Home संपादकीय Article News : करोनाकाळात साहित्य व्यवहार - corona crisis and literature movement

Article News : करोनाकाळात साहित्य व्यवहार – corona crisis and literature movement


अरविंद सुरवाडे

लॉकडाउनमध्ये ज्या विभिन्न ऑनलाइन लाइव्ह सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रस्तुतीकरण झाले, त्यांची दखल घ्यायला हवी. या चर्चा-संवादाचे चित्रीकरण जपले पाहिजे. या सगळ्यांचे संकलन आणि संहितीकरण केले, तर सांस्कृतिक संचितात नक्कीच भर पडेल…

आपल्या काही हाय प्रोफाइल उपभोक्त्यांसाठी ऑगस्ट, २०१५मध्ये फेसबुकने ‘लाइव्ह’ची सुविधा दिली. मार्क झुकेरबर्ग यांच्या या संकल्पनेची चंगळवादी चोचले म्हणून संभावना केली गेली असली, तरी त्याच वर्षी मार्कने ठरवून टाकले, की आयफोन आणि अँड्रॉइड फोन असलेल्या सगळ्यांना या सेवेचा लाभ दिला जाईल. प्रत्येकाच्या खिशात टीव्ही कॅमेऱ्यासारखी वस्तू असावी, हे त्याचे स्वप्न होते. तेव्हा मार्क झुबेरबर्ग यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जवळ जवळ शंभर तंत्रज्ञांना काही महिने, आत्ताच्या भाषेत आपण म्हणू क्वारंटाइन केले आणि यात यश मिळवले. एप्रिल २०१६पासून ही सुविधा सर्वांसाठी खुली झाली. करोनाकाळात हेच तंत्रज्ञान रचनात्मक पातळीपासून इतर सगळ्यांच क्षेत्रात उपयोगी सिद्ध होत आहे.

लॉकडाउनचे चार टप्पे आणि ‘अनलॉक वन’ पार करेपर्यंत, या ‘लाइव्ह’ घडामोडींनी जगातील सगळ्यांच्याच जगण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केलेला दिसतो. देशातील सांस्कृतिक क्षेत्र याला अपवाद राहिलेले नाही. लॉकडाउनच्या या दीर्घ काळात सांस्कृतिक घडामोडी, सांस्कृतिक अवकाश जिवंत ठेवण्यासाठी आणि सांस्कृतिक विश्वातील कलाकार, साहित्यिक, रंगकर्मी, लोककलावंत अशा सगळ्या घटकांची घरबंदीच्या निरसतेतून सुटका करत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, संपर्क वृद्धिंगत करण्यासाठी, नवीन सृजनासाठी या माध्यमाचा उपयोग झालेला दिसतो. ‘लाइव्ह’च्या या प्रयोगाचे मूल्यमापन करताना लक्षात येते, की आपल्याकडे हे माध्यम हाताळताना नेहमीप्रमाणे दूरदृष्टीचा अभाव आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील साहित्यिक घडामोडींवर, विशेषतः काव्यमैफलींची सर्वाधिक पकड राहिलेली आहे, तरीही ऑनलाइन माध्यमाचा कला व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यापक, बहुआयामी वापराचा जिथवर प्रश्न आहे, तिथवर या माध्यमाचा अनेक ठिकाणी सकारात्मक आणि नवीन दृष्टीचा आविष्कार दिसतो. आतापर्यंत मुख्य प्रवाहाने दुर्लक्षित केलेल्या अनेक लहान गटांनी आपल्या विविधांगी कार्यक्रमांतून अस्ताव्यस्तपणे का होईना; पण घराच्या चार भिंतीत राहून, मोबाइल, संगणकावर मर्यादित स्पीड असलेल्या इंटरनेट व्यवस्थेवर मात करत, अनेक कार्यक्रम, चर्चासत्रे, वेबिनार आयोजित करून लोकांच्या ज्ञानात भर टाकली आहे. एका मोठ्या समुदायाला एकांतवासाची, तुटलेपणाची झळ बसू न देता, त्यांना रचनात्मक कामात गुंतवून, त्यांचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे.

आपला सांस्कृतिक व्यवहार हा नेहमीच विषमतापूर्ण राहिलेला आहे. सांस्कृतिक व्यवहारात नेहमीच अभिजन वर्गाचे वर्चस्व आहे; त्यामुळे अनेक कलावंतांना उपेक्षेचे धनी व्हावे लागले. सांस्कृतिक क्षेत्रातील माध्यमे अभिजन वर्गाच्या हातात असल्याने, इथला सांस्कृतिक अवकाश नेहमीच एकांगी राहिला. सोशल मीडिया काही प्रमाणात या अभावग्रस्त समूहाच्या हाती आला असला, तरी आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध विषमतांच्या जोडीने ‘डिजिटल विषमता’ ही नवी भर पडली आहे. २०१९च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारीतून डिजिटल विषमतेचे वास्तव समोर आले. महाराष्ट्राचाच विचार केला, तर ग्रामीण भागात केवळ ३.३ टक्के घरात संगणक आणि १८ टक्के घरात इंटरनेट सुविधा आहेत. शहरात हे प्रमाण अनुक्रमे २७ आणि ५२ टक्के असे आहे. अशाही स्थितीत घरात ‘आटा’ नसला, तरी ‘डाटा’ उपलब्ध करून, अनेकांनी हा सांस्कृतिक व्यवहार समृद्ध होण्याला व आधीच सर्व प्रकारे अभावग्रस्त असलेल्या या मोठ्या जनसमुदायाला निराशेच्या, औदासिन्याच्या गर्तेतून वाचवण्यात मोठाच हातभार लावलेला आहे.

