Home शहरं सोलापूर ashadhi ekadashi 2020: Ashadhi Yatra 2020 करोनाने रोखली वारकऱ्यांची वाट; आषाढीला मुख्यमंत्री...

ashadhi ekadashi 2020: Ashadhi Yatra 2020 करोनाने रोखली वारकऱ्यांची वाट; आषाढीला मुख्यमंत्री घालणार ‘हे’ साकडे – ashadhi yatra 2020 empty roads in pandharpur due to curfew


पंढरपूर:आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचं वेदनादायी चित्र पाहायला मिळालं. आषाढी यात्रा म्हटलं की ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. ( Ashadhi Yatra 2020 )

वाचा: वारीला आठ शतकांची परंपरा; कोर्टाने वारकऱ्यांचे ‘हे’ आर्जव फेटाळले

मानाच्या संतांच्या पादुका आज सायंकाळी सरकारी नियमांच्या चौकटीत वाखरी येथे पोहचल्या. या पादुका पहिल्यांदाच अवघ्या २० भाविकांसह एसटी बसेसमधून वाखरी येथे आणल्या गेल्या. पादुका उतरल्यावर सोबत आलेल्या सर्व मानकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पादुका वाखरी पालखीतळावर नेण्यात आल्या. जे पालखी सोहळे लाखोंचा वारकरी भक्तमेळा घेऊन चालतात त्यांना यंदा करोनामुळे बसेसमधून येण्याची वेळ आली. वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि येथून सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.

वाचा: आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान या वारकरी दाम्पत्याला

करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारपासून संचारबंदी सुरू झाली. शहरात द्वादशीपर्यंत संचारबंदी राहणार आहे. वैष्णवांचा मेळा जिथे जमतो त्या चंद्रभागेचं वाळवंटही सील करण्यात आलं आहे. पंढरपूरचा प्रत्येक रस्ता ओस पडला असून प्रत्येक रस्त्यावर दंडुके हाती घेतलेल्या पोलिसांचे राज्य आहे. आषाढी हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा सोहळा आहे. मात्र, करोनाने बंधने आणल्याने ज्या सोहळ्यावर हजारो व्यापाऱ्यांचा वर्षाचा प्रपंच चालतो तो व्यापारी आज डोक्याला हात लावून घरी बसला आहे. यावर्षी भाविकाना पंढरीत प्रवेश नसल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा तीरावरील सर्व घाट बंद करण्यात आले आहेत. प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागेचं वाळवंट, भक्तीमार्ग, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि शहरातील अन्य ठिकाणांवर शुकशुकाट आहे.

दरम्यान, संतांच्या पादुकांना द्वादशी दिवशी परत पाठवण्याचे नियोजन शासनाने केले असताना पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांनी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पौर्णिमेला काला करून पादुका परत पाठवण्याची विनंती केली आहे. यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संप्रदायाचा हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले आहे.

वाचा: ‘आषाढी’वर करोनाचे संकट

मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) मुंबई येथून सपत्नीक रस्तेमार्गे मंगळवारी रात्री उशिरा पंढरपूरमध्ये पोहचले. आज पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यंदा यात्राच नसल्याने मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरात देवापुढे विणेकरी म्हणून सेवा देणाऱ्या विठ्ठल बडे या वारकऱ्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळणार आहे. राज्यावरचं, देशावरचं आणि अवघ्या जगावरचं करोनाचं संकट दूर होऊ दे, असं साकडं आज मुख्यमंत्री विठुरायाचरणी घालणार आहेत.

मंदिरात आकर्षक सजावट, रोषणाई

आषाढी एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर सुगंधी फुलांनी सजवण्यात आले आहे. यंदा करोनामुळे मुख्यमंत्री उतरणार असलेले शासकीय विश्रामगृह व विठ्ठल मंदिर येथे खूपच मोजक्या मान्यवरांना प्रवेश देण्यात येणार असून उद्या एकादशीला फक्त मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांनाच देवाच्या पायावर दर्शन मिळणार असल्याचे मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

वाचा: विठुरायाची मूर्ती आता आठ वर्षे आहे तशीच राहणार!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments