मानसिकता, सरकार-विरोधी पक्षांची बोटचेपी भूमिका, न्यायसंस्थेचे दुर्लक्ष हे सर्व या प्रकरणात प्रकर्षाने समोर आले आणि एक प्रश्न उभा राहिला, ‘पोलिसांमध्ये हा उद्दापमणा येतो कुठून?’

राजकीय नेते, उच्चपदस्थ राज्य सरकारी-केंद्रीय सरकारी अधिकारी, वकील, उद्योगपती, राजकीय तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार यांनी कायद्यावर बोट ठेवून आवाजात जराशी जरब आणली, की नमते घेणारे पोलिस हे समाजातील सामान्य नोकरदार, भिकारी, कष्टकरी, फेरीवाले, छोटे व्यापारी, प्रेमीयुगुल या घटकांविरोधात मात्र शौर्य दाखवू लागतात. चमचमत्या दुनियेतील कुणीही संशयाच्या फेऱ्यात सापडलेच तर, कंड्या पिकवून व प्रसंगी चौकशीचा फार्स करून ‘हाताची खाज’ मिटवली जाते. गरिबांनी त्यांच्या कारवाईला विरोध करताच अथवा नियम सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांना धडा शिकवायचाच या सूडाने पेटून दंडुके परजले जातात. पोलिस ठाणे म्हणजे तर सरकारने आपल्याला आंदण दिलेली जहागिरी आहे, असे समजून छळाची नवनवी पद्धत शोधून काढली जाते. भारतातील कोणतेच राज्य अद्याप पोलिसांच्या अत्याचारापासून मुक्त झालेले नाही. तमिळनाडूतील तुतिकोरिनमध्ये पिता-पुत्राचा पोलिस कोठडीत पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे झालेला मृत्यू हे याच काळ्या अध्यायातील मागील पानावरून पुढे असे प्रकरण आहे.

‘नॅशनल कॅम्पेन अगेन्स्ट टॉर्चर’ या संस्थेने आपल्या अहवालात या अनन्वित अत्याचारांच्या पद्धती दिल्या आहेत. शरीरावर लोखंडी दांडक्याचे फटके मारणे, पायावर मारहाण करणे, तळपायावर मारून वळ उठलेल्या भागांवर मसाला चोळणे, विजेचे धक्के देणे, मारहाण करून अंगावर पेट्रोल ओतणे, शरीरावर मिरची पावडर चोळणे, सर्वांगावर सुयांनी टोचणे, तोंडात लघवी करणे, हात-पाय बांधून उलटे लटकवणे व मारहाण करणे, स्वत:च तसेच इतर आरोपी किंवा पोलिसासोबत लैंगिक क्रिया करण्यास भाग पाडणे अशा अत्याचारांची जंत्रीच या संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे. ही काही वरवरची ऐकीव माहिती नव्हे. संबंधित अत्याचार झालेल्या प्रकरणातील आरोपींची नावे, राज्य, शहर, पोलिस ठाणे याच्याही इत्थंभूत नोंदी आहेत. तमिळनाडूतील पिता-पुत्रांचे लिंग ठेचण्यात आले होते, असा नातेवाईकांचा आरोप आहे. यावरून तमिळनाडू पोलिस १९ जूनच्या रात्री कोणत्या थराला गेले असावे, हे स्पष्ट होते.

याच संस्थेच्या अहवालानुसार देशात सन २०१९मध्ये कोठडीतील मृत्यूची संख्या १७३१ आहे. यामधील १६०६ न्यायालयीन कोठडीत तर, १२५ पोलिस कोठडीत झालेले मृत्यू आहेत. सर्वच मृत्यू संशयास्पद नसले तरी, प्रत्येक मृत्यूबद्दल किमान निष्काळजीचा ठपका पोलिसांवर व तुरुंग कर्मचाऱ्यांवर असतोच. सन २०१९मध्ये सर्वाधिक कोठडी मृत्यू उत्तर प्रदेशात (१४) झाले, तर प्रत्येकी ११ मृत्यूंसह दुसऱ्या क्रमांकावर होते तमिळनाडू व पंजाब. मध्य प्रदेशात ९, गुजरातमध्ये ८, दिल्ली आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ७ तर, महाराष्ट्रातील आकडा होता पाच. प्रत्येक कोठडी मृत्यूनंतर चौकशी ठरलेलीच असते. पण तरीही सन २००१ ते २०१८ या काळात या मृत्यूंप्रकरणी चाललेल्या खटल्यांमध्ये केवळ २६ पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे. तमिळनाडूमध्ये पी. जयराज (५८) व त्यांचा पुत्र बेनिक्स (३१) यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी आता चेन्नई उच्च न्यायालयानेच चौकशी सुरू केली आहे. पण या चौकशीपूर्वीच तमिळनाडू पोलिसांच्या पाशवी मारहाणीच्या वृत्तांनी संपूर्ण देश हादरला आहे.

सर्वात धक्कादायक पोलिसांची ही दहशतवादी कृती नव्हे, तर हे कृत्य घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, राज्य सरकार, विरोधी पक्ष आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे न्यायव्यवस्थेनेही पोलिसांच्या माजाला खतपाणी घातले. कोठडीत मारहाण केलेल्या संशयिताची जखमी अवस्थेतील छायाचित्रे प्रसिद्ध करून समाजात भय निर्माण करण्याचे प्रकार तमिळनाडूत सर्रास घडतात. जयराज व बेनिक्स यांच्याबाबतही हाच प्रकार घडला. २० जूनला दोघांना दंडाधिकारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले व कोठडीची मागणी करण्यात आली.

न्यायालयात नेताना पोलिसांनी जयराज व बेनिक्सच्या कुटुंबीयांना गडद रंगाची लुंगी आणण्यासाठी धमकावले होते. कमरेखालील भागातून होणारा रक्तस्राव दिसू नये यासाठीची ही खटाटोप होती. शरीराच्या दर्शनी भागांवर जखमा होत्या. चेहरा गलितगात्र होता. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना एका शब्दानेही जाब विचारला नाही की, जयराज व बेनिक्सच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याही पुढे जात दोघांनाही कोठडी ठोठावली. येथेच पहिली चूक घडली…’पोलिसराज’ला मोकळीक मिळाली.

जयराज व बेनिक्सच्या मृत्यूनंतरही पोलिसांना कशाचेच भय नव्हते. त्या दोघांनी पोलिस कारवाईच्या विरोधात जमिनीवर लोळून स्वत:ला इजा करून घेतली व अंतर्गत-बाह्य जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा वरिष्ठांनी बचाव केला…अत्याचारींचे धाडस अधिकच वाढले. या प्रकरणाची सोशल मीडियावर वाच्यता होऊ लागताच चौकशीसाठी नेमलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आपला छळ होत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात केली आणि तमिळनाडू पोलिसांच्या इभ्रतीची लक्तरे संपूर्ण देशातील प्रत्येक चौकात लटकू लागली. टोकाचे राजकारण घडणाऱ्या या राज्यात सत्ताधारी अण्णाद्रमुक अथवा विरोधक द्रमुक या दोन्ही पक्षांनी आरोप असलेल्या पोलिसांविरोधात ठोस भूमिकाच घेतली नाही.

लॉकडाउनमुळे होणाऱ्या सोशल आंदोलनांना कोणते सरकार भीक घालते…दोन ‘हत्यां’नंतरही केवळ दोन पोलिस उपनिरीक्षक निलंबित आहेत. कुणावरही गुन्हा दाखल नाही. हत्या असूनही पोलिस दप्तरी अद्याप संशयास्पद मृत्यूचीच कलमे आहेत. त्यातच नव्याने नेमणूक केलेल्या तुतिकोरिनच्या पोलिस अधीक्षकांवर गुटखा घोटाळ्यातील सहभागाचा आरोप आहे, तर महानिरीक्षकांवर सरकारी राजपत्रित महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप आहे. आता न्याय मागणारे डोळे चेन्नई उच्च न्यायालयाकडेच लागले आहेत.

राज्य सरकारवर विटाळ नको म्हणून अण्णाद्रमुक सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. मानवतावादी संघटना या घटनेकडे संशयाच्या भिंगातून पाहात आहेत. पण सीबीआयने केलेल्या तपासावरून कोठडी मृत्यूप्रकरणी केरळमध्ये दोन पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेले प्रकरण दिशादर्शक ठरणार काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सन २००५मध्ये केरळच्या थिरुवनंतपुरममध्ये भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या २८वर्षीय उदयकुमारकडे ४ हजार रु. सापडले म्हणून त्याला पोलिसांनी पकडले. चोरीचा ठपका ठेवण्यात आला. मारहाण झाली व पुढे मृत्यू. त्याची आई लढली. सीबीआयने चौकशी केली आणि सन २०१९मध्ये सीबीआय न्यायालयाने निकाल दिला. दोन पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. केरळला खेटून असलेल्या तमिळनाडूमध्ये सध्या याच प्रकरणाचा हवाला दिला जातोय.

नंतर बाहेर आलेलं सत्य…भंगार हीच रोजीरोटी असलेल्या उदयकुमारने ओणम सणाला आपल्या विधवा आईसाठी नवीकोरी साडी घेण्यासाठी ते पैसे जमवले होते…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: मालमत्ता सील; १६ लाख वसूल – aurangabad municipal corporation recovered 16 lakh property tax and water bill in within three months

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेने आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या तीन महिन्यांत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शनिवारी दिवसभरात तीन...

All India Marathi Literary Meet: आज ठरणार संमेलनाध्यक्ष – today will be decide the president of the 94 th all india marathi literary meet

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकनाशिकमध्ये होऊ घातलेले ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, २६ ते २८ मार्चदरम्यान...

Recent Comments