सांख्य दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते अनेकपुरुषवादी किंवा द्वैती नाही. उपरोक्त वर्णनाचे पुरुष अनेक आहेत. प्रकृती व पुरुष ही तत्त्वे अनादि आहेत, या गृहितामुळे सांख्य आपोआप द्वैतवादी ठरतात. पुरुष निर्गुण असला, तरी प्रकृतीच्या आकर्षणामुळे त्रिगुणात्मक विश्वात अडकतो आणि अज्ञानापोटी बद्ध होतो. जेव्हा त्याला आपण वेगळे असण्याचा विवेक करता येतो, तेव्हा त्याला निर्वाण प्राप्त होते. सांख्य दर्शनाचे बरेचसे विचार वेदान्त दर्शनाने आत्मसात केले व त्यांना कलाटणी देत देत आपले तत्त्वज्ञान सिद्ध केले. सांख्यांनी पुरुष अनेक मानले. त्यांनी ईश्वर मानला होता किंवा नाही, याबाबत मतभेद आहेत. ईश्वरतत्त्व मानणाऱ्या सांख्यांना सेश्वर सांख्य असे म्हटले जाते. हे तत्त्वज्ञान ज्या प्रमाणग्रंथावर आधारित आहे, ते म्हणजे ईश्वरकृष्ण रचित ‘सांख्यकारिका’. कपिल मुनी सांख्य दर्शनाचे आद्य प्रवर्तक असले, तरी स्वत: कपिलांची रचना उपलब्ध नाही. ही सांख्यकारिकाच सेश्वर असली, तरी तिच्यातील ईश्वराचा उल्लेख करणारी कारिका लुप्त झाल्याचेही मानण्यात येते. या लुप्त कारिकेची पुन:स्थापना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथात केल्याचे आढळून येते.
प्रकृती ही त्रिगुणात्मकच आहे, याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो, तो पुरुष नावाच्या वेदान्तासाठी. सांख्य प्रकृतीच्या चोवीस तत्त्वांच्या पलीकडील ईश्वराच्या संदर्भात वेदान्ताच्या दृष्टिकोनातून हा पुरुष किंवा पुरुषोत्तम. खरे तर ब्रह्म व याच ब्रह्माचा अंश, आविष्कार मानलेला आत्मा किंवा जीवात्मा निर्गुण की सगुण?
(डॉ. सदानंद मोरे यांचा तत्त्वज्ञानासहित बहुशाखीय व्यासंग सर्वज्ञात आहे. ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. विपुल लेखन केलेले डॉ. मोरे हे त्यांच्या सर्वजनवादी मांडणीने नेहेमीच वेगळे ठरतात.)