Home संपादकीय Article News : हिंस्र; पण शोकात्म कथा - on black moses by...

Article News : हिंस्र; पण शोकात्म कथा – on black moses by alain mabanckou


विवेक गोविलकर

काँगो प्रजासत्ताकामधे जन्मलेल्या अॅलन मबांकू या लेखकाने काही काळ पॅरिसमधे वास्तव्य केल्यानंतर, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अॅट लॉस एन्जलीस येथे प्राध्यापक म्हणून काम केले. प्रदीर्घ परदेशी वास्तव्यानंतर, तो प्वाँट न्वार या मूळ गावी परतला. ‘पेटी पिमं’ (छोटी मिरची) या त्याच्या फ्रेंच कादंबरीच्या हेलन स्टीव्हन्सन यांनी ‘ब्लॅक मोझेस’ या नावाने केलेल्या इंग्रजी अनुवादाने, ‘मान बुकर’ या मानाच्या पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

कथेच्या नायक आणि निवेदक असलेल्या अनाथ मुलाला धर्मगुरू, ‘परमेश्वराचे आभार, आमच्या पूर्वजांच्या भूमीवर काळ्या मोझेसचा जन्म झाला आहे,’ असे लांबलचक नाव देतो; कारण त्याच्या मते माणसाची नियती त्याच्या नावातच दडलेली असते. पुढे अनाथालयात गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्या दोन मुलांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या जेवणात लाल मिरची टाकणाऱ्या मोझेसला, छोटी मिरची हे टोपणनाव मिळते. अनाथ मुलांच्या कथा हा लेखकांच्या आवडीचा विषय आहे. चार्ल्स डिकन्सच्या ‘ऑलिव्हर ट्विस्ट’पासून जेके रोलिंगच्या ‘हॅरी पॉटर’पर्यंत अनेक अनाथ नायकांना वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनाथ मुलांचा आयुष्यात पालकांच्या बऱ्यावाईट संस्कारांची बंधने नसतात; पण अंगभूत गुणांमुळे त्यांच्याकडून काही विशेष गोष्टी घडू शकतात. मोझेसच्याही आयुष्यात आनंदाचे आणि स्वातंत्र्याचे प्रसंग अधूनमधून येतात; पण त्याची कथा संपते, तेव्हा वयाच्या चाळिशीत तुरुंगात बसून तो कबुलीजबाब देतो आहे, अशा पद्धतीने ही कादंबरी लिहिलेली आहे.

मोझेसची कथा लोआंगो गावातल्या अनाथ विद्यार्थीगृहात सुरू होते. त्याला एक सहृदय धर्मगुरू आणि एक प्रेमळ नर्स यांचा आधार असतो. नंतर १९६०च्या दशकाच्या शेवटी, देशात साम्यवादी क्रांती होते. त्याला स्थानिक, वांशिक हितसंबंध, वैर यांची जोड मिळते आणि हे दोघेही मोझेसच्या आयुष्यातून नाहीसे होतात. क्रांतीमुळे आलेल्या नव्या राजवटीत सर्वांनाच सत्तास्थान मिळणे शक्य नसते. परिस्थितीशी जुळवून घेत, मोझेस लगेच नव्या अध्यक्षांची भाषणे पाठ करून पोपटासारखी बोलायला लागतो. अनाथ विद्यार्थीगृहाचा संचालक हा हुकूमशाही आणि भ्रष्ट पद्धतीने काम करणारा राजकीय संधिसाधू असतो. तो त्याच्या नातलगांची भरती करून सगळ्यांवर वचक ठेवतो. क्रांतीनंतर मात्र आपले स्थान सुरक्षित नसल्याची जाणीव त्याला होते. त्याची संचालक पदावरून उचलबांगडी झाली, तर इतर कर्मचाऱ्यांनाही जावे लागेल, अशी भीती तो त्यांना घालतो. मोझेस हा सुरुवातीला सद्वर्तनी; पण परिस्थितीशी जुळवून घेताना नाठाळ-खोडकर आणि शेवटी एक बेभान खुनी झालेला दिसतो. आपल्या आयुष्यात काहीही विशेष घडणार नाही, अशी अनाथालयातल्या सर्वांची धारणा असते. गुंडगिरी करणाऱ्या मुलांशी मैत्री झालेला मोझेस, त्यांच्याबरोबर अनाथालयातून पळून जातो. तो प्वाँट न्वारच्या वेश्यागृहाच्या मादामच्या आश्रयाला जातो. हेही स्थैर्य त्याच्या वाट्याला फार काळ येत नाही. राजकीय उलथापालथीतून, शेजारच्या देशातून आलेल्या घुसखोर स्त्रियांचे वेश्यागृह जमीनदोस्त होते. त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांना त्यांच्या देशात परत हाकलून दिले जाते किंवा ठार करून दफनभूमीत फेकून दिले जाते. काँगोच्या स्थानिक वेश्यागृहांना मात्र याचा त्रास होत नाही.

गावात पौगंडावस्थेतील मुलांच्या अनेक टोळ्या असतात. आपसातल्या मारामाऱ्या आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाची कामे त्यांच्याकडून सतत होत असतात. राजकीय पुढारी त्यांना किडे-मच्छर म्हणून संबोधतात. त्या काळात मोझेस नकळत कुत्र्या-मांजरांचे मांस खात असतो. गरिबांना मदत करणारा रॉबिनहूड होण्याची इच्छा असणारा मोझेस, प्रत्यक्षात भ्रमिष्ट वागून गुन्हेगारी कृत्ये करायला लागतो. ज्या अनाथालयात मोझेसचे बालपण गेलेले असते, ते पाडून तिथे गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या मनोरुग्ण लोकांना डांबून ठेवण्यासाठी तुरुंग बांधला जातो. मोझेसचा निरागस अनाथ ते खुनी गुन्हेगार असा प्रवास शेवटी त्याच्या बालपणाच्या गावात येऊन संपतो. काहीशा हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेल्या मोझेसच्या हिंस्र कथेला एक अटळ अशी शोकात्म पार्श्वभूमी आहे.

…लेखक : अॅलन मबांकू

(अनुवाद : हेलन स्टीव्हन्सन)

प्रकाशक : सर्पंट्स् टेल

पाने : २०८, किंमत : ५९६ रुपये

किंडल : २५८ रुपयेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments