वाचा: आमची नाराजी नाहीच; आघाडी भक्कम: काँग्रेस
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
१९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे त्यांचे कामाचे स्वरूपही स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: ‘अन्न व नागरीपुरवठा’च्या त्या सहसचिवाची अखेर उचलबांगडी
अजोय मेहता यांना मुख्य सचिव म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का?, हा प्रश्न गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात कळीचा ठरला होता. अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा अजोय मेहता यांच्या मुदतवाढीस विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. या सर्व चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. अजोय मेहता यांचा मुख्य सचिव म्हणून ३० जून हा अंतिम दिवस असेल, हे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
संजय कुमार नवे मुख्य सचिव?
अजोय मेहता यांच्या जागी मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. संजय कुमार हे सध्या गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तसा शासनादेश नंतर निघू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
वाचा: …म्हणून CM उद्धव ठाकरे म्हणाले, करोना हा आपला शेवट नव्हे!