Home संपादकीय सर्वसखा विठ्ठल!

सर्वसखा विठ्ठल!


>> संजय सोनवणी

महाराष्ट्राचे आराध्य हे एक रहस्यच बनून बसले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहस्रनामांतही न सापडणारा आणि तरीही एवढे माहात्म्य पावलेला हा देव कोणता? कोठून आला? एवढा ख्यातीप्राप्त देव असूनही पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन संशोधकांनी श्रीविठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोकदेव इटल-ब्रमलपासून ते विष्णू शब्दाच्या अपभ्रंशित रूपातही तो शोध घेतला गेला. श्रीविठ्ठलाचे ठाणे दहाव्या शतकापूर्वी शैव होते, परंतु नंतर विष्णूच्या प्रभावकाळात विठ्ठलाला बहाल केले गेले, हे बव्हंशी संशोधकांनी मान्य केल्याने श्रीविठ्ठलाच्या मुळाचा शोध एकार्थाने रहस्यमय बनून गेला. शिवाय संतांनी विठ्ठलाला बुद्धही रूपातही भजले. तर जैन धर्मीयांनी विठ्ठलाला नेमिनाथांच्या रूपात पाहिले. विठ्ठलाची ही सर्वसमावेशकता अत्यंत आदर्श असली, तरी त्याचे मूळ नेमके काय, हा प्रश्न नेहमीच संशोधनाचा राहिलेला आहे!

खरेतर श्रीविठ्ठलाच्या शोधार्थ जायचेच असेल, तर , पुंडरिक, आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती/स्थलनामांतच श्रीविठ्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि सुदैवाने त्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. श्रीविठ्ठल मूळ पौंड्र (मूळ प्राकृत पंडर) नावाने ओळखल्या जाणाऱ्या समाजाचा, आपल्या अलौकिक कर्तृत्वाने दैवतप्रतिष्ठा प्राप्त केलेला लोकप्रसिद्ध व्यक्ती असावा. असे माझ्या संशोधनातून पुढे आले आहे. हा पौंड्र समाज ऐतिहासिक असून त्याचे अनेक उल्लेख आपल्याला वैदिक वाङ्मयात तर मिळतातच, पण महाभारत आणि अन्य प्राकृत साहित्यातही मिळतात. या समाजामुळे अनेक प्रदेश आणि नगरांचीही नावे पौंड्र शब्दावरुन साधली गेली असल्याचे आपल्याला दिसते.

पंढरपूरला स्थलमाहात्म्यांतही पौंड्रिक क्षेत्र म्हटले गेलेले आहे. म्हणजेच पौंड्र समाजाने व्यापलेला प्रदेश म्हणून पौंड्रिक क्षेत्र, असा संबंध असल्याचे सरळ दिसते. श्रीविठ्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे- पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पूरगौर शिवाचा निर्देश होत असला, तरी विठ्ठल हा गौर नसून काळासावळा आहे; त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. विठ्ठलाला आता विष्णू वा कृष्णाचे चरित्र बहाल केले गेले असले, तरी ते त्याच्या मूळच्या शैव रूपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत माणिकराव धनपलवार व डॉ. रा. चिं. ढेरे यांनी सिद्ध केलेले आहे. तो आपल्यावर रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विठ्ठलाचे आगमन झाले, अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे हेही डॉ. ढेरेंनी सिद्ध करून दिले आहे.

स्थलपुराणात पंढरपूरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो. पांडुरंग (पौड्रंक) ही उपाधी विठ्ठलाचे पर्यायी नामच बनून गेल्याचेही आपल्याला दिसते. पौंड्रिक क्षेत्र म्हणून पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विठ्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपूर हे स्थलनाम, यांवरून शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले जाते आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. ‘पांडुरंग’ ही उपाधी नसून ते श्रीविठ्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले. एवढेच नव्हे तर पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती पौंड्रिक (मूळ पंडर) या शब्दातच दडली आहे. पंडरंगे वा पंडरंगपल्ली ही कानडी नावे मूळ पंडर या शब्दाशी जवळीक साधतात हे उघड आहे. पुंडरिक हा शब्द पौंड्रिक (किंवा मूळ पंडरिक) या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मूळ ‘पौंड्र’ कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शूद्र (अवैदिक) समाजाचे सर्वप्रथम उल्लेख सापडतात ते इसवीसन पूर्व आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात.

विश्वामित्रांच्या १०० मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इत्यादी ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ही ऐतरेय ब्राह्मणातील मिथककथा सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादि बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. वैदिक धर्माबाहेरच्या समाजांना वैदिक परंपरेने शूद्र मानले आहे, त्याचेच प्रतिबिंब आपल्याला ऐतरेय ब्राह्मणातील मिथककथेत दिसते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजूने लढले होते, असाही संदर्भ आपल्याला मिळतो. हे प्राचीन काळचे मुख्यत: पशुपालक व कृषक समाज. त्यातील पौंड्रांनी बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र आणि दक्षिणेतील अनेक प्रदेशांत आपल्या वसाहती केल्या, याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत.

दक्षिणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपूर अशी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या शहरांत विठ्ठल मंदिरेही आहेत. बंगालमधील पौंड्रांनी तेथील पुंड्रपूर नावाच्या शहरातूनच राज्यकारभार चालवला होता, असे ह्यु-एन-त्संगने नोंदवून ठेवले आहे. महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असण्याची शक्यता आहे. अन्यथा हे नाव प्रदेशनाम म्हणून दक्षिणेत येण्याची शक्यता नाही. पौंड्र समाजाने महाराष्ट्रातही वसाहती केल्या, हे यावरून सिद्ध होते. हा काळ नेमका कोणता याचा आज अंदाज करता येणे शक्य नसले, तरी किमान इसवीसन पूर्व एक हजार एवढा तरी असावा, हे या समाजांच्या प्राचीनतेवरून दिसते. म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पंडरपूर, सं. पौंड्रपूर वा पुंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची म्हणजेच मूळच्या पंडर समाजाची राजधानी होती व या समाजाचे वास्तव्य या भूभागात असल्याने ते पंडरक्षेत्र (पौंड्रिक क्षेत्र) म्हटले गेले असावे, हे आता सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे. मूळ प्राकृत शब्दांचे संस्कृतकरण करण्याच्या नंतरच्या काळातील प्रवृत्तीमुळे आपल्या इतिहासाबाबत अनेक विक्षेप निर्माण झालेले आहेत, हेही येथे लक्षात घ्यावे लागते. श्रीविठ्ठलाची विशेष उपाधी आहे-पांडुरंग. तिचाही अर्थ आता सहज उलगडतो. पांडुरंग हे नाव मुळात विठ्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला, तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. पंडरंगे या कानडी उपाधीत मूळ स्वरूप जपले गेले आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो ‘पौंड्रक वासुदेव’ या नावाने ओळखला जात होता. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला ‘पौंड्रंक’ (पंडरंग) अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. ते मराठीत कालौघात पांडुरंग झाले असणार, असा प्रबळ तर्क बांधता येतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या शक्यतेमुळं लोक धास्तावले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्य पुन्हा लॉकडाउनकडे तर जाणार नाही, अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. राजकीय...

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना खुले आव्हान, म्हणाले… – This Fight Is Between Hyderabad And Bhagyanagar Says Aimim Chief Asaduddin Owaisi

हैदराबाद: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रीय...

Shiv Sena on Love Jihad: भाजपवाल्यांनी ‘या’ भ्रमातून बाहेर पडावं; शिवसेनेचा इशारा – shiv sena slams bjp for demanding law against love jihad in...

मुंबई: 'लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास...

Recent Comments