Home संपादकीय हॉलिवूडच्या अंतरंगाची उकल

हॉलिवूडच्या अंतरंगाची उकलसंतोष पाठारे

बॉलिवूडमधील झगमगाटाच्या आड दडलेल्या काळोख्या जगाची चर्चा सध्या सुशांत सिंग राजपूत या उमद्या नायकाच्या आत्महत्येमुळे सर्वत्र होत आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला या चंदेरी दुनियेचं आकर्षण वाटत असलं, तरी इथे प्रवेश करणाऱ्या बहुतेकांना या क्षेत्रात करावे लागणारे कष्ट आणि तडजोडी यांची कल्पना असते. ज्यांना ते मानवत नाही ते आपोआपच इथून काढता पाय घेतात.

काहीजण आपल्या क्षमतेच्या बळावर पाय घट्ट रोवून उभे राहतात, तर काही जण इथल्या दलदलीत उन्मळून पडतात. त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा मार्गही बंद झालेला असतो. इथे फक्त यशाची भाषा बोलली जाते आणि अपयशाला तोंड लपवावं लागतं. मुंबईत फोफावलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीने ज्या चित्रपटसृष्टीकडून असा नावाचा अपभ्रंश करून घेतलाय, त्या हॉलिवूडमध्ये या नीती-नियमांची रुजवात झाली आहे. चित्रपटाचा जन्म फ्रान्समध्ये झालेला असला, तरी त्याला व्यावसायिक बाळसं चढलं हॉलिवूडमध्ये!

प्रेक्षकांना स्वप्नांच्या दुनियेत नेण्याची किमया हॉलिवूडच्या चित्रपटांनी केली. चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन हे समीकरण, हॉलिवूडच्या चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांच्या मनात दृढ केलं. जगातील बहुतांशी चित्रपटसृष्टीनी हॉलिवूडचा कित्ता गिरवला. कलात्मकतेपेक्षा स्वस्त मनोरंजनाचे माध्यम म्हणून चित्रपटांची जी प्रतिमा निर्माण झाली, ती अजूनही पुसली गेलेली नाही. अशी प्रतिमा निर्माण करण्यात हॉलिवूडचा मोठाच सहभाग आहे.

कथानकांची लार्जर दॅन लाईफ मांडणी, स्टार्सचं वलयांकित आयुष्य आणि केलेल्या कामाची इतिश्री म्हणजे ऑस्कर पुरस्कार, या घटकांमुळे बद्दल सर्वसामान्य प्रेक्षकांत असलेलं आकर्षण कायम आहे. मात्र बाहेरून इतकी भव्य दिव्य दिसणारी ही सृष्टी नेमकी कशी आहे? इथल्या माणसांचे मनोव्यापार कसे आहेत? यशाची शिखरं चढताना त्यांना कोणत्या काटेरी मार्गावरून वाटचाल करावी लागते? करोडो रुपये खर्च करून निर्माण होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मागे किती कलाकार आणि तंत्रज्ञांची मेहनत असते? सर्जनशील म्हटली जाणारी ही माणसं अदृश माफियांच्या हातातली कळसूत्री बाहुली असतात का? हे प्रश्न प्रेक्षकांसाठी अनुत्तरित राहत असतात.

हॉलिवूडच्या या अंतरंगाचा धांडोळा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्वेन्टीन टेरिन्टीनोने आपल्या ‘वन्स अपॉन अ टाईम’ या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात घेतला होता.१९६९ साली घडलेल्या काही वास्तव घटनांचा आधार आणि त्यात गुंतलेल्या हॉलिवूडमधील कलाकारांच्या व्यक्तिरेखा घेऊन क्वेन्टीन टेरिन्टीनोने एक संथ लयीतील काल्पनिक गोष्ट रचली होती. साठच्या दशकातील हॉलिवूडचं स्वरूप त्याने परिणामकारक रीतीने चित्रित केल होतं. या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘हॉलिवूड’ मालिका आपल्या मनात दडलेल्या उत्सुक प्रश्नांची उत्तरं देते, पण ही उत्तरं हॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटाला शोभतील अशाच पद्धतीने मांडली गेली आहेत.

रायन मर्फी आणि इआन ब्रेनन या दिग्दर्शकांनी हॉलिवूडची अंदर की बाते सांगण्यासाठी चिरपरिचित फॉर्म्युला वापरल्यामुळे मालिका रोचक झाली असली, तरी पहिल्या दोन भागात जाणवणाऱ्या वेगळेपणाच्या शक्यता नंतर नाहीशा होतात आणि शेवटी एक सुखांतिका पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांच्या पदरी पडतं.

आपल्या अभिनयाला वाव मिळेल व त्यायोगे प्रसिद्धी आणि पैसा कमवता येईल, या उद्देशाने हॉलिवूडमध्ये आलेले होतकरू तरुण-तरुणी, त्यांना काम देण्याचे आश्वासन देऊन आर्थिक व लैंगिक शोषण करणारे मध्यस्थ, प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चित्रपट निर्माण करून आर्थिक यशावर डोळा ठेवणारे स्टुडिओ निर्माते आणि त्यांचे सहकारी, अशा नमुनेदार व्यक्तिरेखांची रेलचेल या मालिकेत आहे.

जॅक कास्टेलो (डेविड कॉरेनस्वेट) हा देखणा तरुण एस. स्टुडीओबाहेर रोज उभा राहून छोटं-मोठं काम मिळेल या संधीची वाट पाहत असतो. गरोदर बायको, घरखर्च चालवण्याचा ताण, यामुळे तो नाईलाजाने अर्नीच्या गॅस स्टेशनवर काम करू लागतो. अर्नी त्याच्याकडे कामावर असणाऱ्या तरण्याबांड मुलांना श्रीमंत ग्राहकांकडे शय्यासोबत करायला पाठवत असतो. यामुळे त्यांना पगाराबरोबर बऱ्यापैकी वरकमाई होत असते. जॅकची ओळख या निमित्ताने एवीस अॅम्बर्गशी (पॅटी लुपोन) होते. एवीसचा नवरा एस. स्टुडिओचा मालक असतो.

ऑस्कर पुरस्कार मिळवण्यापेक्षा पैसा कमवण्यात अधिक थ्रील आहे, अशी एस अॅम्बर्गची पक्की समजूत असते. म्हणूनच त्याच्या सल्लागारांनी दिलेला, पेग या आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्रीच्या जीवनावरील सिनेमा बनवण्याचा, प्रस्ताव तो धुडकावून लावतो. पेगची पटकथा आर्ची कोलमन (जेरेमी पोप) या आफ्रिकन लेखकाने लिहिलेली असते. आपले प्रेक्षक या लेखकाला आणि काळ्या अभिनेत्रीला स्वीकारणार नाहीत, हे एसच्या नकाराचं अजून एक कारण असतं. आर्चीसुद्धा जॅकबरोबर अर्नीच्या गॅस स्टेशनवर काम करत असतो. त्याची ओळख हॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेल्या रॉक हडसनबरोबर होते. तो रॉकच्या प्रेमात पडतो

कास्टिंग डिरेक्टर असणारा हेन्री (जिम पार्सस) रॉकची ‘पेग’ चित्रपटात वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्यासाठी रॉककडून शरीरसुखाची मागणी सुद्धा करतो. ‘पेग’च दिग्दर्शन करणारा रेमंड (डरेन क्रिस) कॅमिल वॉशिंग्टन (लारा हरीएर)च्या प्रेमात असतो. आपल्या चित्रपटात तिला प्रमुख भूमिका मिळावी, म्हणून तोसुद्धा मोर्चेबांधणी करतो. एवीसमुळे रॉकऐवजी जॅकला नायकाची भूमिका मिळते आणि स्क्रीन टेस्टमधील उत्तम परफॉर्मन्समुळे कॅमिलीला ‘पेग’च्या प्रमुख भूमिकेसाठी निवडलं जातं. क्लेर वूड (समारा विविंग) ही एसची मुलगी असूनही तिला सहायक भूमिकेवर समाधान मानावं लागतं. (नेपोटीझमची ऐशीतैशी!)

