Home मनोरंजन सायकलशी माझं जणू अफेअरच आहे: सोनाली कुलकर्णी

सायकलशी माझं जणू अफेअरच आहे: सोनाली कुलकर्णी


मुंबई: सायकलचं आणि माझं नातं तसं जुनंच. कारण मी मूळची पुण्याची आहे. पाचवीत असताना मी सायकलनं शाळेत जायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजला बीएच्या दुसऱ्या वर्षाला जाईपर्यंत मी पेडल मारतच जायचे. माझी सायकलही जरा स्पेशल होती. शाळेत तेव्हा माझी एकटीची सायकल सोनेरी-पिवळ्या रंगाची सायकल होती. सायकलशिवाय माझं पान हलायचं नाही म्हणा ना. सायकल हातात असली की मला स्वयंपूर्ण असल्यासारखं वाटायचं. तेव्हा मी आईची मी निरोप्या होते. नातेवाईकांकडे खाउचे डबे पोहोचवणं, निरोप देणं ही कामं करायला मी एका पायावर (म्हणजे दोन पेडलवर) तयार असायचे.

तेव्हा मी नाच आणि गाणं दोन्ही शिकत होते. औंधला जाण्यासाठी बसची वाट पाहत बसण्यापेक्षा आपली सायकल दामटत जाण्यात मला मोकळेपणा वाटायचा. पुण्यात असेपर्यंत सायकल हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. पुढे चित्रपटात काम करणं सुरू झालं आणि मुंबईला आले. या मायानगरीत सायकलशी संबंध काहीसा दुरावला. एकदा एका गॅरेजेमध्ये गेले असताना तिथे एका कोपऱ्यात सेकंडहँड सायकल पडलेली पाहिली. ‘ही सायकल मला द्याल का?’, मी त्या गॅरेजवाल्याला विचारलं. त्यानंही अत्यल्प पैशांत मला ती दिली. काही दिवस मी ती चालवली. नंतर २६ जुलैच्या पावसात ती खराब झाली. झालं असं, की त्या दरम्यान मी बाहेरगावी गेले होते. सायकल बाहेर राहिली होती. मी घरी येईपर्यंत ती पूर्ण गंजून गेली होती.

त्या दरम्यान नवऱ्याबरोबर माझं डेटिंग सुरू झालं होतं. एकदा त्यानं मला विचारलं, ‘तुला काय गिफ्ट हवं?’ मी त्याच्याकडे चक्क सायकल मागितली आणि मुंबईतली माझी पहिली फर्स्टहँड सायकल दारात आली. त्यानंतर काही दिवस मी दणकून सायकल चालवली. पुन्हा एकदा माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसांत रमले होते. थोडंसं काही सामान आणायचं असेल, तर मी गाडी नेणं बंद केलं. त्याऐवजी पेडल मारत निघायचे. आजही अनेक गोष्टी आणायला मी सायकलवरच जाते. दर रविवारी न चुकता सायकलिंगला जायचं आणि परत येताना शहाळी घेऊन यायची हा ठरलेला नेम आहे. मध्यंतरी, कौस्तुभ राडकर हा प्रशिक्षक माझ्या आयुष्यात आला. त्यानं विचारलं, ‘तू ट्रायक्लॉथॉनमध्ये भाग घेशील का?’ मनात वाटलं, ‘आपल्याला हे जमेल का?’. पण तो म्हणाला, ‘डोंट वरी, मी तुला शिकवेन.’ मी त्यात भाग घेऊ लागले. त्यात १ किमी पोहणं, २५ किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणं असतं. त्यातला सायकलिंग हा माझा खूप आवडता भाग. मला खूप मजा आली. गेल्या वाढदिवसाला मी गिअर्ड सायकल घेतली आहे. सकाळीच मी सायकल दामटत निघते आणि कधीतरी माझ्या नातेवाईकांकडे, मित्र-मैत्रिणींच्या घरी अचानक एंट्री घेते. माझ्याबरोबर तुम्हीही सायकल चालवायला या, असं त्यांनाही सांगत असते. सायकलशी इतकं जवळचं नातं जुळलंय, की माझं अफेअर नवऱ्यापेक्षा सायकलीशी जास्त होत चाललंय की काय, अशी शंका यावी. अलीकडेच लॉकडाउनच्या आधी माझ्या मुलीसाठी मी नवीन सायकल घेतली. तिला सायकल चालवताना पाहिलं की माझे बालपणीचे क्षण पुन्हा जगतेय की काय, असं वाटू लागतं.

शब्दांकन –
हर्षल मळेकरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments