आमिरच्या आईचा रिपोर्टही निगेटीव्ह आला असून त्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत. मंगळवारी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट करत आमिरनं कर्मचाऱ्यांना करनोची लागण झाल्यासंदर्भात माहिती दिली होती. त्याच्या घरातील कर्मचा-यांना करोनाची लागण झाल्याचं त्यात म्हटलं होतं.कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना तातडीची सर्व ती मदत करण्यात आल्याचंही आमिरनं म्हटलं होतं.
दरम्यान, राज्यात मंगळवारी २४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. मुंबईत आज ३६ रुग्णांचे मृत्यू झाले असून, औरंगाबाद शहरात ११, ठाणे शहरात नऊ आणि पुणे शहरात पाच रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ७,८५५ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज दिवसभरात चार हजार ८७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात ८९३ नवी रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ७७ हजार ६५८ इतका झाला आहे. ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद दिवसभरात झाल्यामुळे मुंबईतील एकूण करोनाबळी चार हजार ५५६ इतके झाले आहेत, असे ते म्हणाले.