या प्रोसेसमध्ये सर्वांनाच अनेक तडजोडी कराव्या लागतात. वर्णद्वेषी गोऱ्यांच्या निषेधाला घाबरून चित्रपटाचे शीर्षक ‘पेग’वरून ‘मेग’ केलं जातं. हेन्री, एवीस अॅम्बर्गला ब्लकमेल करून रॉकची वर्णी सिनेमात लावतोच, पण निर्मितीमध्ये सुद्धा स्वतःचा हिस्सा मागतो. चित्रपटाच्या वाढलेल्या बजेटचे पैसे रेमंड, जॅक आणि आर्चीच्या वतीने अर्नी चुकते करतो. या चित्रपटाच्या निर्मितीवर नाखूश असलेले स्टुडिओचे भागीदार, तयार झालेल्या चित्रपटाची रीळं आगीत भस्मसात करून टाकतात. अशा अनेक अडचणींवर मात करून एस. स्टुडिओद्वारे ‘मेग’ प्रदर्शित केला जातो. त्याला व्यावसायिक यशाबरोबर चार ऑस्कर पुरस्कारसुद्धा मिळतात. याच काळात प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख होते. आर्ची, रॉक हडसनला आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतो. स्टुडिओचा सल्लागार डिकला त्याची समलैंगिकता मोकळेपणाने व्यक्त करण्याचं बळ मिळतं.

हॉलिवूडमधील कथानकाचा काळ चाळीसच्या दशकातील असला, तरीही त्यात चित्रपटनिर्मितीची दाखवलेली प्रक्रिया आणि त्यात गुंतलेल्या माणसांचे वासनाविकार यात आजही बदल झालेला नाही. रायन मर्फी आणि इआन ब्रेनन या जोडगोळीने तत्कालीन स्टुडिओ सिस्टीमचं असलेलं वर्चस्व, अभिनयापेक्षा कलाकारांच्या देखणेपणाला असलेली मागणी, काम मिळवण्यासाठी स्टुडिओतील अधिकाऱ्यांनी पुरुषकलावंतांचं केलेलं लैंगिक शोषण आणि त्यांच्या मनातील वर्णद्वेष याचं तपशीलवार चित्रण केलं आहे. हॅती मॅकडॅनिअल (‘गॉन विथ द विंड’साठी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवणारी आफ्रिकन कलाकार), रॉक हडसन यांसारख्या वास्तवातील व्यक्तिरेखा घेऊन मालिकेचा सच्चेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या बँड म्युझिकचा पार्श्वसंगीतासाठी केलेला वापर, स्टुडिओच्या परिसराचा सेट, स्क्रिप्टच्या वाचनापासून चित्रीकरण, संकलनाची प्रक्रिया आणि ऑस्कर सोहळ्याचं चित्रण, आपल्याला त्या काळात घेऊन जाण्यात यशस्वी होतं. कॅमिलीने पुरस्कार सोहळ्यात आयोजकांची नाराजी ओढवून पहिल्या रांगेत बसणं, आर्चीने रॉक हडसनचा हात हातात घेऊन रेड कार्पेटवर प्रवेश करणं, या घटना कपोलकल्पित असल्या, तरीही त्या दिग्दर्शकांचा रोख स्पष्ट करतात.

‘हॉलिवूड’ तिथल्या भ्रष्ट आणि किडलेल्या स्टुडिओ सिस्टीमची गोष्ट सांगू पाहते, पण ही गोष्ट आपण आजवर पाहत आलेल्या इतर हॉलिवूडपटासारखी चकचकीत झाली आहे. त्यामुळे त्यातील पात्रांची वेदना आपल्याला कळते, पण भिडत नाही!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments