Home संपादकीय Article News : चाचणीचे निकष बदला - change the corona test criteria

Article News : चाचणीचे निकष बदला – change the corona test criteria


डॉ. अमोल अन्नदाते

केवळ सर्वाधिक चाचण्या करणारे राज्य हा लौकीक पुरेसा नाही. चाचण्या कोणाकोणाच्या होतात, सगळे निकष पाळून केल्या जातात का आणि चाचण्या झाल्यानंतर योग्य ती सगळी काळजी घेतली जाते का, हेही तितकेच महत्त्वाचे असते. सध्या याकडे कुणाचे फारसे लक्ष नाही….

महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, यापलीकडे जात तपासणीचा गुणात्मक दर्जा कसा सुधारता येईल आणि तपासणीचे निकष सीमित असल्याने आपण निदान करण्यात कमी पडतो आहोत का, हे पाहायला हवे. याचे कारण उशिरा निदानामुळे मृत्यूचे प्रमाण खूप आहे. आमची तपासणी जास्त म्हणून केस जास्त, या युक्तिवादापेक्षा आपण कुठे सुधारणा करू शकतो, हे जाणून घेणे योग्य ठरेल.

सध्या मुंबई ही देशाची करोना राजधानी आहे; म्हणून मुंबईत करोना कसा रोखला जाईल, ही लिटमस टेस्ट असेल. करोनाचे ६९ टक्के रुग्ण लक्षणहीन असतात. तेच ‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे, जास्त लोकांना व झपाट्याने संसर्ग देणारे ठरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या चाळणीत तपासणीचे निकष बदलले असल्याने हे रुग्ण निसटून जात आहेत. मुंबईमध्ये संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी न करता, ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसतात, त्यांचीच तपासणी होत आहे. यामुळे संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण की होम क्वारंटाइन, हा निर्णय घेण्याचा पायाच खिळखिळा झाला आहे. होम क्वारंटाइन हा प्रकार दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अपयशी ठरूनही, संपर्कात आलेल्या सर्वांना न तपासण्याची जोखीम का घेतली जाते? राज्यात वेगळाच प्रश्न आहे. तपासणीसाठी ‘सारी’ म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास हा निकष शासकीय यंत्रणेत पाळला जातो आहे. आता करोनाचे रुग्ण या मर्यादित लक्षणांसह येत नाहीत. इतर विविध लक्षणे आढळणारे रुग्ण रुग्ण तपासणीसाठी शासकीय यंत्रणेत पाठवले, तर संशयिताच्या व्याख्येत बसत नाहीत, म्हणून सरकारी करोना तपासणी केंद्रात त्यांची तपासणी नाकारली जाते. त्या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळतात. यामुळेच संशयितांची तपासणी अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. केसचे निदान हुकणे या घडीला अजिबात परवडणारे नाही. तपासणी व्यापक केल्यास ‘उशिरा निदान’ या मृत्यूच्या प्रमुख कारणाला अटकाव करता येईल.

संशयित ही व्याख्या कशी बदलते, हे काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल. महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पहिला रुग्ण पाहिला. त्याला अनियंत्रित जुलाबांचा त्रास होता व बऱ्याच उशिरा श्वसनाचा त्रास झाला. या रुग्णाचा पुढे मृत्यू झाला. उपचाराला प्रतिसाद न देणारे अनियंत्रित जुलाब, हे नेहमीपेक्षा वेगळे लक्षण दिसल्याने, त्यांना तो रुग्ण करोना संशयित असल्याचे जाणवले. रुग्णाच्या पतीला फक्त भूक लागत नव्हती. पत्नीचा मृत्यू झाल्यावर तपासणी केली असता तोही करोनाग्रस्त आढळला. खारघरचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांमधील थकवा येणे आणि सतत झोपेत राहणे, या दोन लक्षणांचे रुग्ण पुढे करोनाग्रस्त आढळू शकतात. संशयित रुग्ण ठरवताना, नातेवाइकांच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे. नेहमी आजारी पडल्यास आपला नातेवाइक कसा असतो, कसा प्रतिसाद देतो, हे घरात माहीत असते. ‘आधी सर्दी-खोकला असताना इतका आजारी वाटायचा नाही आणि दोन दिवसांत झपाट्याने कोसळणारी तब्येत,’ हे नातेवाइकांचे मत तपासणी करण्यास पुरेसे आहे.

कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे घ्राणशक्ती कमी झाल्याचे, करोनाचे पहिले लक्षण घेऊन रुग्ण येत आहेत. अर्धांगवायू व मेंदूशी संबंधित लक्षणे करोनामध्ये दिसत आहेत. हा नवा आजार आहे. ‘सारी’ हे सर्वाधिक आढळणारे लक्षण असले, तरी अशा एकाच पॅटर्नमध्ये करोना येणार नाही, हे सरकारने समजून घ्यायला हवे. ‘हाय क्लिनिकल सस्पिशन,’ म्हणजे ‘लक्षणांवरून संशय गडद होणे,’ हे डॉक्टरांचे मत तपासणी करताना ग्राह्य धरावे, असे शासनाला ठरवावे लागेल. करोना निदान झालेले रुग्ण पहिल्या दिवसापासून नेमकी कुठली लक्षणे घेऊन आले आहेत, याची माहिती संकलित करून, ती डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्यास, करोना कसा वागतो आहे, या ज्ञानात भर पडून, त्याचे निदान लवकर होईल. एका अॅपद्वारे ही माहिती संकलित करून, डॉक्टरांना त्यांच्याकडील करोनारुग्ण कसा आला, हेही सांगण्याची सोय करता येईल.

