Home संपादकीय Article News: श्रीमंत पालिका आजारी अन् मुंबईकर हवालदिल - wealthy municipality sick...

Article News: श्रीमंत पालिका आजारी अन् मुंबईकर हवालदिल – wealthy municipality sick and mumble


आमदार आशिष शेलार

८० हजार कोटींच्या आर्थिक ठेवी असलेल्या आणि ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेने काळजी घेऊन गटारावरील झाकण बंद केले नाही म्हणून गटारात पडून मुंबईतील ख्यातनाम डॉक्टर दीपक अमरापुरकर यांचा मृत्यू…ही जेवढी दुर्दैवी बातमी होती. तेवढीच, आज वरळीतील मुंबईकराला वेळीच ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही म्हणून मृत्यू झाला… ही सुद्धा दुर्दैवी बातमी आहे. मुंबईतील अशा दुर्दैवाच्या किती किती कहाण्या सांगाव्यात. २६ जुलै २००५च्या पुरात संपूर्ण मुंबई पाण्यावर तरंगली आणि महापालिकेची यंत्रणा उघडी पडली, तशीच हताश हतबल परिस्थिती आज करोनाला तोंड देताना दिसते आहे. दुर्दैवाने श्रीमंत मुंबई महापालिकेचे वारंवार असेच आजारी, बिमारू, हतबल, हताश चित्र समोर येते आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बजेट ४ हजार २६०कोटींचे आहे. यावर्षी त्यात १४ टक्के वाढ करण्यात आली. करोनाचा धोका मुंबईला होऊ शकतो याकरीता कस्तुरबा रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी दोन कोटीचा निधी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आला होता. तरी आज चित्र असे आहे की महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, क्वारंटाइन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, गरिबांपर्यंत धान्य पोहोचवणारी यंत्रणा नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत. महाराष्ट्रातील रुग्णांची सर्वाधिक वाढ मुंबईत. महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यू मुंबईत. सर्वाधिक मृत्यु दर मुंबईत. मुंबईचे हे चित्र दुर्दैवाने आज जगासमोर आले आहे.

मुंबई महापालिकेत आयएएस दर्जाचे नऊ अधिकारी बसलेले आहेत. एक पालिका आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त ,एक सह आयुक्त आणि राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेले तीन. असे असताना अजूनही मुंबईकरांना कोणीही विश्वास देऊ शकलेला नाही. मुंबई महापालिकेचा खरा कणा हा वॉर्ड ऑफिसर आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे अधिकारी हा आहे. या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येते की व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आणि आकडेवारीचे कागद तयार करण्यात त्यांचा दिवस संपून जातो. “रोगापेक्षा आयएएस अधिकारी भयंकर” अशी अवस्था आमची झाली आहे, असे वॉर्ड ऑफिसर सांगतात.

मुंबईच्या पालकमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या वरळी विभागात सर्वाधिक रुग्ण आहेत तर प्रभादेवी, धारावी, लोअर परेल, भायखळा, नागपाडा, मलबार हिल, ग्रँड रोड, गोवंडी-मानखुर्द असे करोनाचे हॉटस्पॉट वाढतच आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील पहिला रुग्ण ९ मार्च २०२०ला सापडला. जगभरात जे संकट आहे त्याची कल्पना अर्थसंकल्प मांडताना महापालिकेला होती, तर मग पहिला रुग्ण सापडेपर्यंत मुंबई महापालिकेने नेमके काय केले ? १५ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने हवे आहेत अशी जाहिरात प्रसिद्ध केली. १७ एप्रिलला रुग्णवाहिका आणि चालक हवे आहेत, अशी जाहिरात प्रसिद्ध केली. म्हणजे करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर एक महिन्याने महापालिकेच्या लक्षात आले की आपल्याकडे तज्ञ डॉक्टर नाहीत, नर्स, ॲम्ब्युलन्स पुरेशा नाहीत, चालक नाहीत. मग महापालिकेत बसलेले आयएएस अधिकारी करतात काय ?

कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी, मुंबई महापालिकेत वस्तीवस्तीत कोविद रॅपिड टेस्टिंग किट व्दारे तपासणी करण्याचा निर्णय १ एप्रिलला झाला. १७ एप्रिल पर्यंत हे किट महापालिकेला उपलब्ध झाले नाहीत. केवळ पाच हजार किट्सची मागणी करण्यात आली होती. मुंबईची दीड कोटी लोकसंख्या पाहता फक्त धारावी आणि वरळी पूरतेच किट्स मागवण्यात आले की काय, असाही प्रश्न पडतो. सुरक्षा किट्स नाहीत म्हणून शताब्दी, कूपर, भाभा या रुग्णालयातील डॉक्टरांना आंदोलन करावे लागले. आरोग्य सेविका घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. साधे हँन्डग्लोजही नाहीत. कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट्स नाही, त्यांचा विमा उतरवण्यात आलेला नाही, त्यांना वेळेत जेवण सुद्धा मिळत नाही. महापालिकेच्या रुग्णालयात नर्सेसची काळजी घेतली जात नाही हे या कर्मचाऱ्यांच्या संघटनाना पत्र लिहून सांगावे लागले. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना यानिमित्ताने मी सलाम करतो.

