सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतात महाराष्ट्रातील सुमारे १५० लोक करोना प्रकोपामुळे १५ मार्चपासून अडकून पडले आहेत. त्यांना परत महाराष्ट्रात येता यावे म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्जदेखील केले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरू करून परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचे काम सुरू केले.
मात्र, सौदीमध्ये अडकलेल्या या नागरिकांना आणण्यासाठी अद्याप विमानाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यांनी भारतीय राजदूतावासाशीही यासंदर्भात संपर्क साधला. मात्र, महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांसाठी विमान उपलब्ध करून देण्याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही. सोशल मीडियातून त्यांनी केलेल्या विनंत्यांनाही अद्याप उत्तर आले नाही.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही या नागरिकांनी संपर्क करून ‘महाराष्ट्रात परत येण्यास मदत करावी’, असे आवाहन केले आहे. मात्र, अद्यापपर्यंत या नागरिकांना सौदी अरेबियातून बाहेर पडण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
नोकरीविना साडेतीन महिने…
‘सौदीत अडकलेल्या काहीजणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. आमच्यापैकी काहीजण एकटे आहेत तर काहींची कुटुंबेदेखील आहेत. अर्थार्जनाविना या सगळ्यांना सौदीत राहणे अत्यंत कठीण झाले आहे. मागील साडेतीन महिन्यांपासून अत्यंत अडचणीत येथे राहावे लागत आहे’, असे दम्मम येथे अडकलेले आणि मूळचे वाशीमचे मंगेश आंबटपुरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने या अडचणीच्या काळात आमची मदत करावी आणि महाराष्ट्रात परत येण्याची सोय करावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.