Home संपादकीय फसवी माघार - india-china at ladakh border

फसवी माघार – india-china at ladakh border


भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या नऊ महिन्यांपासून असलेला तणाव कायम असला, तरी कडाक्याच्या थंडीमुळे तो काहीसा निवळत असल्याचे दिसते. पूर्व लडाखमध्ये एप्रिल-मेपासून सुमारे ५० हजार सैन्य तैनात केलेल्या चीनने, दहा हजार सैनिकांना माघारी नेले आहे. भारतानेही सैन्यमाघारीची कृती केली आहे. या काळात लडाख परिसरात हिवाळा अतिशय कडक असतो आणि तापमान किती तरी अंशांनी शून्याच्या खाली जाते. अशा स्थितीत उंचावरील या ठिकाणी मोठ्या संख्येने सैन्य तैनात ठेवणे अवघडच असते; त्यामुळे आघाडीचे सैन्य कायम ठेवून उर्वरित तुकड्या मागे नेण्याचे पाऊल उचलले जात आहे. याचा अर्थ चीन माघार घेत आहे, असा नाही.

प्रतिकूल हवामानामुळे चीन दोन पावले मागे जात असला, तरी आणखी काही दिवसांनी तापमान वाढले, की चिनी फौजा पुन्हा येऊ शकतात; त्यामुळे लडाख परिसरात भारताला दक्ष राहण्याला पर्याय नाही. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर, उभय देशांतील सैन्य गेल्या जूनमध्ये समोरासमोर भिडले. त्यावेळी वीस भारतीय जवानांना हौतात्म्य आले. चीनचे सैनिकही मारले गेले; परंतु बीजिंगने त्यांचा आकडा कधीच जाहीर केला नाही. त्यानंतर दोन्ही देश सतत संघर्षाच्या पवित्र्यात असून, उभय बाजूंना पन्नास हजार सैन्य, रणगाडे, तोफा आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न झाले असले, तरी त्यांना यश आले नाही. दोन्ही देशांमध्ये ‘कोअर कमांडर’ स्तरावर चर्चेच्या फेऱ्या झाल्या असल्या, तरी सैन्य माघारी आणि तणाव कमी करणे, यांच्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. सहा नोव्हेंबरनंतर चर्चेची पुढील फेरीही झाली नाही; त्यामुळे सध्याच्या सैन्य माघारीकडे तात्पुरता दिलासा म्हणून पाहायला हवे. हे सैन्य किमान कालावधीत पुन्हा तैनात करता येईल, असे नियोजन चीन करीत असल्याने, भारताला संरक्षण सज्जता कायम ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तिन्ही दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांचा ताजा लडाख दौरा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. भूदलप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही चीन व पाकिस्तान या दोन्हींचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अहोरात्र दक्षता व सावधगिरी हाच पर्याय भारताच्या हातात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments