Home ताज्या बातम्या राज्यातला पहिला कोरोना रुग्ण माझ्याकडे आला आणि... पुण्याच्या आयसोलेशन वॉर्डमधल्या नर्सचे अनुभव...

राज्यातला पहिला कोरोना रुग्ण माझ्याकडे आला आणि… पुण्याच्या आयसोलेशन वॉर्डमधल्या नर्सचे अनुभव ऐकून कराल सॅल्युट! first hand experience of pune nurse handling coronavirus patients naidu hospital corona warriors | Coronavirus-latest-news


‘पुण्याच्या त्या कोरोनोग्रस्त दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तेव्हा मी एकटीच नाइट शिफ्टला होते. क्षणभर मला खूप घाबरल्यासारखं वाटलं. कारण रोज टीव्हीवर चीन, इटली, स्पेन, अमेरिका यांची अवस्था पाहत होते, या आजारावर उपचार नाही हेही माहीत होतं..’ पुण्याच्या कोरोना योद्ध्या News18 lokmat ला सांगताहेत अस्वस्थ करणारा अनुभव

पुणे, 17 एप्रिल : पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्डमध्ये कार्यरत असणाऱ्या नर्स दीपाली पिंगळे कामथे यांनी राज्यातल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताची रुग्णसेवा करतानाचे अनुभव News18 lokmat वेबसाइटशी शेअर केले. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत…

दीपाली पिंगळे (कामथे)

Coronavirus चे रुग्ण आता राज्यभरात वाढले आहेत. संसर्ग अनेक ठिकाणी पसरला आहे. आता या विषाणूबद्दल, या आजाराबद्दल अधिकाधिक माहिती समोर येते आहे. पण 9  मार्चच्या संध्याकाळी महाराष्ट्रात पहिला रुग्ण Covid-19 पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्या दिवशी 9 मार्चला रात्री 8 वाजता माझी नाईट ड्युटी संशयित कोरोनोग्रस्तांच्या वार्डमध्ये होती. मला रात्री 7.45 वाजता समजलं की, आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ते राज्यातलं पहिलं कोरोनाग्रस्त दांपत्य ठरलं आहे. क्षणभर मला खूप घाबरल्यासारखं  वाटलं. कारण रोज टीव्हीवर चीन, इटली, स्पेन, अमेरिका यांची अवस्था पाहत होते. या आजारावर उपचार नाही हेही माहीत होतं.

स्वाइन फ्लू सारखी साथ आली तेव्हा मी नुकतीच नायडू संसर्गजन्य आजारांच्या रुग्णालयात रुजू झाले होते. त्यानंतर ईबोलोची साथ आली तेव्हाही मी न घाबरता रुग्ण सेवा केली होती. पण हा आजार वेगळा होता. अधिक धोकादायक होता आणि राज्यातला पहिलाच रुग्ण माझ्यासमोर होता.

पहिलं आव्हान

वॉर्डमध्ये गेल्यावर माझ्यापुढे पहिलं आव्हान होतं ते म्हणजे कोरोनोग्रस्त दांपत्याला धीर देणं आणि कोरोनो हा आजार बरा होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणं. त्यांचं मनोबल वाढवणं. माझ्या समोर दुसरं आव्हान होतं ते म्हणजे 12 तास प्रोटेक्टिव्ह किट घालावी लागणार होती. माझ्यामुळे हा रोग इतरांना होऊ नये याचीही मला काळजी घ्यायची होती.

कोरोनाकिटचा अनुभव

हा ड्रेस  परिधान केल्यावर जो अनुभव होता तो खूपच भयानक होता. डबल मास्क घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता. शूज कव्हरचं इलास्टिक सारखं खाली सरकत होतं. पाॅलिथीन किटमुळे घामानेच अंघोळ झाली होती. त्यात माझ्या डाव्या पायाचं नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे पाय सुजला होता आणि वेदनाही होत होत्या. पण या सगळ्याचा विचार न करता मी माझे रुग्णसेवेचं कर्तव्य पार पाडलं.  सतत काही ना काही कारणाने पेशंट जवळ जावं लागत होतं. त्यामुळे किट काढता येत नव्हतं. किट काढलं आणि जर चुकून पेशंटजवळ गेले तर मलाही कोरोनो होऊ शकतो या भीतीने किटही काढता येत नव्हतं. पाणी पिण्याची इच्छा असूनसुद्धा पाणी पिता आलं नाही. चहा प्यायची  इच्छा असूनही चहा पिता आला नाही.

आई माझी काळजी करू नको

मी गेली 10 वर्षं नायडू रुग्णालयामध्ये रुग्ण सेवा करत असताना, रोज HIV, TB चे पेशंट हाताळण्याचा अनुभव पाठीशी होता तरीही मनामधील भीती जात नव्हती. माझे पती रमेश पिंगळे देखील माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहून माझे मनोबल वाढवत होते.  पण माझ्या 5 वर्षांच्या मुलाचं काय, हा ही प्रश्न समोर उभा होता. पण मुलाने – अवधूतने समजूतदारपणे सांगितलं, ‘मम्मी मी राहीन मामाकडे तू माझी नको काळजी करू.’ माझ्या कुटुंबीयांनी आधार दिल्यामुळे मनावरील ताणही कमी झाला आणि  एक प्रकारची प्रेरणा मिळाली. मी कोरोनोग्रस्त वॉर्डमध्ये ड्युटीवर सेवा करण्यासाठी हजर झाले.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा दिली

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे  प्रथम आभार मानते. पंतप्रधानांनी स्वतः फोन करून आमच्या सर्व स्टाफची तसंच कुटुंबाची विचारपूस केली, त्यामुळे आमच्या सर्व स्टाफला एक प्रकारची ऊर्जा मिळाली आणि आत्मविश्वास  वाढला. मनामधली भीती कमी झाली. तसंच पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख हंकारे सर, सह आरोग्य अधिकारी वावरे सर, नायडू  हॉस्पिटलचे अधीक्षक डाॅ. पाटसुते, तोडसाम आणि  इतर सर्व डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा सर्व नायडू हॉस्पिटल मधील  स्टाफ आणि  कर्मचारी यांचेही आभार मानते.

हे सांगण्याचा हेतू

हे सर्व तुम्हाला सांगण्यामागे हेतू इतकाच की, माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचला पाहिजे, आम्हाला कितीही त्रास झाला तरी तो आम्ही सहन करू, पण आपण विनाकारण घराबाहेर पडू नका.  आपणा सर्वांसाठी ही वेळ खूप वाईट आहे. फक्त एकच विनंती आहे की, 3 तारखेपर्यंत घरातच बसा. आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आणि आमच्या कुटुंबीयांची पर्वा न करता 24 तास तुम्हा सर्वांना रुग्ण सेवा देण्यासाठी हॉस्पिटल मध्ये  आहोत,  फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. कोरोनो बरा होऊ शकतो, फक्त सरकारच्या सूचनांचे पालन करा, आपण सर्व जण मिळून या कोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकू आणि कोरोनाला आपल्या देशांतून हद्दपार करू असा मला विश्वास आहे. हा मानव जन्म पुन्हा मिळणार नाही,  हे लक्षात ठेवा.

(शब्दांकन, संपादन – अरुंधती)

अन्य बातम्या

‘डॅडा ना तिकडे राहतो…’ पोलीस बापाचा 2 वर्षाच्या मुलाशी निशब्द करणारा संवाद

IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? सातारा SP नी शेअर केला भावुक करणारा VIDEO

गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म

First Published: Apr 17, 2020 07:57 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments