Home संपादकीय साठीमध्ये पोहोचलेला परिपक्व महाराष्ट्र!

साठीमध्ये पोहोचलेला परिपक्व महाराष्ट्र!नारायण राणे

लॉकडाउनच्या काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून महाराष्ट्र दिनानिमित्त लेखाची मागणी आली. हाताशी मदतनीस नसताना, संदर्भाची साधने नसताना, जमेल तेवढे कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न! छत्रपती शिवरायांशिवाय महाराष्ट्र नजरेसमोरही येऊ शकत नाही. वेगवेगळ्या राजवटींमध्ये विभागलेला मराठी मुलुख छत्रपतींनी आपल्या कर्तृत्वाने एकत्र आणला व तो पुढे महाराष्ट्र म्हणून नावारूपास आला. महाराष्ट्र हे लढवय्यांचे राज्य. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा महाराष्ट्राला स्वतंत्र राज्यासाठी लढा द्यावा लागला. या लढ्यामध्ये १०६ हुतात्म्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. सरते शेवटी १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या सर्व हुतात्म्यांना मी महाराष्ट्राच्या ‘साठी’ निमित्ताने मनोभावे आदरांजली अर्पण करतो. १ मे २०२० रोजी आपल्या महाराष्ट्राला साठ वर्षे पूर्ण होतील. पूर्वीच्या काळात साठी पूर्ण होणे म्हणजे वृद्धत्वात प्रवेश करणे असा समज होता, त्या जागी आता साठी म्हणजे परिपक्वता असे गृहीत धरले जाते. ही परिपक्वता विशेषत: आताच्या करोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील जनता दाखवेल अशी माझी अपेक्षा तर आहेच, तीच माझी महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती सुद्धा आहे. कृपया घरात राहा, गर्दी करू नका आणि केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३ लाख ७ हजार ६९० चौरस किलोमीटर्स आहे. क्षेत्रफळाने महाराष्ट्र हे भारतातील तिसरे मोठे राज्य. २०११ च्या शिरगणतीप्रमाणे राज्यातील लोकसंख्या ११ कोटी २५ लाख, म्हणजे देशात दुसरा क्रमांक. आता ही लोकसंख्या साडेबारा कोटींच्या वर गेलेली असेल. राज्याला ७२० किलोमीटरच्या सुंदर समुद्र किनाऱ्याची नैसर्गिक देणगी लाभली आहे. भारताच्या कररूपी महसुलापैकी ४० टक्के महसूल एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (GDP) महाराष्ट्राचा वाटा १८ ते २० टक्क्यांचा असतो. भारतातील आंतरराष्ट्रीय बंदरापैकी महाराष्ट्राच्या बंदरांवर सर्वाधिक माल हाताळणी होते. स्थापनेपासून महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य राहिले आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न कायमच देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीच्या वर राहिले आहे. सध्याचा काळ वगळता औद्योगिक प्रगतीमध्ये आणि विशेषत: थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकावर राहत असे. स्थापनेपासून महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेले राज्य राहिले. १९६१ साली महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ४००० रुपये होते, ते २०१९ सालच्या अपेक्षित आकड्यांप्रमाणे २ लाख ७ हजार रुपयांवर पोहोचले. साठ वर्षांत आपण आपले दरडोई उत्पन्न पन्नास पट असे प्रचंड प्रमाणात वाढवले. महाराष्ट्राला उद्योगांची फार जुनी परंपरा आहे. कापड गिरण्यांच्या रूपाने महाराष्ट्राने भारताला आधुनिक प्रगतीची कवाडे उघडी करुन दिली. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, वातावरण आणि मुख्य म्हणजे कार्यसंस्कृती (Work Culture) यांच्या जोरावर महाराष्ट्र हे भारताच्या प्रगतीचे इंजिन राहिले. यामुळेच देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ होते, तेव्हा महाराष्ट्रामध्ये ती वाढ १० टक्क्यांची असते.

महाराष्ट्राने जशी आधुनिक औद्योगिक प्रगतीची देशामध्ये सुरुवात केली, तसाच या उद्योगातील कामगारांच्या कल्याणासाठीचा लढाही महाराष्ट्राने देशाला दिला. गिरणी कामगारांची संघटना हे त्याचे उत्तम उदाहरण. महाराष्ट्रातील कामगारांच्या संघटनांनी लढा जरुर दिला, पण उद्योग बंद पडेपर्यंत ताणले नाही (अर्थात गिरणी कामगारांच्या बाबतीत नंतर काही वेगळा इतिहासा घडला.). तुटेपर्यंत न ताणण्याच्या महाराष्ट्राच्या या कार्यसंस्कृतीमुळेच येथे उद्योगांना पोषक वातावरण निर्माण झाले व औद्योगिक प्रगतीने येथे बाळसे धरले. महाराष्ट्राच्या औद्योगिक पुढारलेपणाचे सारे श्रेय मी या कार्यसंस्कृतीला, म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेला देतो. देशात आपल्या आधीपासून प्रगतीपथावर असलेल्या राज्यांना ही कार्यसंस्कृती जमली नाही आणि त्यांना मागे पडावे लागले. देशामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य राहण्यामध्ये या राज्यातील जनतेचा जसा सिंहाचा वाटा आहे, त्याच प्रमाणे आदरणीय कै. यशवंतराव चव्हाणांपासूनच्या मुख्यमंत्र्यांच्या परंपरेने, तसेच कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या योगदानामुळे आणि अंबानी, टाटा, महिंद्रा, किर्लोस्कर, गरवारे यांसारख्या उद्योग घराण्यांच्या उद्यमशीलतेमुळे महाराष्ट्र देशात नेहमी अग्रस्थानी राहिला. साहित्य, नाट्यक्षेत्र, सिनेमाविश्व, मनोरंजन क्षेत्र यातील कलाकार, अभिजात संगीत व कलाक्षेत्रातील कलाकारांच्या योगदानामुळे सुद्धा देशभरात आणि जगभरात महाराष्ट्राच्या बाबतीतील आदर वाढीस लागला आहे.

आज महाराष्ट्र राज्य ‘साठी’ पूर्ण करीत असताना, या राज्याला भयानक करोना रोगाशी झगडावे लागत आहे. राज्यावरील, देशावरील आणि जगावरील करोनाचे संकट जेव्हा संपुष्टात येईल, त्यानंतर त्याहून मोठे आर्थिक संकट आपल्या महाराष्ट्रासमोर आ वासून उभे असेल. या जीवन-मरणाच्या संकटावर मात करायाची असेल, तर प्रशासन आणि शासनामध्ये भक्कम समन्वय असला पाहिजे. प्रशासनाची गतिमानता कित्येक पटींनी वाढविण्याची गरज आहे. अन्यथा, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व गोरगरीब जनतेच्या हालांना पारावार रहाणार नाही. या दुहेरी संकटातून महाराष्ट्राची लवकरच सुटका होवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री व दीपस्तंभ आदरणीय कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी काढलेले उदगार उद्धृत करून आपली रजा घेतो-

‘महाराष्ट्राची ही भूमी अनेक संत, पराक्रमी वीर, त्यागी समाजसुधारक, विद्वान, देशभक्त यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा जोतिबा फुले व लोकमान्य टिळक ही आमची प्रातिनिधिक प्रतीके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला. हा अमोल ठेवा आपल्या हृदयात जपून ठेवणे व त्याचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य ठरते.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Recent Comments