दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी इंस्टाग्रामवर सत्यमेव जयतेच्या सेटवरील जॉन अब्राहमच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे.
मुंबई, 17 जानेवारी : जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच आगामी चित्रपट‘सत्यमेव जयते – 2’(Satyamev Jayte-2)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी ( Milap Zaveri) करत असून जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी देखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं शेवटच्या टप्प्यातील शूटिंग सुरू असून नुकतंच दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी इंस्टाग्रामवर सत्यमेव जयतेच्या सेटवरील जॉन अब्राहमच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोला त्यांनी जबरदस्त कॅप्शन देत, ‘हा हात नव्हे, जॉन अब्राहमचा हातोडा’ असल्याचं म्हटलं आहे. जॉनच्या कोपरापासून ते मुठीपर्यंतच्या हाताचा हा फोटो आहे. यात त्याच्या हातावरील सगळ्या शिरा ताणलेल्या दिसत आहेत. त्यामुळे खरोखरच तो हात खूप शक्तिवान दिसतोय. त्यामुळेच कदाचित त्याला हातोड्याची उपमा दिली आहे.
यानंतर जॉन अब्राहम (John Abraham) याने आपल्या अकाउंटवर हा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी देखील विविध प्रतिक्रिया दिल्या. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका चाहत्याने यानंतर सत्यमेव जयते (Satyameva Jayate 2) ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर आपल्या बॉडी फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याला देखील जॉनच्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. टायगरने Insane असं लिहीत फोटोवर कमेंट केली.
या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटासाठी लखनऊ, वाराणसी आणि मुंबईमध्ये शूटिंग होणार आहे. सध्या लखनऊमधील शूटिंग पूर्ण झालं असून, मे महिन्यात 12 तारखेला ईदला (Eid) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, सत्यमेव जयते 2 सोबत जॉन लवकरच शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) पठाण या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.