राणा कपूर व वाधवान बंधू सध्या सीबीआयच्या कोठडित आहेत. वाधवान यांना एप्रिल महिन्यात महाबळेश्वरहून ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघेही सध्या तळोजाच्या कारागृहात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेने डीएचएफएलच्या रोख्यांमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात डीएचएफएलने डॉइट अर्बन या कंपनीला ६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. डॉइट अर्बन ही कंपनी राणा कपूर यांच्या मुलींच्या नावे आहे. पुढे हे कर्ज बुडित खात्यात गेले. या प्रकरणात पैशांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. डॉइट अर्बनच्या नावे ४० कोटी रुपयांचे स्थावर मालमत्ता आहे. परंतु त्याचे बाजारी मूल्य ७५० कोटी रुपयांपर्यंत फुगवून दाखविण्यात आले. त्याआधारेच डॉइट अर्बनला कर्ज देण्यात आले. याखेरीज येस बँकेने वाधवान बंधूंच्या एका कंपनीला ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याचाही तपास सीबीआयकडून सुरू आहे.