सन २०१९-२०या वर्षासाठी भगवती रूग्णालयाला ५९२कोटी, अग्रवाल रूग्णालयाला ४९८ कोटी, कूपर रुग्णालय २९० कोटी, शताब्दी रुग्णालय ५०२ कोटी, लेप्रसी रुग्णालय १५५कोटी, नायर रुग्णालय २५०कोटी, भाभा रुग्णालय २९७ कोटी, सायन रुग्णालय ६५० कोटी, नायर दंत महाविद्यालय १५१ कोटी अशा प्रकारची तरतूद करूनही आज रुग्णालयांची अवस्था अशी का आहे? हा निधी गेला कुठे? अन्य आजारांच्या रुग्णांना कोणीच वाली उरला नाही. डायलिसिसच्या करणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद आहेत कारण अनेक खाजगी रुग्णालये महापालिकेने सील केली आहेत. गर्भवती महिलांचे हाल होत आहेत. अशा विविध आजारांनी दगावलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून करोना व्यतिरिक्त अन्य आजारांनी मृत्यू म्हणून त्याकडे महापालिकेने लक्ष दिलेले नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सरसकट सर्वांची करोना चाचणी घेणे महापालिकेने आता बंद केले आहे. रुग्ण सापडला आणि त्याच्या नातेवाईकांना लक्षणे दिसत असतील तरच चाचणी केली जाणार आहे. धारावी, मानखुर्द, चेंबूर, बांद्र्यातील नर्गिस दत्त नगर अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत ज्या झोपडपट्टीमध्ये दाटीवाटीने लोकं राहतात. त्यामुळे हा निर्णय मुंबईला अत्यंत घातक ठरणार आहे. या चाचण्या कमी केल्या मुळे गेल्या दोन चार दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या घटली असे चित्र समोर येऊ लागले आहे आणि महापालिका आपली स्वतःची पाठ थोपटून घेते आहे. अनेकदा महापालिकेची आकडेवारी आणि राज्य सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केली जाणारी आकडेवारी यामध्ये तफावत दिसून येते. याचे कारण खाजगी तपासण्या केलेल्या रुग्णांची आकडेवारी मुंबई महापालिका जाहीर करत नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि घातक आहे.

नगरसेवक हे महापालिकेचे ट्रस्टी आहेत. त्यांच्या सूचना, मागण्या याचा महापालिकेने विचार करणे आवश्यक आहे, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. महापौरांनी आरोग्य समितीची विशेष बैठक व्हिडीओ काँन्फरन्स व्दारे घ्यायला हवी होती. नगरसेवकांच्या सूचना समजून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. पण कुठे आहेत स्थायी समिती अध्यक्ष? कुठे आहेत आरोग्य समितीचे अध्यक्ष? पण हेच पदाधिकारी गायब असतील तर मुंबईकरांनी कुणाकडे पहावे. मुंबईतील आमदार, मुंबईचे पालकमंत्री यांच्यामध्येही समन्वय दिसून येत नाही.

ही सर्व परिस्थिती मांडताना कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही. कोण्या एका पक्षाची सत्ता आहे, म्हणून मी आरोप करीत नाही. सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे एवढीच या लिखाणामागे माझी भूमिका आहे. मुंबईतील सर्वसामान्य आज करोनामुळे भयगंडाच्या अवस्थेत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे वेळीच जर प्रशासनाच्या चूका लक्षात आणून दिल्या नाही तर मुंबईचे आणि मुंबईकरांचे मोठे नुकसान होईल. मुंबईकरांचे शारीरिक, मानसिक,आर्थिक, आरोग्य नव्याने उभे करून पुन्हा मुंबईला रुळावर आणायचे मोठे आव्हान महापालिकेसह सर्वांवर आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या ठेवीतून राज्य सरकारला मदतीचा विषय चर्चेत आहे. सामान्य मुंबईकरांच्या कष्टातून, करातून या ठेवी उभ्या राहिल्या, त्याला उभं करण्यासाठी या ठेवीतील काही रक्कम थेट खर्च करावी लागली तरी कोणाची हरकत नसावी. परंतु जर ठेवी मोडणार असू तर मग पंधरा ते वीस लाख गरजू कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये थेट खात्यात का देऊ नयेत? यातून मुंबईची क्रयशक्ती वाढेल. पुन्हा मुंबई रुळावर येईल. मुंबईकर जोमाने कामाला लागला की, मुंबई महापालिकेच्या ठेवी पुन्हा दुप्पट होतील.

कोणताही दुर्दैवी प्रसंग आला की मुंबई महापालिकेचा कारभार उघडा पडतो. 26 जुलैच्या संकटावेळी पालिकेचे आयुक्त जॉनी जो ‘सेफ’ होते. आता वेगळे अधिकारी आहेत. संकटात भरडला जाणारा मुंबईकर मात्र तोच आहे. त्याच्या यातनाही त्याच आहेत. जन्माने मुंबईकर असलेल्या, सामान्य कुटुंबातील, गिरणगावात लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासारख्या माणसाला दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या वेदना माहीत आहेत. मुंबई महापालिकेने ठरवले तर काय करू शकते याचीही मला कल्पना आहे. महापालिकेच्या क्षमतेबाबतही शंका वाटत नाही. प्रश्न आहे क्षमता असूनही सक्षमपणे काम न करणाऱ्या महापालिकेचा. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास, अनुभव असूनही या श्रीमंत महापालिकेचे रडगाणे मात्र संपत नाही याची खंत वाटते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

Recent Comments