तपासणी किती वेळा केली आहे, याबरोबर तपासणी कशी केली जाते आहे, यावर सध्या कुठलेही नियंत्रण नाही; म्हणून सुरुवातीला करोनामुक्त आलेले रुग्ण, नंतर मृत्युशय्येवर असताना करोनायुक्त आढळतात किंवा लक्षातही येत नाहीत. तपासणी करताना नाकातून द्राव घेतल्यास तो युक्त येण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे, तर घशातून घेतल्यास ३२ टक्के आहे. निदानाची शक्यता वाढविण्यासाठी हे दोन्ही द्राव घेणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरचे निर्देश आहेत; पण बऱ्याच ठिकाणी फक्त घशातून द्रावनमुना घेतला जातो आहे. हा ग्राउंड रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे रुग्णांचा खरा आकडा समोर येत नाही. याचे कारण नाकातून स्वॅब घेताना, शिंक येण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तो घेणाऱ्याला धोका वाढवतो. तुलनेने, घशातून स्वॅब घेणे सोपे आहे. स्वॅब घेणारे सुरक्षित राहावेत, यासाठी काचेच्या चेम्बरमधून स्वॅब घेण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. अजूनही ती शासनापर्यंत पोहोचलेली नाही. सध्या अनेक खासगी ठिकाणी तपासणी सुरू आहे. यात कुठल्याही नव्या व्यक्तीला जाहिरात देऊन स्वॅब घेण्यासाठी नेमले जाते आहे, म्हणून याची सुसूत्रता अधूनमधून तपासून पाहणे गरजेचे आहे. स्वॅब घेतल्यावर त्याची वाहतूक थंड डब्यातून होते का आणि तपासणी केंद्रात त्यांची तपासणी चार तासांत होते की नाही, याची दक्षता खासगी निदान केंद्रांनी घेणे गरजेचे आहे. तपासणी करतानाच्या प्रात्यक्षिकाचे केवळ चित्रण पाठवून भागणार नाही, तर त्याचे वारंवार प्रात्यक्षिक (मॉक) करून, तपासणीत काटेकोरपणा आणावा लागेल.

शासकीय पातळीवर स्वॅब घेताना, रिपोर्ट येईपर्यंत सर्व संशयितांना एकाच कक्षात ठेवले जाते. त्यानंतर युक्त व मुक्त वेगळे केले जातात; पण तपासणी अहवाल येईपर्यंत, या दोन्हींचा संपर्क येऊन, या समूहातील करोना नसणाऱ्यांना संसर्गाचा धोका आपण वाढवत असल्याचे सूक्ष्म निरीक्षण लक्षात येत नाही. सर्वांचे तपासणी अहवाल एकाचवेळी येत असल्याने, निगेटिव्ह रुग्ण घरी जातात. निश्चित संपर्कामुळे ते पुढे लक्षणविरहीत करोना पसरवणारे ठरू शकतात; म्हणूनच तपासणी अहवाल येईपर्यंत या सर्वांचे आठ ते दहा तास विलगीकरण काटेकोरपणे, शक्यतो वेगळ्या खोल्यांमध्ये व संपर्कविरहीत असायला हवे. मुंबई आणि पुणे ही मोठी शहरे सोडून इतरत्र जागेचा प्रश्न फार कळीचा नाही. तेथे वेगळ्या खोल्या वापरल्या जाऊ शकतात. प्रत्येक पायरीवर तपासणी आणि केसचा शोध परिपूर्ण कसा करता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. या काही गोष्टी पाळल्यास करोनाविरोधातील लढ्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतील.

(लेखक वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chennai Super Kings Full Schedule Fixtures Timing And Team – IPL 2021 Chennai Super Kings Schedule: चेपॉक नव्हे तर हे असेल धोनीचे होम ग्राउंड,...

मुंबई: IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल...

indian idol 12: Himesh Reshammiya Breaks The Silence On Indian Idol 12 Is Going To Be Off Air Soon – कमी TRP मुळे इंडियन...

हायलाइट्स:इंडियन आयडलचा १२ सीझन लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चाशोचा टीआरपी कमी असल्यानं शो बंद होणार असं बोललं जात आहेगायक आणि परीक्षक हिमेश रेशमियानं...

mukesh ambani explosive case: मोठी बातमी! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास NIA करणार; हिरन मृत्यू प्रकरण ATS कडे! – mukesh ambani explosive case home ministry...

हायलाइट्स:मुकेश अंबानींच्या घराजवळील स्फोटक प्रकरण एनआयएकडेकेंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेशमनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडेमहाराष्ट्र गृह विभागाकडून निर्देशमुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ...

Recent Comments