फेसबुकवर कार्यरत असलेल्या दलित, आदिवासी, स्त्रीवादी अशा तिसऱ्या जगातील अनेक कलावंत, साहित्यिक समूहांनी या ‘लाइव्ह’च्या माध्यमातून सांस्कृतिक भूक आणि उपासमार शमवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. याच माध्यमातून वाहरू सोनवणे, बाबाराव मडावी यांसारखे आदिवासी लेखक, कार्यकर्ते भारतीय आदिवासी समुदायाशी जोडले गेले. ‘कविता’, ‘पुरखा कथन’मधून भारतीय आदिवासी समूहातील म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती; ‘बाँखड़ी गमना’मधून आदिवासी कथांचे वाचन अशा विविध साहित्य प्रकारांतून आदिवासी साहित्यिक, कलावंतांमध्ये अखिल भारतीय स्तरावर संवाद साधण्याचे कामही घडून आले. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टच्या माध्यमातून डॉ. मंगेश बनसोड यांनी अनेक नाट्य कलावंतांना ‘लाइव्ह’ बघण्याची संधी दिली. त्यांनी स्वतःही ‘दलित रंगभूमीचे आंबेडकरी चळवळीतील योगदान’ अशा अनेक विषयांवर चर्चा केल्या. ग्वाल्हेरच्या रंगकर्मी गीतांजली गीत यांनी ‘राजा मानसिंह तोमर संगीत आणि नाट्य विश्वविद्यालया’च्या माध्यमातून बन्सी कौल, सीमा कपूर, रघुवीर यादव, रणजित कपूर, आनंद मिश्रा, वसंत काशीकर, अजहर आलाम अशा नावाजलेल्या रंगकर्मींना नाटकाच्या विभिन्न पैलूंवर बोलते करण्याबरोबर, वेगवेगळ्या प्रदेशांतील लोकसंगीताच्या शंभर भागांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. ‘नाट्यगंगा’ या छिंदवाडा येथील संस्थेने चर्चासत्रांचे आयोजन करून, अशोक मिश्रा, गिरिजा शंकर, हरीश इथापे यांच्यासारख्या रंगभूमीशी संबंधित मान्यवरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे फेसबुक लाइव्ह व्याख्यानमाला’, ‘सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व संस्कृती संमेलन’ या कार्यक्रमांमधून अण्णा भाऊ साठे, मुक्ता साळवे यांच्या आणि एकूणच उपेक्षित घटकांच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकला गेला. लॉकडाउन स्पेशल डिजिटल फोरमच्या माध्यमातून प्रकाश जाधव यांच्यासारख्या कवीच्या कविता सुदाम राठोड यांच्याकडून समजून घेता आल्या. ‘मेरा रंग संवाद’, ‘बतकही’ आणि इतर हिंदी फेसबुक वापरकर्त्यांमुळे कवी असंगघोष, कथाकार कैलाश वानखेडे, कौशल पंवार, हिरालाल राजस्थानी यांसारख्या हिंदी पट्टीतील लेखकांचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय होऊ शकला. अनेक प्रकाशन संस्थांनी अनेक लेखकांना बोलते केले. ‘झिम्माड काव्यसमूह’, ‘आम्ही मनमुक्ता’, ‘मनसा काव्यमाला’, ‘काव्यहोत्र’, ‘परिवर्त परिवार’, ‘मराठी साहित्यवार्ता’ यांनी विविध लाइव्ह उपक्रम सादर करून, तसेच डॉ. पद्माकर तामगाडगे यांनी ‘श्रवणकथा’ हा ऑनलाइन कथाकथनाचा आणि ‘काव्यमेत्ता’ हा कविता वाचनाचा कार्यक्रम सादर केला. कवी चित्रकार सुनील अभिमान अवचार यांनी ‘कोव्हिड-१९’ ही चित्रमालिका साकार करून, या संकटकाळातील लोकांच्या वेदना, यातना, कुचंबणा आपल्या कुंचल्यातून उतरवल्या.

या काळात राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असण्याची शक्यता असली आणि सरकारी खर्चाला कात्री लागणार असली, तरी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने संपूर्ण देशातील शक्य नसले, तरी राज्याच्या विविध भागांमध्ये ज्या काही विभिन्न ऑनलाइन लाइव्ह सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रस्तुतीकरण झाले, त्यांची दखल घेतली पाहिजे. सरकारला हे शक्य नसल्यास, ज्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलाविषयक संस्था, संघटना उभ्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत, अशांनी या चर्चा-संवादाचे चित्रीकरण, जे उपलब्ध आहे त्याचे योग्य प्रकारे संकलन व संहितीकरण केले, तर राज्याच्या सांस्कृतिक संचितात नक्कीच भर पडेल.

(लेखक साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune girl death case: pune girl death case : पुण्यातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूच्या बातम्यांविषयी उच्च न्यायालयाचे निर्बंध – high court restrictions on media trial...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यात मागील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तरुणीचा झालेला मृत्यू ( pune girl death case )...

Recent Comments