करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनं चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी प्रवास करणाऱ्या कलाकरांना क्वारंटाइन केलं जावं असं मार्गदर्शक नियमांमध्ये नमूद केलं होतं. त्यानुसार सध्या अनेक मालिकेतील कलाकरांना चित्रीकरणापूर्वी क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे. येत्या दिवसात चित्रीकरणासाठी प्रवास करणाऱ्या आणखी काही कलाकरांनादेखील क्वारंटाइन केलं जाणार आहे.
चित्रीकरणासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करताना टीव्ही इंडस्ट्रीला चांगलीच कसरत करावी लागतेय. अनेक मालिकांच्या चित्रीकरणाचे सेट मुंबई-ठाणेसह सिंधुदूर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यात आहेत. तसंच मालिकेतील कलाकारदेखील मुंबईसह विविध जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. लॉकडाउनच्या काळात कलाकार आपल्या घरी परतले होते.
आता चित्रीकरणासाठी त्यांना प्रवास करून तिथे जावं लागत असून, क्वारंटाइनचा काळही पूर्ण करावा लागतोय. या काळात संवाद पाठांतर, मेकअप शिकणं, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादांचं वाचन सुरू आहे.
मुंबईत आल्यानंतर जवळपास पंधरा दिवस मी क्वारंटाइन होते. या दिवसांत मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर अधिकाधिक भर दिला. येत्या काळात मालिकेत काय बदल होतील किंवा शूटिंगसाठी स्वतःला तयार करण्यासाठी घरच्या घरी माझी तालीमही सुरू आहे.
– गौतमी देशपांडे, अभिनेत्री
‘गेले तीन महिने मी गोव्यात होतो. शूटिंगसाठी महाराष्ट्रात परतल्यावर मी क्वारंटाइन आहे. या काळात माझं नियमित वर्कआउट आणि भूमिकेचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी काही जुने एपिसोड पाहतोय. शिवाय, आवडीच्या काही वेब सीरिज बघतोय.
-अशोक फळदेसाई, अभिनेता
कलाकार – मालिका – वास्तव्य – चित्रीकरण स्थळ
मधुराणी प्रभूलकर – आई कुठे काय करते – पुणे – ठाणे
सोनाली पाटील – वैजू नंबर १ – कोल्हापूर – मीरारोड
प्राजक्ता माळी – महाराष्ट्राची हास्यजत्रा – पुणे – मीरारोड
अमृता धोंगडे – मिसेस मुख्यमंत्री – पुणे – सातारा
तेजस बर्वे – मिसेस मुख्यमंत्री – पुणे – सातारा
गौतमी देशपांडे – माझा होशील ना – पुणे – ठाणे
विराजस कुलकर्णी – माझा होशील ना – पुणे – ठाणे
प्रल्हाद कुडतरकर, सुहास शिरसाट, मंगेश साळवी, अपूर्वा नेमळेकर, शकुंतला नरे – रात्रीस खेळ चाले २ – मुंबई – सावंतवाडी
मृणाल दुसानिस – हे मन बावरे – नाशिक – ठाणे
सुमित पुसावळे – बाळुमामाच्या नावानं चांगभलं – सांगली – मुंबई
अंकिता पनवेलकर – बाळुमामाच्या नावानं चांगभलं – पुणे – मुंबई
अभिषेक रहाळकर – स्वामिनी – पुणे – मुंबई
चिन्मय पटवर्धन – स्वामिनी – पुणे – मुंबई
अशोक फळदेसाई – जीव झाला वेडापीसा – गोवा – सांगली
शिवानी सोनार – राजा रानीची गं जोडी – पुणे – सांगली
मनीराज पवार – राजा रानीची गं जोडी – औरंगाबाद – सांगली