Home शहरं नाशिक पुन्हा नवी सुरुवात..

पुन्हा नवी सुरुवात..


मार्च महिन्यापासून करोना विषाणूच्या संकटाने प्रत्येक क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. अनेक वर्षांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेल्याचे यामुळे दिसून आले. आता मात्र, हळूहळू काही प्रमाणात का होईना, गोष्टी पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहेत. काही व्यवसाय सुरू झाले आहेत तर काही अद्याप प्रतीक्षेत आहेत. मात्र, आता नव्याने सुरुवात करताना खचून न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करण्याचे शहरातील व्यावसायिकांनी ठरवले आहे.

ब्युटीपार्लरमधील स्वच्छता ही सर्वाधिक महत्त्वाची बाब आता असणार आहे. त्यामुळे सर्वच ब्युटीपार्लरचालकांना आम्ही याविषयी अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन करत आहोत. योग्य सॅनिटायझिंग, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा यूज अॅण्ड थ्रो वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. सौंर्द्य प्रसाधने आणि त्याच्याशी निगडीत या क्षेत्राला मोठे वळण आता मिळणार आहे. ग्राहकांचाही कल आता अशा पार्लरकडेच असल्याने साहजिकच हे क्षेत्र आता अधिक सजग होईल. अद्याप परवानगी मिळाली नसली तरी परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांना करोनाच्या भीतीविषयी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही, यादृष्टीने आम्ही आतापासूनच कार्यरत आहोत.

-ललिता पाटोळे, ब्युटीपार्लर व्यावसायिक

करोनामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. आता सर्व सुरू झाल्यानंतर मोठ्या अपेक्षा आहेत व्यवसायाकडून. सर्व चांगले व्हावे, असे वाटते आहे. आर्थिक घडी बसण्यास पुन्हा मदत होणार आहे. लॉकडाउनच्या काळात कसेबसे पोट भरले आहे. आता व्यवसाय सुरू करता येत आहे, याचा आनंद मोठा आहे. परंतु, ग्राहक येण्याचे आव्हानही आहेत. हल्ली डिजिटल पेंटिंग, कॉम्प्यूटरवरील कलात्मक कामांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याने आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांकडे गर्दी कमी असते. मात्र, कलेची आवड व जाण असणाऱ्यांची प्रतीक्षा आता आहे.

-संदीप सोनार, साईनबोर्ड व कॅनव्हास आर्टिस्ट

करोनाकाळात हॉटेल व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक व्यक्ती या व्यवसायावर अवलंबून असतात. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच काही मोठ्या हॉटेल्समधून शिल्लक असलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचवले जात असते. तेही या काळात थांबले. हॉटेल्स सुरू झाल्यानंतर हे पुन्हा सुरू करण्यात येईल. करोनानंतरच्या व्यवसायांमध्ये बदल निश्चितच होणार आहेत. लोकांना अधिकाधिक चांगले, स्वच्छ अन्न पुरवण्यावर भर असणार आहे. प्रत्येक हॉटेल चालकांना तसे करावेच लागेल, अन्यथा व्यवसाय बंद होण्याचे संकट त्यांच्यावर ओढावू शकते. विश्वासार्हता निर्माण करणे हे सर्वात पहिलं प्राधान्य असणार आहे.

-विक्रम उगले, हॉटेल व्यावसायिक

लॉकडाउनमुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली. दरवर्षी मे, जून महिन्यात शालेय पुस्तक, वह्या इतर साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी आमच्याकडे असते. यंदा मात्र, दुकानेच बंद ठेवण्याची वेळ आली. आता दुकाने उघडली आहेत. हळूहळू ग्राहकही येत आहे. त्यामुळे दिलासा मिळतो आहे. या काळात बाहेरगावच्या काही दुकानदारांना पुरेसा साहित्याचा माल, पुस्तके मिळत नसल्याचे आमच्यासमोर आले. त्यामुळे त्यांना साहित्य, पुस्तके उपलब्ध करुन देण्यावरही आम्ही भर देत आहोत. कोणत्याही व्यावसायिकासमोर आता हतबलता निर्माण व्हायला नको, याची काळजी घेत आहोत आणि पुढेही घेणार आहोत.

-अतुल पवार, व्यावसायिकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments