Home संपादकीय रेल्वेचे आस्ते कदम

रेल्वेचे आस्ते कदम


देशव्यापी लागू करून तीन महिने झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि विशेषतः रेल्वे बोर्ड अत्यंत सावध पावले उचलत आहे. येत्या १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, मेट्रो तसेच लोकल ट्रेनची वेळापत्रकानुसारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय त्याचेच निदर्शक आहे. रेल्वे बोर्डाने याची घोषणा केली आहे. हा निर्णय जाहीर करताना रेल्वे बोर्डाने अधिक तपशिलाने काही गोष्टी स्पष्ट करण्याची आवश्यकता होती; कारण प्रसारमाध्यमांतून त्यासंदर्भात वेगवेगळे मुद्दे येत आहेत आणि ते सामान्य लोकांचा संभ्रम वाढवतात. मुंबई, दिल्लीसह अन्य प्रमुख शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे, नियमित रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. काहींच्या म्हणण्यानुसार या मागे आर्थिक कारणे आहेत. करोनाचे संकट गंभीर असले, तरी लॉकडाउनमुळे कष्टकरी आणि विशेषतः हातावर पोट असलेल्या लोकांचे जगणे कठीण बनले आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन आणि व्यवहार पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे, त्यामध्ये रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अशा परिस्थितीत नियमित रेल्वेसेवा १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आला आहे. त्याचवेळी १२ मेपासून सुरू असलेल्या राजधानी विशेष ट्रेन आणि एक जूनपासून सुरू असलेल्या मेल, एक्स्प्रेस विशेष ट्रेन सुरू राहणार आहेत. मुंबईतील लोकलसेवा बंद राहणार असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकलसेवा सुरू राहणार आहे. सध्या ज्या राजधानी आणि विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत, त्यांना पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. विशेष ट्रेनमध्येही एकूण क्षमतेच्या ७६ टक्केच प्रवासी आहेत; त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार ट्रेन चालवणे परवडणारे नसल्याचे रेल्वे बोर्डाने अलीकडेच स्पष्ट केले होते. याचा अर्थ १२ ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनसेवा बंद ठेवण्यामागे केवळ करोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण नसून पुरेशी प्रवासी संख्या नसणे, हेही कारण आहे; त्यामुळे विमानसेवा सुरू ठेवून रेल्वेसेवा बंद ठेवण्याच्या आरोपांना फारसा अर्थ उरत नाही. अर्थात, नियमित सेवा सुरू झाल्याशिवाय जनजीवन पूर्ववत होणार नाही, याची जाणीव ठेवून त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने पावले उचलायला हवीत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments